“जखम झाल्यावरही ‘त्या’ अभिनेत्याने नाटक सुरूच ठेवलं”; चिन्मय मांडलेकरने सांगितला किस्सा...

    06-Apr-2024
Total Views |
रंगभूमीशी प्रत्येक कलाकार बांधला गेलेला असतो आणि त्याची घट्ट नाळ कशी असते याचे उत्तम उदाहरण चिन्मय मांडलेकरने दिले.
 

chinmay mandalekar 
 
मुंबई : एकांकिका, नाटक, मालिका आणि चित्रपट अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांवर नानाविध भूमिका साकारुन गेली अनेक वर्ष चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मराठीसह हिंदीत त्याने उत्कृष्ट कामं केली आहेत. दरम्यान, चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ नाटकाच्या निमित्ताने चिन्मयने झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात चिन्मयने नाटकादरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला ज्यात त्यांच्या सहकलाकाराला मोठी जखम झाली होती पण असं असूनही नाटक त्या कलाकाराने सुरुच ठेवलं होतं.
 
चिन्मयने त्यांच्या आठवणीतला नाटकात घडलेला एक किस्सा सांगितना म्हटले, “नाटकाच्या तालमीत किंवा नाटकाच्या प्रयोगांमध्ये अनेक गमतीजमती आणि विनोदी किस्से घडत असतात. पण माझी जी एक आठवण आहे ती माझ्या एका सहकलाकाराबद्दलची आठवण आहे. तो सहकलाकार म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर.”
 
चिन्मय पुढे म्हणाला, “आम्ही ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाचे प्रयोग करत होतो. ते नाटक खूप गाजलं होतं. एका प्रयोगामध्ये सिद्धार्थला ब्लॅकआऊटमध्ये नेमक कुठे जायचं हे कळलं नाही आणि तो स्टेजवरून खाली पडला. त्याच्यानंतर अख्खा प्रयोग त्याच्या डोक्यातून भळभळती जखम वाहत होती आणि ती जखम तशीच घेऊन त्याने पुढचा सगळा प्रयोग पूर्ण केला.”
 
पुढे तो असं देखील म्हणाला की, “तेव्हा आम्हा स्टेजवरच्या लोकांना खूप भीती वाटत होती की सिद्धार्थचं इतक रक्त वाहतंय, कदाचित तो चक्कर येऊनही पडू शकतो. पण अशा अवस्थेत सिद्धार्थने प्रयोग पूर्ण केला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर सिद्धार्थच्या या स्पीरीटसाठी हॅट्स ऑफ.”