बालसाहित्य मुलांच्या प्रतीक्षेत... जबाबदार कोण?

    05-Apr-2024   
Total Views |
Children's Literature

मुले कुतूहल घेऊनच जन्माला येतात. ही जन्मजात जिज्ञासू मुले ज्ञानार्जनासाठी सतत माध्यम शोधत असतात. आजच्या डिजिटल काळात, मोबाईल-लॅपटॉपपासून पारंपरिक वाचनालये आणि प्रश्नचिन्ह टाकताक्षणी उत्तर देणारे गुगल, हे सगळे त्यांच्या हातात आहे. या सर्वांत वाचनसंस्कृती मागे पडली यात नवल नाही. परंतु, पुस्तक वाचनाचे केवळ ज्ञानार्जनाव्यतिरिक्त इतरही फायदे आहेत. नुकताच ‘बाल पुस्तक दिन’ साजरा झाला. या पार्श्वभूमीवर मुले का वाचत नाही? याबद्दल बालसाहित्यकार आणि संबंधित क्षेत्रातील काही मान्यवरांच्या घेतलेल्या या विचारगर्भ प्रतिक्रिया...

बालसाहित्य काळाशी आणि बालमनाच्या विकासाच्या टप्प्यांशी सुसंवादी हवे

बालकांच्या बौद्धिक-भावनिक-मानसिक विकासासाठी अवांतर वाचन आवश्यक आहे. वाचन ही केवळ एक क्रिया नसून, चांगला माणूस घडविण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. माणूस अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनशील आहे. त्याचे यंत्र होऊ द्यायचे नसेल, त्याचा निव्वळ ’प्राणी’ होऊ द्यायचा नसेल, तर बालकांच्या हातात योग्य वयात योग्य ते पुस्तक देण्याची नितांत गरज आहे. उत्तम बालसाहित्य हे बालकांचे मन समृद्ध करत असते. हे साहित्य काळाशी आणि बालमनाच्या विकासाच्या टप्प्यांशी सुसंवादी असले पाहिजे. यातून बालमनावर मूल्यसंस्कार होता, त्यांना मूल्यभान येते. मी मुख्याध्यापक असताना वाचन-लेखनसंस्कृती रुजविण्यासाठी शाळेत असे उपक्रम राबविले, त्यातून शेकडो विद्यार्थी शेकडो पुस्तके वाचत होती. वाचती झालेली मुले पुढे लिहिती होतात, हे मी पाहिलेय. घरी पालकांच्या आणि शाळेत शिक्षकांच्या हातात पुस्तक दिसले, तर मुले नक्कीच वाचतात. त्यांना ’वाचा’ म्हणायची गरजच पडत नाही, असे माझे अनुभवसिद्ध मत आहे. प्रत्येक घरात एक वाचन कोपरा हवा, ते वाचनकेंद्र बनले पाहिजे. शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके सहज उपलब्ध झाली पाहिजेत. कुटुंबातील आणि शाळेतील वातावरण सर्जनशील, संवेदनशील, बालस्नेही आणि आश्वासक हवे. एकदा बालकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झाली की, ते सर्व प्रकारचे साहित्य वाचतात.

’एक बालक एक शिक्षक
एक लेखणी एक पुस्तक
हे जग निश्चित बदलू शकते’
या वचनावर ठाम विश्वास आहे!


- डॉ. सुरेश सावंत, अध्यक्ष, मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन


मुलांचे मनोरंजन करतानाच त्यांच्या पदरात काही ठोस टाकणे गरजेचे


आज बालसाहित्य वाचले जात नाही, असे जे म्हटले जाते, ते अर्धसत्य आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी बालसाहित्य प्रकाशित होत आहे, बालसाहित्य संमेलनेही आयोजित केली जातात, पण हे चित्र सार्वत्रिक नाही, हेही मान्य करावे लागेल. लहान मुले अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे घरातील मोठी माणसे पुस्तकाऐवजी सदा सर्वकाळ मोबाईल घेऊन बसली, तर मुलांनी अनुकरण करायचे कोणाचे? पाल्याला वाचनाची गोडी लागावी असे वाटत असेल, तर पालकांनी आधी पुस्तक हातात घ्यावे. दैनिकांचा मुलांसाठीचा रविवारचा अंक, नियतकालिके, पुस्तके खरेदी करावी. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी त्यांच्या हाती दर्जेदार साहित्य देण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षकांची आहे. साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे, मुलांचे मनोरंजन करतानाच त्यांच्या पदरात काही ठोस टाकणे गरजेचे आहे. मुलांच्या जिज्ञासेला खाद्य पुरवून तिची पूर्ती करणारे, कल्पनारम्य व चमत्कृतीजन्य वर्णनाने त्यांचे मनोरंजन करतानाच, त्यांच्यामध्ये चांगल्या-वाईटाची जाण निर्माण करणारे, चांगल्याबद्दल प्रेम निर्माण करून त्यांचे व्यक्तिमत्त्व बौद्धिक, मानसिक, भावनिक, सामाजिकदृष्ट्या निकोप, निरामय आणि संपन्न करणारे बालसाहित्य त्यांना पुरवले पाहिजे. अर्थात, बालांसाठी लिहिणे सोपे नाही. त्यासाठी मुलांत मूल व्हावे लागते, बदललेली परिस्थिती, त्यांची भावनिक गरज, अपेक्षा, भाषेचा आवाका लक्षात घ्यावा लागतो, परकाया प्रवेशच तो!

- सदानंद पुंडपाळ, बालसाहित्यकार


आजचे पालक वाचतात का?


आजची मुलं वाचतात का, या प्रश्नातूनच मला एक नवा प्रश्न ऐकू येतोय - आजचे पालक वाचतात का? त्यामुळे आधी या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. मुलं पालकांचे ऐकत नाहीत, हे खरे असले तरी मुलं पालकांचे अनुकरण मात्र करतात, हेही तितकेच खरे. काही सन्माननीय अपवाद वगळता पालक टीव्हीसमोर मालिकांच्या पोथ्या भक्तिभावे पाहत बसतात किंवा व्हॉट्सअ‍ॅपचे मणी दिनरात ओढत राहतात. या पालकांची मात्र इच्छा असते, आपल्या मुलांनी वाचले पाहिजे. इथेच फसगत होते. मुलांच्या वाचनाबद्दल सांगायचे, तर आजही चांगले बालसाहित्य वाचले जाते. लिहायला सोपे म्हणून हौशेपोटी भरमसाठ बालसाहित्य लिहिले जाते. प्रकाशितही होते. पण, बालसाहित्य म्हणून ’काहीही’ छापलेले असते, ते मुलं वाचत नाहीत. मुलांचे बदललेले भावविश्व व आजच्या मुलांचा आवाका लक्षात घेऊन, आजही जे बालसाहित्य लिहिले जाते, ते मुलं वाचतात. काळाशी संवादी बालसाहित्य कमी आहे, ते वाढायला हवे. मुलं चांगले वाचायला तयार आहेत. उगीच मुलांना कटघर्‍यात उभे करून पालक, कवी, लेखक, प्रकाशक, शासन यांनी स्वतःची जबाबदारीझटकू नये.

- दासू वैद्य, कवी आणि बालसाहित्यिक
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे...

 
कुंभार जसा मातीला आकार देतो आणि त्यातून विविध कलाकृती बनवतो, त्याचप्रमाणे पालकांनीही आपल्या मुलांना बालपणापासून संस्कार दिले पाहिजेत. पण, हे संस्कार मुलांना प्रत्यक्ष देण्यापेक्षा पालकांच्या वागणुकीतून, कळत-नकळतपणे मुलांना मिळाले, तर मुलं निश्चितपणे ते संस्कार आपल्या अंगी बाणवतात आणि मग ते संस्कार सदैव सोबत करतात. या संस्कारात सर्वांत महत्त्वाचा आणि आजच्या जीवनशैलीत बर्‍याचदा दुर्लक्षित होणारा संस्कार म्हणजे, वाचन संस्कार होय. जर आईवडील वाचक असतील, तर साहजिकच त्या घरातली मुलेही वाचतात. वयानुसार मुलं सुरुवातीला चित्रकथा, टारझन, जंगल बुक, परिकथा वाचत असतील, तर त्यांना वाचू द्या किंवा मुलांना जवळ घेऊन त्यांना गोष्ट सांगा, वाचून दाखवा, यामुळे मुलं स्वतःहून वाचायला लागतील. मुलांना वाढदिवसाला इतर भेटवस्तू देताना, पुस्तकही भेट दिले गेले पाहिजे. मुलांना आपण चित्रपट दाखवतो उद्यानात, हॉटेलमध्ये घेऊन जातो, तेवढ्याच सहजतेने त्यांना पुस्तकाच्या दुकानात घेऊन जायला पाहिजे. त्यांना पुस्तके हाताळायला दिली पाहिजे. संत रामदास स्वामींनी दासबोधात सांगून ठेवलंय, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हे जेव्हा पालकांना समजेल, तेव्हा मुलं निश्चितच चांगले वाचक होतील, वाचन संस्कृती प्रवाही राहील, यावर माझा ठाम विश्वास आहे.

- ज्योती कपिले, संपादक, प्रकाशक जेके मीडिया

जमाखर्चात मुलांच्या पुस्तकासाठी छोटी रक्कम राखून ठेवावी


लहान मुलं ही अनुकरणप्रिय असतात. बालमनाचा हा गुणधर्मच. मोठ्यांचे अनुकरण करत ती मोठी होत असतात. मोठी मंडळी जर घरात सातत्याने पुस्तके वाचताना दिसत असेल, तर मुलांचंही पुस्तकांबाबतच कुतूहल जागं होतं. एकदा का मुलांना पुस्तकांची आवड लागली की वाचनासाठी तेही नक्की सवड काढत जातात आणि जेव्हा मुलं पुस्तकांपर्यंत येत नसतील, तेव्हा मोठ्यांनी पुस्तके ही मुलांपर्यंत नेली पाहिजे. ग्रंथालयांना, ग्रंथ प्रदर्शनाला आवर्जून मुलांना नेऊन पुस्तके हाताळायला आणि आवडीची पुस्तके निवडण्याची संधी दिली पाहिजे. यासाठी महिन्याच्या जमाखर्चात मुलांसाठी पुस्तके विकत घेण्यासाठी छोटी रक्कम राखून ठेवावी. साधारणतः पाच ते आठ वर्षे हा शिशुगट, आठ ते बारा वर्षे हा किशोर गट आणि १२ ते १५ वर्षे हा कुमार गट. त्या त्या वयोगटाचे भावविश्व, वैशिष्ट्ये ही वेगवेगळी असतात. मुलांच्या वयोगटानुसार साहित्य त्यांच्या हातात दिले, तर नक्कीच मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी उपयुक्त ठरेल. मला वाटते, मुलांमध्ये वाचनाचा संस्कार रुजवायचा असेल, तर एका दिवसात, एका आठवड्यात ते होणार नाही. ती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हे पालकांनी आणि लक्षात असू द्यावे.


- एकनाथ आव्हाड,
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यकार
 

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.