म्हातारा नवरा गमतीला...

    04-Apr-2024   
Total Views |
girl in Ghana


मनात हाय आता सांगूच काय ग
कशी काय येऊ मी रंगतीला
म्हातारा नवरा गमतीला

दामोदर शिरवाळे यांच्या लोेकगीताचे हे सुप्रसिद्ध बोल. ‘राहू कशी बाई याच्या संगतीला’ असा प्रश्न त्या गीतातील वधूला तिच्या म्हातार्‍या नवरदेवामुळे पडला. अशीच अवस्था सध्या घानातील एका १२ वर्षीय वधूची. कारण, त्या नववधूच्या पदरीही पडलाय, तो तब्बल ६३ वर्षांचा म्हातारा नवरदेव. सोशल मीडियावर या बालविवाहाचे फोटो व्हायरल होताच, घानासह जगभरात हा चर्चेचा आणि टीकेचाही विषय ठरला.अशा या वधू आणि वरांमधील वयाचे अंतर थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ५१ वर्षांचे. त्यातच धक्कादायक बाब म्हणजे, हे ६३ वर्षीय गृहस्थ म्हणजे घानामधील कुणी साधासुधा मनुष्य नाही, हे महाशय तेथील चर्चमध्ये उच्चपदस्थ पाद्री. घानासारख्या मागासलेल्या आफ्रिकी देशात बालविवाह तर अतिसामान्य! मग या पाद्य्राच्या लगीनघाईचे कौतुक ते काय, असा प्रश्न पडणे साहजिकच. पण, घानामधील कायद्यान्वये मुलीचे लग्नाचे वय १८ वर्षे. आता याची पुरेपूर कल्पना असूनही, पाद्रींची कृपा या १२ वर्षीय कन्येवर झाली. हा विवाह सोहळा अगदी रितीरिवाजांसह धूमधडाक्यात वराडींच्या साक्षीने संपन्नही झाला. ना कुठे पोलिसांची आडकाठी, ना कुणाला कायद्याची भीती...
 
या प्रकरणावरून वादंग उठल्यानंतर, ‘घानाच्या स्थानिक परंपरा बाहेरच्यांना ठाऊक नाही, त्यांनी या सगळ्यात नाक खुपसू नये’ वगैरे चोराच्या उलट्या बोंबाही मारण्यात आल्याच. एवढेच नाही तर पाद्री महाशयांनी शारीरिक संबंधांसाठी नव्हे, तर ‘आध्यात्मिक कर्तव्यां’साठी हा विवाह योजल्याचेही कारण देण्यात आले. हे पाद्री आजोबा आनंदाने यंदा तिसर्‍यांदा बोहल्यावर चढले. विवाह सोहळ्यात बुवा ते बुवा, बायाही तितक्याच उत्साहात. बायांनीही नववधूशी लगीन सोहळा पार पडताच, लाजर्‍याबुजर्‍या कानगोष्टी केल्या. नवर्‍याला कसे खूश ठेवायचे, त्यासाठी मग कसा सुगंधी परफ्यूमचा वापर करायचा वगैरे ‘नवर्‍याला आकर्षित करण्याच्या टिप्स’नेही ती न उमललेली कळी खुडण्याआधीच कोमेजून गेली असावी. आता लग्नविधी झाले, म्हणजे संसार होईल सुखाचा, असेही नाही. त्या १२ वर्षीय कन्येचा विवाह सर्वसामान्य पुरुषाशी झाला असता, तरी एक वेळ ठीक; पण इथे ते ६३ वर्षीय पाद्री म्हणजे असामान्य, दिव्य व्यक्तिमत्त्व. आता अशा धार्मिक, आध्यात्मिक महापुरुषाबरोबर संसाराचा गाढा हाकायचा म्हणजे त्या मुलीचीही तशी तयारी नको का? म्हणूनच आणखीन एका विधीचेही सोपस्कार करायलाच हवे. त्या बिचार्‍या द्वादश वर्षीय कन्येला पूर्णतः शुद्ध, पवित्र करूनच पाद्री तिला ‘एक्सेप्ट’ करतील. पाद्री महाशयांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तिला यथोचित ‘तयार’ केले जाईल. मग यामध्ये संतानप्राप्ती हाही भाग आपसूकच आला...

घानामध्ये बालविवाहाला कायद्यानुसार बंदी असली तरी संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली आजही तिथे मुलींना विवाहबंधनात कैद केले जाते. ‘गर्ल्स नॉट ब्राईड’ नामक एका सामाजिक संस्थेच्या आकडेवारीनुसार, घानामध्ये वयाची १८ वर्ष पूर्ण करण्यापूर्वीच १९ टक्के मुलींची लग्न उरकली जातात, तर त्यापैकी आपला १५वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच पाच टक्के मुली वैवाहिक आयुष्यात ओढल्या जातात. ‘युनिसेफ’च्या म्हणण्यानुसार, एकट्या घानामध्ये बालवधूंची संख्या ही दोन दशलक्षच्या घरात. तसेच २०-२४ वर्ष वयोगटातील पाचपैकी एका मुलीचे लग्न हे वयाची १८ वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच झालेले. यावरून घानामधील बालविवाहाच्या सामाजिक समस्येचा परीघ लक्षात यावा.त्यामुळे एकीकडे चर्च ही व्यवस्था आधुनिक नीतिमूल्ये, मानवाधिकार, महिलांचे हक्क यांविषयी चिंता प्रकट करत असताना, याच व्यवस्थेतील पाद्री बालविवाहाच्या परंपरेला असे उचलून धरताना दिसतात. आता तेथील पाद्री अल्पवयीन मुलीला पत्नी म्हणून घरी आणू शकतो, तर आम्ही का नाही, असा घानामधील अन्य तरूण मुलांचा, प्रौढ पुरुषांचा आणि म्हातरचळ लागलेल्या वृद्धांचा समज मग गैर कसा ठरावा? आता याविषयी व्हॅटिकनमधील पोपपासून ते स्वतःला पुढारलेले, पुरोगामी मानणारे जगभरातील ख्रिस्ती धर्मोपासक घानामधील त्यांच्याच धर्मबांधवांना बालविवाहापासून परावृत्त करतील का?


 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची