जबाबदार ‘सिटीझन सायन्स’

    03-Apr-2024   
Total Views |
Datta Pednekar
 
वसईतील किनार्‍यांच्या भटकंतीत विविध जीवांचे छायाचित्रण करता-करता अनेक प्रजातींची नव्याने नोंद करणारे, ‘सिटीझन सायन्स’चे पुरस्कर्ते, छंदिष्ट छायाचित्रकार दत्ता पेडणेकर यांचा प्रवास...

भारतातून प्रथमच ‘कोस्टासिएला पॅलिडा’ या समुद्री गोगलगायीच्या प्रजातीची नुकतीच नोंद करणारे, पेशाने छायाचित्रकार; पण किनार्‍यांवर भटकत जैवविविधतेच्या नोंदी घेण्याची आवड निर्माण झालेले, वसईतील रहिवासी दत्ता पेडणेकर. त्यांचा जन्म मुंबईतील मालाडचा. वडील ’एलआयसी’मध्ये कामाला असल्यामुळे, बोरिवलीच्या ‘जीवन विमा नगर एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेत त्यांचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण झाले. दहावीच्या परीक्षेच्या काही दिवस आधीच त्यांच्या आईचे अकाली निधन झाल्यामुळे, दहावीची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाही. पण, स्वतःला सावरत, बोरिवलीतील ’स्कायलॅब कलरलॅब’ या फोटोग्राफिक पेंटिंग लॅबमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. फोटोग्राफी आणि फोटोग्राफिक पेंटिंगबद्दल चांगली माहिती तसेच प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनीही काही ठिकाणी जाऊन प्रशिक्षण दिले. छायाचित्रण (फोटोग्राफी) खूप प्रसिद्धी नसलेला, तो काळ होता. त्यामुळेच पेडणेकर यांनी महाराष्ट्र तसेच बाहेरील काही राज्यांमध्ये नव्याने सुरू झालेल्या फोटोग्राफिक पेंटिंगच्या स्टुडिओमध्ये जाऊन तिथे प्रशिक्षण दिले आहे.

१९८४ ते २०१६ असा प्रदीर्घ काळ नोकरी केल्यानंतर, त्यांनी स्वतःच्याच व्यवसायातच जम बसवायचे ठरविले. पुढे त्यांनी वसईमध्ये २००० साली स्वतःचा स्टुडिओ सुरू केला. मात्र, व्यावसायिक फोटोग्राफीबरोबरच २०१३ पासून त्यांना वन्यजीव छायाचित्रणाची देखील गोडी निर्माण झाली. विविध अधिवासातील प्राण्यांचे, पक्ष्यांचे छायाचित्रण त्याबरोबरच सूक्ष्मजीवांची ’मायक्रो फोटोग्राफी’ ते करत असत.वसई-विरारमध्ये कार्यरत ’नेस्ट’ या संस्थेचे ते सभासद असून, या संस्थेमार्फत छायाचित्रणाशी संबंधित कार्यशाळा, प्रदर्शने, नेचर ट्रेल्सचे आयोजन केले जाते. छायाचित्रणात आवड असणार्‍यांसाठी, या संस्थेमार्फत मोफत कार्यशाळांचे आयोजन केले जाते. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ूछायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येते. विविध नेचर ट्रेल्सचे विनामूल्य आयोजन करून, त्या माध्यमातून जनजागृतीचे काम ही संस्था करते. ग्रामीण भागातील किंवा आदिवासी भागातील शाळांमध्ये बहुतेकवेळा पशु-पक्ष्यांविषयी अज्ञान असल्यामुळे, अनेकदा वन्यजीवांना शिकारीचा आणि तस्करीचा धोका असतो. हे ओळखूनच ’नेस्ट’ ही संस्था अशा परिसरातील शाळांमध्ये जाऊन, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम करते. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून या जनजागृतीचा फायदा होत असून, शिकारीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचे, ते अभिमानाने सांगतात.

विशेष म्हणजे, आजवर दत्ता पेडणेकर यांनी आश्रमशाळेतील काही मुलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात दिला आहे. मायक्रो-फोटोग्राफीविषयी पहिल्यापासूनच असलेली ओढ त्यांना कोरोनाच्या काळात अधिक आकर्षित करू लागली. याचे मुख्य कारण ठरले, समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणारी सूक्ष्मजीवांची काही सुंदर छायाचित्रे. मुंबईतील किनार्‍यांवरचे जलचरांचे जग जसे त्यांना खुणावत असे, तसे त्यांच्या धाकट्या मुलीने आपल्या वसईतही असे अनेक जलचर असतील, आपण ते शोधूया, असा हट्ट धरला आणि पेडणेकरांचा किनार्‍यांवरील ’सिटीझन सायन्स’चा कौटुंबिक प्रवास सुरू झाला.दत्ता आणि प्रतिभा पेडणेकर हे दाम्पत्य. त्यांच्या मुली प्रज्ञा आणि प्राची अशा चौघांनी एकत्रितपणे वसईतील किनार्‍यांची भटकंती सुरु केली. पहिले दोन वर्षं अक्षरशः कोणताही सूक्ष्मजीव दृष्टीसही न पडलेल्या, या कुटुंबाने २०२२ मध्ये पहिली समुद्री गोगलगाय पाहिली. त्याचे छायाचित्र काढून, अभ्यासक विशाल भावे यांना पाठविल्यानंतर, समुद्री गोगलगायीची ती प्रजात जवळजवळ १०० वर्षांनी दिसल्याची विलक्षण नोंद करण्यात आली. जगभरात आढळणार्‍या ’नुडीब्रँचेस’च्या ३ हजार, ३०० ज्ञात प्रजातींपैकी दत्ता यांनी वसईच्या किनार्‍यांवरूनच जवळपास ३५ नोंदी केल्या आहेत. यात काही नवीन प्रजातींच्या तर काही अज्ञात प्रजातींच्या नोंदींचा समावेश आहे.

छायाचित्रणाचा छंद जोपासताना, दत्ता यांच्या एका छायाचित्राची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली होती. एका ‘गेकोचा’ (पालीचा प्रकार) ‘आंबोली बूश फ्रॉग’ खाताना फोटो त्यांनी टिपला होता. या घटनेची नोंद होती; पण त्यासाठी पुरावा म्हणून उपयुक्त असलेले छायाचित्र नव्हते. दत्ता यांच्यामुळे जगभरातील ते पहिले छायाचित्र म्हणून गणले जाऊन, ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नलमध्ये संशोधक कृष्णा खान यांच्या साहाय्याने प्रकाशित करण्यात आले. तसेच ’कोस्टासिएला पॅलिडा’ या समुद्री गोगलगायीची भारतातून पहिलीच नोंद दत्ता यांच्यामुळे करण्यात आली. सागरी जीवांचे निरीक्षण करणे आणि त्यांच्या नोंदी करणे, हा आता पेडणेकर कुटुंबासाठी छंदच झाला आहे.”पर्यावरणातील किंवा निसर्गातील प्रत्येक सजीव या ना त्या प्रकारे उपयोगात येतोच. माणूस मात्र सदैव या विपुल संपदेचे नुकसानच अधिक करतो, असे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे याबाबत मानवाने आणि विशेषतः तरूण पिढीने अधिक जागृत असायला हवे.“ असे म्हणत दत्ता यांनी ’सिटीझन सायन्स’चे महत्त्व विशद केले. जबाबदार ‘सिटीझन सायन्स’च्या जोरावर अशा प्रकारे विज्ञान आणि पर्यावरण क्षेत्रात मोलाचे योगदान देणार्‍या दत्ता पेडणेकर यांना दै. ’मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



 

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.