रा.स्व.संघाने बाबूजींना त्यांचं पहिलं गाणं मिळेपर्यंत साथ दिली : सुनील बर्वे
29-Apr-2024
Total Views |
गीतरामायणाचे संस्कार आपल्यावर करणाऱ्या बाबूजींचा चरित्रपट ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ १ मे रोजी होणार प्रदर्शित.
रसिका शिंदे-पॉल
मुंबई : योगेश देशपांडे दिग्दर्शित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Swargandharva Sudhir Phadke) हा चित्रपट महाराष्ट्रभरात १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. बाबूजींच्या जीवनावर आधारित या संगीतमय चरित्रपटात अभिनेते सुनील बर्वे सुधीर फडके यांची भूमिका साकारणार आहेत. ‘महाएमटीबी’शी गप्पा मारताना सुनील बर्वे (Swargandharva Sudhir Phadke) यांनी चित्रपटात बाबूजींच्या जीवनातील कोणते पैलु प्रकर्षाने दाखवणार याबद्दल भाष्य केले आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाबूजींच्या आयुष्यात किती महत्व होते हे देखील दाखवले जाणार असल्याचे बर्वे म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेव संघाचे बाबूजींच्या जीवनातील महत्व सांगताना सुनील बर्वे म्हणाले, “बाबूजी मुंबईत आल्यापासूनच त्यांचा खडतर प्रवास सुरु झाला होता. गाणी गाऊन ते स्वत:चा उदरनिर्वाह करत होते. अशा कठिण प्रसंगात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक स्वयंसेवकांनी त्यांना मदत केली होती. आणि स्वयंसेवकांच्या मदतीमुळे ते कलकत्त्यापर्यंत पोहोचले होते. बाबूजींना त्यांच्या जीवनातील पहिलं गाणं मिळेपर्यंत संघानेच साथ दिली होती. याशिवाय संघाची अनेक गाणी बाबूजींची संगीतबद्ध केली होती. तसेच, चित्रपटात बाबूजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प.पू.डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांची भेट पाहाला मिळणार आहे. शिवाय संघासाठी बाबूजींनी केलेलं कार्य देखील प्रेक्षकांना याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे”, असं देखील बर्वे म्हणाले.
बाबूजींची भूमिका साकारण्यापुर्वी एक अभिनेता म्हणून अभ्यास कसा केला हे सांगताना सुनील बर्वे म्हणाले, "बाबूजींबद्दल अनेकांनी त्यांची मतं लिहून ठेवली आहेत. तर त्यांच्याविषयी अनेक दिग्गजांनी केलेल्या लिखाणातून मला मुळात एक माणूस म्हणून बाबूजी कसे होते? त्यांच्या स्वभाव कसा होता? त्यांची लोकांशी बोलण्याची शैली कशी होती हे सगळं अभ्यासलं", असा पुर्वतयारीचा अनुभव त्यांनी सांगितला.