नाशिक लोकसभेत चक्र फिरली! शांतीगिरी महाराज लढविणार निवडणूक

    26-Apr-2024
Total Views |
nashik loksabha election



मुंबई :     देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. राज्यातील एकूण ८ मतदारसंघात मतदान सुरू होत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये धार्मिक रंगात राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीकडून शांतीगिरी महाराज निवडणूक लढविणार आहेत. या निर्णयामुळे नाशिकमधील लोकसभेची चक्रे फिरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महायुतीकडून शिवसेनेकडून हेमंत गोडसे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यासंदर्भात गेल्या महिन्यात खा. श्रीकांत शिंदे यांनी सुतोवाच केले होते. त्यानंतर महायुतीत पेच निर्माण झाला होता. एकंदरीत, नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी शांतीगिरी महाराज आणि हेमंत गोडसे या दोघांनाही महायुतीकडून निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे महायुतीकडून नाशिकमधून कोण निवडणूक लढविणार, हे पाहणे महत्त्वाचे असेल.


हे वाचलंत का? - राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान


विशेष म्हणजे नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरण्यावर शांतिगिरी महाराज ठाम आहेत. त्यांना महायुतीकडून तिकीट मिळण्याचा विश्वास होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न पण केले. हेमंत गोडसे हे नाशिक मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केली होती. शिंदेंच्या घोषणे नंतर शांतिगिरी महाराज नाराज झाले. त्यांनी तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला होता.

शांतिगिरी महाराज यांनी २०१९ मध्ये भाजपकडून छत्रपती संभाजीनगर मधून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, ते पराभूत झाले. आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रात त्यांचे मोठे काम आहे. शांतीगिरी महाराज यांच्या या भूमिकेला उपस्थित जय बाबाजी भक्त परिवाराने दोन्ही हात उंचावून पाठिंबादेखील दिला होता. नाशिक का खासदार कैसा हो, शांतीगिरी बाबा जैसा हो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. या बैठकीस प्रचारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.