मुंबई, दि.२२ : यंदा मुंबई महापालिकेने कंत्राटदारांना नालेसफाई सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि ते संपल्यानंतर, अशा तीन टप्प्यांमध्ये चित्रफित व छायाचित्रे काढून ती आपल्या सॉफ्टवेअरवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. त्यात प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअल टाइम जिओ टॅग) याचा समावेश असणार आहे.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरु आहेत. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने कंत्राटांमध्ये यंदा सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे. प्रत्येक कामासाठी दृकश्राव्य चित्रफित (व्हिडिओ क्लीप) आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पैकी आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ३७८ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ४७.६० टक्के गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी ३१ मे पर्यंत नाल्यातील गाळ काढण्याची कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.
आत्तापर्यंत करण्यात आलेली कामे
विभाग उद्दिष्ट कामे टक्केवारी
(मेट्रिक टन) (मेट्रिक टन)
१) शहर ३० हजार ९४० १० हजार ४४० ३३.७४
२) पूर्व उपनगर १ लाख २३ हजार ५५३ ५९ हजार ३४४ ४८.०३
३) पश्चिम उपनगर २ लाख ३५ हजार ०२१ ९९ हजार ८०२ ४२.४७
४) मिठी नदी २ लाख १६ हजार १७४ १ लाख ४५ हजार ८०८ ६७.४५
५) लहान नाले ३ लाख ६३ हजार ५३३ १ लाख ४९ हजार २३० ४१.०५
६) महामार्गांलगत ५२ हजार ५६० २१ हजार ७५२ ४१.३९