जगातील समृद्ध शहरांमध्ये मुंबई सलग तिसऱ्यांदा विराजमान

जागतिक वृक्षनगरी बहुमान पटकावण्यात मुंबईची हॅट्ट्रीक

    22-Apr-2024
Total Views |

bmc


मुंबई, दि.२२ :
विविध क्षेत्रांमध्ये सतत अग्रेसर असलेल्या मुंबई महानगराने पर्यावरण संतुलनासाठीही वेगवेगळे उपक्रम राबवित जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबई सदा हरित राहावी, येथील हवा शुद्ध राहावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने वृक्षलागवड आणि संवर्धनावर भर दिल्याचे फलित म्हणून मुंबईने सलग तिसऱ्या वर्षी (२०२३) ‘जागतिक वृक्ष नगरी’चा पुरस्कार पटकावला आहे. जगभरातील हरित शहरांच्या यादीत आपले स्थान बळकट केल्यामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्व‍िनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्च‍िम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या उपस्थ‍ितीत दि. २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने ‘जागतिक वृक्ष नगरी’चे मानपत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आले. आर्बर डे फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी डॅन लॅम्बे व अन्न आणि कृषी संघटनेच्या वने विभागाचे सहायक संचालक हिरोटो मित्सुगी यांच्या स्वाक्षरीनिशी या बहुमानाचे प्रमाणपत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था असलेली अन्न आणि कृषी संघटना ही संस्था जगभरात अन्नाची टंचाई कमी करणे तसेच भूकबळींचे प्रमाण रोखणे या उद्दिष्टासाठी कार्यरत आहे. तसेच मागील सुमारे ५१ वर्षांहून अधिक काळ जगभरात वृक्ष लागवड व संवर्धन करीत असलेल्या आर्बर डे फाउंडेशन या अमेरिका स्थित संस्थेने वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी केली आहे. सन २०२७ पर्यंत जगभरात मिळून ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे या फाउंडेशनचे ध्येय आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या योगदानामुळे मुंबईने सलग तिसऱयांदा (सन २०२३) हा बहुमान पटकावला आहे. मुंबई महानगरात सध्या २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. तसेच मागील काही वर्षात नागरी वनीकरण (जपानी मियावाकी) पद्धतीने ५ लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत.
या पाच मानांकनांची मुंबईने केली पूर्तता

झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, नागरी वने आणि झाडांचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी नियम निश्चित करणे, स्थानिक वृक्ष संपदेची अद्ययावत यादी किंवा मूल्यांकन राखणे, वृक्ष व्यवस्थापन योजनेसाठी संसाधनांचे वाटप करणे आणि नागरिकांना शिक्षित करण्यासाठी वार्षिक वृक्ष उत्सव आयोजित करणे, अशी पाच मानांकनाची मुंबईने पूर्तता केली आहे. सलग तिसऱयांदा मुंबई महानगराची जागतिक वृक्ष नगरी बहुमानासाठी निवड होणे, ही बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संपूर्ण मुंबईकरांसाठी देखील अभिमानाची बाब आहे.