जलवाहिन्यांना गळती आणि पाणीटंचाईची धास्ती...

    02-Apr-2024   
Total Views |
Shortage in Mumbai's water supply

आधीच नदी-तलावांमध्ये पाण्याचा ठणठणात, त्यात जलवाहिन्यांना लागलेली गळती, पाण्याची उंचच उंच उडणारी कारंजी ही बहुतांश शहरांमधील स्थिती. अशा या जलवाहिन्यांमधील गळती आणि पाणीचोरीच्या समस्येमुळे पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे. त्यानिमित्ताने जलवाहिन्यांची गळती आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा लेख...

पाणीटंचाईचे एक प्रमुख कारण म्हणजे वितरण व्यवस्थेतील गळतीची समस्या. या गळतीबरोबरच जलवाहिन्या तोडून पाण्याची चोरीसुद्धा होत असते. यांसारख्या कारणांमुळे मुंबई, पुणे, नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठ्यात असमानता निर्माण झालेली दिसते. यावर उपाय म्हणून टप्प्याटप्याने मुंबईतील शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील विविध भागात जलवाहिन्या बदलण्याचा कार्यक्रम महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या अंतर्गत 300 मिमी जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा कार्यक्रम निश्चित केला गेला आहे. पण, यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.गेल्यावर्षी समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव तुडुंब भरले असले, तरी अनेक भागांत नागरिकांकडून पाणीटंचाईच्या अनेक तक्रारी येत आहेत.वडाळा, कुर्ला, मालाड, कांदिवली, बोरिवली भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याचे तेथील माजी नगरसेवकांनी पालिकेच्या निदर्शनास वेळेवेळी आणून दिले आहे. काही दिवसांपूर्वीच विलेपार्ले व अंधेरी परिसरातील नागरिकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलनही केले होते. त्यानंतर पालिकेने अनेक भागात जलवाहिन्यांमधील तांत्रिक दोष दूर करण्याचे व जलाशयांच्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे काम सुरू केले आहे.

एकीकडे पुरेसे पाणी मिळत नसताना दररोज केल्या जाणार्‍या पाणीपुरवठ्यातील 25 टक्क्यांहून जास्त पाणी गळती व चोरी होऊन पाण्याची नासाडी होते. या सर्व बाबींची दखल घेऊन पालिकेने 300 मिमी जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच यापेक्षा मोठ्या जलवाहिन्यांतील गळती थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास पालिकेच्या जलखात्याने व्यक्त केला आहे.जुन्या जलवाहिन्या बदलून त्या ठिकाणी नवीन वाहिन्या टाकणे याशिवाय काही जलवाहिन्यांच्या आतील बाजूस सिमेंट व पॉलिमरचा गिलावा करून झिरपणारे पाणी रोखण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया 29 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर कंत्राटदारांची नियुक्ती होईल.

परदेशी तंत्रज्ञानाने थांबविणार पाणीगळती

मुंबईतील जुन्या जलवाहिन्या फुटून होणारी पाणीगळती ही पाणीटंचाईमागील एक प्रमुख कारण आहे. तेव्हा, अशा पाणीकपातीला तोंड देण्यासाठी 50 वर्षांपेक्षा जुन्या जलवाहिन्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी परदेशी तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. यासाठी जल अभियंता विभागात या तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. याबाबत देखील लवकरच निर्णय अपेक्षित आहे.वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्या भूमिगत मुख्य जलवाहिनीतून दि. 7 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याची घटना घडली. तसेच त्याआधी दि. 2 डिसेंबरला मालाड-मार्वेला 36 इंच व्यासाची जुनी जलवाहिनी फुटल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी फुकट गेले होते. याआधीही अशा अनेक घटना घडल्या होत्या. मात्र, अशा 50 ते 100 वर्षे जुन्या मोठाल्या जलवाहिन्या बदण्याचे मोठे काम होते. त्यामुळे त्या तिथे नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी जागा मिळणे कठीण होऊन बसते. यावर तोडगा म्हणून जुन्या जलवाहिन्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.मजबुतीकरण कामामध्ये फुटलेल्या जलवाहिनीत दुसरी फोल्डिंग करणारी ‘फॉम’ पद्धतीची जलवाहिनी बसविणे वा रसायनाचा वापर करणे आदी तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचे मजबुती करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. परदेशात असे मजबुतीकरण केले जाते. त्यामुळे जुन्या वाहिनींचे आयुर्मानसुद्धा वाढीस लागू शकते.

परदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने 900 दशलक्ष लीटर पाण्याची गळती रोखणार

मुंबई महापलिकेच्या जलखात्याने पाणीगळती रोखण्यासाठी जपानचे तंत्रज्ञान अंगीकारण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत सेन्सरवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे जलवाहिन्यांमध्ये नेमकी कुठे गळती आहे, ते शोधून काढण्यास मदत होईल. परिणामी, दुरुस्तीक्रिया सोपी होणार आहे व गळतीमुळे वाया जाणार्‍या पाण्याची देखील बचत होणार आहे. जपानी सेन्सर आधारित तंत्रज्ञानामुळे रात्रीच्या वेळीही गळतीची समस्या शोधता येणार आहे. जलवाहिन्यांना गळती लागली आहे, हे वाहिनीमधून पाणी बाहेर पडल्यावर सहसा लक्षात येते. पण, या सेन्सरमुळे ही माहिती सुरुवातीलाच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पाण्याची गळती रोखता येणार आहे.मुंबईला दररोज 3 हजार, 850 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. परंतु, गळती व चोरीमुळे तब्बल 800 ते 960 दशलक्ष लीटर पाणी मुंबईकरांपर्यंत पोहोचतच नाही.

एकूण पाणीपुरवठ्यापैकी अंदाजे 25 ते 30 टक्के पाणी गळती व चोरीमध्ये वाया जाते. त्यामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईमुळे मोठ्या तुटवड्याचा सामना करावा लागतो. यामधून मुंबई महापालिकेला मोठ्या महसुलालाही मुकावे लागते. असे हे महसुलाचे नुकसान होत असताना मुंबईकर लाखो लीटर पाण्यापासून वंचित राहतात. गेल्यावर्षी मुंबईतील वांद्रे, मालाड, अंधेरी पूर्व आणि दहिसरमध्ये जलवाहिन्या फुटल्याने अनेक कोटी लीटर पाणी वाया गेले होते. त्यामुळे नुकतेच पाणीचोरी, गळती व टँकरने पाणीपुरवठा करणे याबाबत अहवाल द्या, असे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत.पाणीगळती व पाणीचोरी प्रकारांना कायमचा चाप लागावा, या दृष्टीने दोन आठवड्यांत विशेष तपास पथक (डखढ) स्थापन करावे आणि या पथकाने पाणीगळती, पाणीचोरी व टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत योग्य ते नियमन करावे व सखोल तपास करून दोन महिन्यांत प्राथमिक अहवाल द्यावा, असे आदेश राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या नगरविकास विभागाला दिले आहेत.
 
मुंबईतील काही जलवाहिन्यांमधील पाणीगळती

दोन महिन्यांत नागरिकांकडून पाणीगळतीच्या सुमारे 2 हजार, 921 तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. तसेच गेल्या दोन वर्षांत 55 हजारांहून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. यापैकी सर्वाधिक तक्रारी पूर्व उपनगरातील होत्या व दोन महिन्यांतील तक्रारींमध्ये अंधेरी व जोगेश्वरी पूर्व भागातील तक्रारींचा प्रामुख्याने भरणा होता. यापैकी 1 हजार, 526 तक्रारींचे निवारण करण्यात पालिकेला यश मिळाले.मुंबईचा विचार करता, जलवाहिन्या सुमारे 380 किमी लांबीच्या आहेत. परंतु, पाणीपुरवठा बंद असताना बाहेरील पाणी वाहिनीत शिरून पाणी दूषित होण्याची शक्यता असते व त्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव होतो. या पाणीगळती व दूषित पाण्याच्या समस्या दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून ही कामे तत्परतेने पूर्ण होतील, हीच आशा.


 

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.