मुंबई, दि.१९ : मुंबई महानगरात अरुंद गल्ल्या आणि उंच इमारती आहेत. मात्र मुंबई अग्निशमन दल आपत्कालीन परिस्थितीत अग्निसुरक्षा आणि नागरिकांना बाहेर काढण्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सदैव तत्पर असते. अग्निशमन कवायती पाहताना प्रत्येक अधिकारी आणि जवानांतील समन्वय, बळ, सांघिक प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असून हाच समन्वय प्रत्यक्ष घटनास्थळी कायम ठेवण्याची अपेक्षा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केली.
मुंबई अग्निशमन दलाच्या आग प्रतिबंधक आणि संरक्षणासाठी क्विक-रिस्पॉन्स व्हेइकल्स, IoT-आधारित सिस्टीम आणि फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट यासारख्या नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याच्या व्यापक कामाची देखील बीएमसीने कबुली दिली आहे. अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी बीएमसीने २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पात २३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दल अंतर्गत वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२४ ची अंतिम फेरी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात पार पडली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अमित सैनी बोलत होते. मुख्य अग्निशमन अधिकारी आर एन अंबुलगेकर यांनी सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सैनी म्हणाले की, सैन्यदलातील तत्परता, निर्णयक्षमता, एकीचे बळ मी खूप जवळून पाहिले आहे. तसाच अनुभव आज या स्पर्धांत पाहता आला. सीमेवरही प्रत्येक जीव वाचविण्यासाठी सांघिक प्रयत्न खूप गरजेचे असतात. त्याचप्रमाणे मुंबईसारख्या महानगरात जेव्हा एखादी दुर्घटना घडते, तेव्हाही प्रत्येक क्षणाला खूप महत्त्व असते. मानव आणि यंत्र यातील समन्वय जितका योग्य असणार तितकीच प्रत्येक मोहीम यशस्वी ठरणार, अशा प्रकारचा मोलाचा सल्ला सैनी यांनी जवानांना दिला.
प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अग्निशामक विनायक देशमुख यांनी लिहिलेल्या ‘शौर्यम्’ या पुस्तकाचे प्रकाशन अमित सैनी यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवा पदक प्राप्त अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून वडाळा प्रशिक्षण केंद्रातील अविनाश शिर्के यांचा सन्मान करण्यात आला.
प्रात्यक्षिक स्पर्धेतील विजेते
फायर पंप ड्रिल स्पर्धा
प्रथम क्रमांक - कांदिवली अग्निशमन केंद्र
द्वितीय क्रमांक - भायखळा अग्निशमन केंद्र
तृतीय क्रमांक - कांदरपाडा अग्निशमन केंद्र
ट्रिपल एक्सटेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल स्पर्धा
प्रथम क्रमांक - बोरिवली अग्निशमन केंद्र
द्वितीय क्रमांक - भायखळा अग्निशमन केंद्र
तृतीय क्रमांक - फोर्ट अग्निशमन केंद्र
सर्वोत्कृष्ट संघ
बोरिवली अग्निशमन केंद्र
सर्वोत्कृष्ट अग्निशामक
विठ्ठल सावंत, यंत्रचालक