शास्त्रीय गायनाचा युवा चेहरा...

    19-Apr-2024   
Total Views |

jpg
 
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा शास्त्रीय संगीताचा वारसा चालवणारे, नवीन पिढीतील शास्त्रीय गायक आशिष विजय रानडे यांच्या सुरेल जीवनप्रवासाविषयी...
 
शिक जिल्ह्यातील मनमाड येथे १९८६ साली आशिष विजय रानडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लघु पाटबंधारे खात्यात नोकरीला, तर आई वैशाली या गायिका. वडिलांना हार्मोनियम वाजविण्याची आवड होती. ग्वाल्हेर घराण्याचे शिक्षण घेतलेले आजोबा विश्वनाथ हे गायक, तर आजी इंदुबाई गाण्यांचे वर्ग घेत असत. आशिष यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण छत्रे न्यू इंग्लिश स्कूलमधून त्यांनी पूर्ण केले. घरात गायनाचे वातावरण असल्याने आशिष यांनाही गायनाची आवड निर्माण झाली. आई-वडील ऑर्केस्ट्रामध्येही काम करत. सहाव्या वर्षीच आशिष तबला वादनही शिकले. शाळेतील गायन स्पर्धांमध्ये ते सहभाग घेत. नवव्या वर्षी जळगाव आकाशवाणीच्या ‘उगवते तारे’ कार्यक्रमात त्यांनी शास्त्रीय गायन केले. यावेळी त्यांनी ‘दुर्गा’ राग गायला होता. कीर्तन-भजनाला हार्मोनियम, तबल्याची साथ ते देऊ लागले. घरी संगीतमय वातावरण असले तरी या क्षेत्रात करिअर करण्याचा त्यांचा विचार नव्हता.
 
दहावीनंतर मनमाड कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेला त्यांनी प्रवेश घेतला. वडिलांचे मित्र शाम देशपांडे हे पंडित जसराज यांचे मित्र होते. मग त्यांच्याकडे आशिष यांनी तालीम घेण्यास सुरुवात केली. सकाळी ६ वाजता रियाज आणि नंतर कॉलेज असा त्यांचा दिनक्रम. पुढे पदवीच्या दुसर्‍या वर्षाला असतानाच तबला विशारद असलेले आशिष आरंभ महाविद्यालयात अर्धवेळ तबला शिक्षक म्हणून रुजू झाले. दुपारपर्यंत कॉलेज नंतर ‘मनमाड पॅसेंजर’ने सायंकाळी आरंभ महाविद्यालयात पोहोचायचं व पुन्हा रात्री ‘पंचवटी एक्सप्रेस’ने मनमाड गाठायचं, हे वेळापत्रक ठरलेलं. नाशिकला नोकरीनिमित्ताने येणे-जाणे सुरू झाल्याने संगीतात करिअर होऊ शकते, याची त्यांना जाणीव झाली.
 
मुलांना तबला शिकवताना ते गायनही करत. तेव्हा त्यांच्या गायनाचे कौतुक होऊ लागले. महाविद्यालयातील कार्यक्रमात गायक अविराज तायडे यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडे शास्त्रीय गायन शिकण्याची आशिष यांना इच्छा होती. पण, त्यासाठी काय करावे, हे समजत नव्हते. वडिलांचे मित्र उदय गाडगीळ त्यांना अविराज यांच्याकडे घेऊन गेले. पहिल्यांदा तायडे खोलीत गात होते आणि आशिष बाहेर वाट पाहत राहिले. अखेर तिसर्‍या वेळेस तायडे यांची भेट झाली. मनमाडहून ये-जा करणे शक्य नसल्याने नाशिकमध्ये फ्लॅट घेतला. तिथूनही तायडे यांचे घर लांब होते. शेवटी त्यांच्या घराजवळ आशिष कॉट बेसिसवर राहू लागले. शास्त्रीय गायनात रूची असल्याने तबला शिक्षकाची नोकरी सोडली. पुढे देवळाली येथील शाळेत, अशोका स्कूल, ऑर्किड शाळेतही काही वर्षं संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली.
 
अमरावती येथून त्यांनी ‘बीए’ केले. २०१० साली भारत सरकारची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत युवा कलाकारांसाठी असलेली युवा शिष्यवृत्ती पहिल्याच प्रयत्नात मिळाली. २०११ साली अविराज तायडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्याऐवजी आशिष यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम केला. पुढे तायडे यांची प्रकृती सुधारली. यानंतर अनेक ठिकाणी आशिष यांना गायनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रणे मिळू लागली. ‘एम.ए’ पूर्ण केल्यानंतर के.के.वाघ महाविद्यालयात संगीत प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. २०१६ साली आशिष यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ शास्त्रीय गायनाचा निश्चय केला. अविराज तायडे यांची तालीम पूर्ण झाल्यानंतर आशिष शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्याकडे धडे घेऊ लागले. अमरावती विद्यापीठातून त्यांनी ‘डॉक्टरेट’ही मिळवली. कलाश्री संगीत गुरुकुलचा शुभारंभही आशिष यांनी केला.
 
भारतरत्न भीमसेन जोशी यांनी तयार केलेल्या ‘कलाश्री’ रागावरून आशिष यांनी गुरुकुलला ‘कलाश्री’ नाव दिले. यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे आशिष देतात. ‘सूर हिंडोल (दुबई)’, दिल्लीतील ‘आरंभ युवा शास्त्रीय संगीत महोत्सव’, मुंबईतील ‘भीमसेन महोत्सव’, मिरज येथील ‘अब्दुल करीम खां महोत्सव’ अशा अनेक ठिकाणी आशिष यांनी गायन केले. आतापर्यंत त्यांचे साडेतीन हजारांहून अधिक गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. ख्याल आणि अभंग गायन ही त्यांची विशेषता. भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये ‘स्वराधिराज महोत्सव’ सुरू केला. आशिष यांच्या पत्नी दिव्या रानडे यादेखील हार्मोनियम वाजवतात. संगीत दिग्दर्शन, संगीय संयोजनातही आशिष यांना विशेष रुची. गुरू अविराज तायडे, आनंद भाटे, प्रसाद खापर्डे यांच्यासह कुटुंबीयांचे त्यांना नेहमीच सहकार्य लाभते. आशिष यांच्याकडे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी अशा विविध देशांतील २५ हून अधिक जण ऑनलाईन पद्धतीने शास्त्रीय गायनाचे धडे घेत आहे.
 
“चांगला गुरू मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे. कार्यक्रम करणारे खूप आहेत, पण शिकविणारे खूप कमी. त्यामुळे माझा शिकवण्याकडे अधिक कल असतो. प्रत्येक शाळेत संगीत शिक्षक असावा. दर महिन्याला शास्त्रीय गायकाची कार्यशाळा शाळेत घ्यायला हवी, अशाने मुलेही प्रेरित होतील,” असे आशिष रानडे सांगतात. किराणा घराण्याची गायकी आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा वारसा चालवणारे नवीन पिढीतील एक महत्त्वाचे नाव म्हणून डॉ. आशिष रानडे यांच्याकडे पाहिले जाते. आशिष यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा...
७०५८५८९७६७

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.