जागतिक वारसा दिन, अमूर्त वारसा म्हणजे काय?

    18-Apr-2024   
Total Views |

heritage
 
आज जागतिक वारसा दिन आपण साजरा करतो. पण खरंच नेमकं काय करतो? एकतर जुनी मंदिरं किंवा किल्ले, कातळशिल्पे, लेणी हे एवढंच. आपला वारसा एवढयापुरता मर्यादित कसा असू शकेल? आपण हा म्हणजे पाहता येईल. स्पर्श करता येईल असा वारसा ३ भागांत विभागू. एक काळ मुस्लिम आक्रमक भारतात येण्यापूर्वीचा, एक काळ साधारण सोळाव्या शतकातला, जेव्हा हिंदू राष्ट्र मराठ्यांनी उभारलं, आणि एक त्यानंतरचा आधुनिक इतिहासाचा काळ. यातला किती इतिहास आज सुस्थितीत आहे? मुस्लिम आक्रमकांनी उत्तरेकडून येताना मंदिरं पडण्याची जशी शर्यतच लावली. लेण्यांतूनही बुद्धाच्या, शिवाच्या मूर्ती म्हणून जिथे जिथे असतील त्यांची पडझड झाली. त्यानंतर वसाहतवादी आले. पोर्तुगीज, फ्रेंच, डच. त्यांनी किनारी भागात आपल्या वसाहती स्थापन केल्या. पैकी पोर्तुगीजांनी धर्म प्रसाराच्या नादात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा चोळामोळा केला. उत्तर कोकणात मुखतः वसईसारख्या निसर्गरम्य, शहरीकरणाचा म्हणावा तेवढा प्रभाव नसलेल्या भागात एकही हिंदूंचं म्हणावं असं वारसा स्थळ नाही. एक मोडका स्तूप काय तो आहे. वीरगळी नाहीत की मंदिरे नाहीत. सातवाहन कालीन किल्ल्याचेही तेच. शिवाजी महाराजननी कित्येक किल्ले डागडुजी करून घेतले परंतु या सह्याद्रीने आक्रमक थोपवायच्या नादात स्वतःची दुर्दशा करून घेतली. दक्षिण त्यामानाने सुरक्षित राहिली. पण मग उत्तरेकडे, किंवा इतर संबंध भारतात वारसा शल्लक राहिलाच नाही का? तर हो. आहे ना. सांगते..
 
आपण तसे मौखिक संस्कृतीचे पाईक. आजी आजोबांच्या गोष्टी आणि आईची अंगाई गीते ऐकत आपण मोठे होतो. गोष्टी राजाराणीच्या असतात, परीच्या असतात तशाच देवी देवतांच्या असतात आणि तशाच कष्ट करणाऱ्या शेतऱ्यांच्याही असतात. अंगाईत परसदार असतं.. न पाहिलेलं, त्यातली जुई मोगऱ्याची फुलं आपण कल्पनांनी पहिली असतात. चिऊताई असते, हल्ली सहसा अंगणात न येणारी, ओढा असतो, पायवाटेच गाव असतं. निंबोणीच झाडं असतात. रामायण महाभारताच्या कथा असतात कधी, कधी काही शब्द, कधीच न ऐकेलेले. काही भांड्यांची नावं, उपयोग माहिती नसलेली. राहाट असतं, जातं असतं. अकबराच्या दिलदार स्वभावाच्या गोष्टी असतात आणि आपल्याच पूर्वजांच्या फितूरीच्याही कथा असतात. हे मूल्यशिक्षण असतं आणि शिकवण असते. कुणाच्या अनुभवाची आणि कुणाच्या प्रेमाची. हाही वारसाच.
 
त्याजोडीला असते ती आपली भाषा. नवनवीन लागणारे शोध आणि जगाच्या पाठीवर घडणाऱ्या घटना. आज एक अर्थी संपूर्ण जग आपल्याशी जोडलं गेलंय. वसुधैव कुटुंबकं. वारसा कधी घराण्याचा असतो, कधी समाजाचा तर कधी राष्ट्राचा. जगाचा सुद्धा. ही प्रक्रिया कायम ठेवण्याचं काम विज्ञान करत असतं. आज आपण पुरातत्व शास्त्रातल्या वैज्ञानिक प्रगतीने, करोडो वर्षांपूर्वीचा आपला इतिहास शोधू शकतोय. नद्यांच्या पात्रातील जीवाश्मे अभ्यासात ज्या काळात लेखनाची कला अवगत नव्हती तेव्हांचेही संदर्भ आपल्याला मिळू लागलेत. या मानव जातीच्या विकासाचा पैस असा हातात येतोय. दीर्घ काळपर्यंत टिकून असलेली आणि मौलिक समजली जाणारी अशी एखाद्या देशाची संस्कृती, परंपरा, गुणविशेष वगैरे; राष्ट्राचा वारसा, ठेवा, वतन. म्हणजे हेरिटेज. वारसा.
 
आज या जागतिक वारसा दिनानिमित्त किल्ले, लेणी, बारवा यांच्यासहित आपल्या संस्कार रुपी वारशाचेही जतन संवर्धन करू. वारसा दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.