“राम जन्मला गं सखी”, बाबूजींचा सांगितिक प्रवास उलगडणाऱ्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

    17-Apr-2024
Total Views |
'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर भेटीला आला असून यात अजरामर गीतरामायणाची झलक मनाला भावणारी आहे.
 

sudhir phadke 
 
मुंबई : संगीत क्षेत्राला ‘गीतरामायण’ हा अलौकिक ठेवा देणारे बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ (Swargandharva Sudhir Phadke) हा भव्य सांगितिक चरित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटाची पहिली झलक रामनवमीच्या पुर्वसंध्येला दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे प्रदर्शित करण्यात आला. बाबूजींच्या संगीताचे चाहते सर्वदुर आहेत. त्यामूळे बाबूजींचा संगीत क्षेत्रातील प्रवास आणि वैयक्तिक, सामाजिक लढाई मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी (Swargandharva Sudhir Phadke) सगळेजण उत्सुक आहेत.
 
'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की, सुधीर फडके संगीताच्या ध्यासाने मुंबईत आले खरे पण सुरुवातीला प्रचंड संघर्ष त्यांच्या वाट्याला आला होता. अगदी मुंबई सोडून परत जा असेही शब्द त्यांच्या कानी पडले पण संगीत क्षेत्रात सुधीर फडके या नावाचा ठसा कायमस्वरुपी उमटवण्यासाठी त्यांनी जिद्दीने स्वत:ला सिद्ध केले आणि, प्रभात फिल्म कंपनीमध्ये पहिले संगीतकार म्हणून नियुक्त झाले. मग पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काम असो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट असो किंवा मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प.पू.डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांची भेट असो या सर्व घटना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे गीतरामायण कसे घडले, ग.दि.मा आणि बाबूजींची मैत्री हा सर्व प्रवासही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
 
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात अभिनेते सुनील बर्वे यांनी बाबूजींची भूमिका साकारली असून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ललिताबाई फडके यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सागर तळाशीलकर यांनी ग.दि.माडगूळकर यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. बाबूजी म्हटलं की महाराष्ट्रातील मोठं व्यक्तिमत्व हेच आपल्या डोळयांपुढे येतं. आणि याचमुळे १ मे महाराष्ट्र दिनी ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.