आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जगणे हे तंत्रज्ञानाइतके सोपे नाही. यामध्ये शेकडो हजारो खर्च दावणीला बांधले असतात. गुंतवणूक योजनेतून भार कमी करण्यासाठी आवश्यक ते नियोजन तुमचे कार्यसिद्धीस नेऊ शकते.पूर्वी बचत केली जायची गुंतवणूक नाही. काळ बदलला आता गुंतवणूकीचे स्वरूपही बदलले. या बदलत्या काळात व्यवहाराच्या बाबतीत माणसाने बदलायला हवे. महाविद्यालयीन काळापासूनच पैशाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक भार कमी होण्यास मदत होते.
नोकरदार वर्गाला ठराविक रक्कम मिळते तसे ठराविक खर्चही दिमतीला असतात.याशिवाय व्यवसाय करणाऱ्या मंडळींना मिळणारे उत्पन्न ठराविक नसते व खर्चही ठराविक नसतात. आपल्या जीवनशैलीनुसार खर्चाचे व गुंतवणूकीचे गणित मांडणे आवश्यक आहे. यासाठीच भुतकाळातील स्वानुभव वर्तमानातील योग्य बारकावे भविष्याचा अचूक वेध या तीन गोष्टींचा अचूक अभ्यास केल्यास आर्थिक नियोजन करणे सोपे जाते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न चांगले आहे थोडीफार गुंतवणूकही आहे अशावेळी तत्कालीन फायद्यापेक्षा त्याने भविष्यातील धोक्यावर विचार करणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ संबंधित व्यक्तीला घर घ्यायचे आहे चांगल्या प्रकारचे उत्पन्न असताना स्वस्त मिळतो म्हणून कामाहून अति लांब ठिकाणी घर घेणे व त्यातून जायचे यायचे खर्च,वैद्यकीय खर्च, वेळेचा खर्च,मानसिक स्वास्थ्य व भविष्यातील समस्या अशा गोष्टींचा लेखाजोखा मांडणे आवश्यक आहे. या उलट कार्यालयाजवळ घर घेतल्यास झालेली बचत, मानसिक स्वास्थ्यात सकारात्मकता, दळणवळणाचा वाचलेला खर्च अथवा मोक्याच्या ठिकाणी घर असल्यामुळे मिळणाऱ्या सुविधा यांचाही लेखाजोखा करत आपल्याला काय जास्त योग्य गुंतवणूक ठरेल याची तुलना करत आधीच घराचा निर्णय घेतल्यास भविष्यातील आढावा घेण्यास स्पष्टता येईल.
अर्थात हा निर्णय ऐपत आहे या मिथकावर अवलंबून आहे. खर्च करण्याची क्षमता असल्यास हा विचार लागू पडतो.त्यामुळे अशा वेळी मर्यादेचे रूपांतर क्षमतेत करणे हे महत्वाचे ठरते.योग्य गुंतवणूक केल्यास भविष्यातील नुकसानावर पडदा टाकत गुंतवणूकीतील परतावा मिळू शकतो.
गुंतवणूक करताना सखोल माहिती घेतल्यास फायदेशीर ठरते.आपली सवय, छंद, खर्चाची कारणे, म्हातारपणातील संभाव्य खर्च यांचे उत्तम नियोजन केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. कमवत असलेल्या १/३ वाटा हा गुंतवणूकीत टाकणे आजच्या जगात क्रमप्राप्त आहे. कारण आपले उत्पन्न वाढले तरी महागाई वाढते खर्च वाढतात यावेळी वाढलेला खर्च कव्हर करण्यासाठी भविष्यकाळात गुंतवणूकवरील व्याजदर आपली आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करतो.
केवळ आपला नाही पण आपल्या कुटुंबासह भविष्यात येणारे खर्च, मुलांचे शिक्षण,लग्न कार्य, इतर खर्च याशिवाय अनेक इतरत्र खर्च आपली पाठ सोडत नाही.अशावेळी मात्र वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो. पूर्वीच्या काळात स्त्रिया पतीच्या उत्पन्न अथवा स्वतःच्या उत्पन्नातील हिस्सा स्वयंपाकघरातील भांडयात ठेवत असत मात्र ती स्थूल गुंतवणूक नव्हती तर केवळ बचत होती.गुंतवणूकीसारखा परतावा बचतीत मिळत नाही.
पूर्वीचे लोक आपल्याला बचतीचे महत्व नेहमी सांगतात पण त्या मानाने गुंतवणूकीचे महत्व सांगत नाही. वाढत्या खर्चाचे गुणोत्तर मिळकतीशी जुळवायचे असल्यास गुंतवणूकवरील उत्पन्न कामी येते.अनेकदा अनेक जण एखाद्या आपल्या एफडीत,पोस्टात अथवा बँकेत आपली गुंतवणूक करतात त्यावर त्यांना मर्यादित उत्पन्न मिळत राहते परंतु काळाच्या ओघात ते अपेक्षित असलेले उत्पन्न नसते. अशावेळी म्युचल फंड,बाँड,इक्विटीतील गुंतवणूक अथवा डिबेंचर मधील गुंतवणूक कामाला येते.परंतू सर्वात मोठे प्रश्नचिन्ह म्हणजे वाढलेला 'हव्यास '..
हव्यासापोटी माणूस शेअर बाजारात इंट्रा डे खेळू लागतात व नेमका घात तिथेच होतो. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे रोजचे शेअर्स विकणे खरेदी करणे रोजच्या रोज नफा तोटा कमावणे अर्थात यात शेअर्सची डिलिव्हरी मिळत नाही. रोजच्या रोज खेळणारी व्यक्ती शेअर बाजारात चटक लागली तर वेळ पडल्यास सगळी गुंतवणूक त्यात कमवू किंवा घालू शकते.
मुख्यतः इंट्राडे ट्रेडिंग हे शेअर बाजार तज्ज्ञ,अथवा पूर्ण वेळ शेअर बाजारातील गुंतवणूकदार अथवा ब्रोकर अथवा त्या क्षेत्रातील संबंधित व्यक्तींसाठी असते. पगारदार माणसाने या भानगडीत पडू नये याचे मुख्य कारण यामध्ये २ वेळा नफा कमावला असल्यास १० वेळा तोटा होण्याची शक्यता असते. अर्थात कष्टाचा पैसा यात वाया जाण्याची शक्यता असते. गेलेले पैसे व गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून इंट्रा डे खेळताना सामान्य माणसाला फार सांभाळून खेळायला हवे जे बहुतांश वेळा होत नाही.
यासाठी गुंतवणूकीचे नियोजन करताना मात्र नोकरदारवर्गांने म्युचल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरते. याचे मुख्य कारण ती गुंतवणूक वर्षानुवर्षे ठेवल्यास त्यावर परतावा मिळत राहतो. स्वाभाविकच मिळणारा नफा हा बँकेच्या मुदतठेवीहून अधिक असतो. याशिवाय हे सगळे मॅनेज करणारा फंड मॅनेजर असतो.तो या सगळ्या निधीची काळजी घेतो. काही रकमेच्या मोबदल्यात आपले पैसै वेगवेगळ्या योग्य ठिकाणी पैसे गुंतवले जातात. यात अजून एक फायदा असतो की ज्यामध्ये तुम्ही एकाच शेअर्समध्ये अथवा गुंतवणूक व्यासपीठात गुंतवणूक न केल्याने तुमचे नफा तोटा गुणोत्तर अबाधित राहते. म्युचल फंडात देखील तोटा होतो परंतु तो इंट्रा डे तुलनेत कमी राहतो. तुमची गुंतवणूक एका फंडात न टाकता वेगवेगळ्या फंडात टाकणे फायदेशीर ठरते.
या म्युचल फंड गुंतवणूकीशिवाय इतर पोस्टाच्या योजना बँकेच्या मुदतठेवी, व इतर गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणूकीची मांडणी आधीच केल्यास भविष्यात किती खर्च येईल व किती उत्पन्न मिळू शकेल याची आधीची शहानिशा करून मांडणी केल्यास आपला हिरमोड होणार नाही. कदाचित गुंतवणूकीचे महत्व आता कळणार नाही परंतु भविष्यात ते अनन्यसाधारण आधाराचे स्त्रोत ठरते.
गुंतवणूक करताना आपल्या गरजा, भविष्यात त्याची मागणी पुरवठा, कुटुंबावर पडणार बोजा यांचा लेखाजोखा मांडल्यास नक्कीच ओझे हलके होऊ शकते. त्यासाठी नामी शक्कल म्हणजे गुंतवणूक करताना वेगवेगळ्या गुंतवणूकीच्या योजनेत वाचाव्यात गुंतवणूक सल्लागारांनाही विचारल्यास त्याचा आधार मिळू शकतो.
गुंतवणूकीतील परतावा पुन्हा गुंतवणूक केल्यास मिळणारा फायदा वाढत जातो.नक्कीच परतावा मिळण्यास कालावधी अधिक लागू शकतो परंतु तुमच्या इक्विटी गुंतवणूकीत वाढ होऊ शकते. बहुतांश वेळा मोठे लग्न कार्य, सणासुदीच्या काळात, नवीन घर घेण्यास, परदेशी शिक्षणासाठी अथवा वैयक्तिक इतर गरजेसाठी कर्ज घेतले जाते. त्यामुळे कर्जाच्या कालावधीत हप्ते भरताना आर्थिक ओढाताण होऊ शकते.
कारण एका कर्जावर १० ते ११ टक्के व्याज भरल्यास घेतलेल्या वस्तूची किंमत नक्कीच वसूल होत नाही अशावेळी गुंतवणूक काही येते.गरजेच्या काळात एखादी गुंतवणूक मोडल्यास त्याचा फायदा संकटकाळी होऊ शकतो.अगदी व्यवसायाचे तसेच आहे म्हणतात ना 'पैसाच पैशाला खेचू शकतो'
उद्योगाच्या भांडवलात गुंतवणूक करावी लागते. यावेळी वर्किंग कॅपिटल व्यतिरिक्त इतर फिक्स कॅपिटल गुंतले जाते.त्यावेळी त्या स्थावर वस्तूंच्या होणारे डेप्रिसिऐशन पाहता झालेले नुकसान दुसरीकडे भरून काढणे गुंतवणूकीसाठी शक्य होते.अशावेळी गुंतवणूक गुंतवणूकदारांना आयुष्यभर साथ देते व पैशाचा अपव्यय माणसाला खड्ड्यात नेतो.
थोडक्यात गुंतवणूकीसाठी माणसाने जगू नये तर माणसाने गुंतवणूकीसाठी जगल्यास निश्चित फलश्रूती अपेक्षित आहे.