‘स्मायलिंग व्हिस्लर’ निखिल राणे

    16-Apr-2024
Total Views |
Nikhil rane
 
शिट्टीच्या स्वरुपात संगीताचे सूर सातासमुद्रापलीकडे नेणार्‍या ‘स्मायलिंग व्हिल्सर’ म्हणून सुपरिचित, मुंबईच्या निखिल राणे यांच्याविषयी...
 
एखादी व्यक्ती शिट्टी वाजवत असेल, तर त्याकडे बघण्याचा समाजातील दृष्टिकोन हा साधारण नकारात्मकच दिसून येतो. पण, एका कलाकाराने याच शिट्टीला चक्क जागतिक दर्जा मिळवून दिला आहे. ‘स्मायलिंग व्हिस्लर’ निखिल राणे यांनी शिट्टीतून गीतगायन करतात, थेट जपानपर्यंत आपलेच नाही, तर भारताचेही नाव उंचावले आहे.
 
मुंबईतील ताडदेवमध्ये संपूर्ण बालपण व्यतीत केलेल्या निखिल यांचे शालेय शिक्षण युसुफ मेहर अली शाळेत झाले. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड. पण, घरातील आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची कला ही चार भिंतीत बंदिस्त झाली. निखिल यांचे पंचकोनी कुटुंब. आई-वडील आणि तीन भाऊ. सहावीत शिकत असताना अचानक निखिल यांच्या वडिलांना ‘पॅरेलिसीस’चा झटका आला आणि घराची आर्थिक परिस्थिती अधिक बेताची झाली. निखिल आणि त्यांचे दोन्ही भाऊ शिक्षण घेत होते आणि कमावती केवळ आईच. गळ्यात गाणं असल्यामुळे भजनाचे किंवा गाण्याचे कार्यक्रम करून निखिल पैशांची थोडीफार मदत आपल्या आईला करत होते. दहावी झाल्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी निखिल यांनी गिरगावच्या भवन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. निखिल यांची एक खासियत होती की, त्यांना गाणं तर गाता येत होतंच. पण, त्याशिवाय शिट्टी वाजवतदेखील ते गाणं गात होते. त्यांच्या गळ्यातील ही अनोखी कला फार कोणाच्या पचनीही पडली नाही. अगदी त्यांच्या घरातील सदस्यांनादेखील निखील यांचे शिट्टी वाजवणे पसंत नव्हतेच. पण, आपल्या गळ्यातून शिट्टीद्वारे निघणारा स्वर हा वेगळेच काहीतरी सांगू पाहात आहे, याची निखिल यांना पूर्ण जाणीव होती.
 
निखिल यांनी स्वत:मधील हे वेगळेपण ओळखले आणि संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी अकरावी-बारावी पूर्ण करुन नोकरी पत्करली. मार्केटिंग, ‘एचपी गॅस’ संस्था अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून त्यांनी पैसे जमवले आणि सोबत ‘बी.कॉम’ची पदवी हातात घेत दुसरीकडे सहा वर्ष संगीत क्षेत्राचे शिक्षण घेत ‘विशारद’ झाले. कला ही फक्त आवड म्हणून जोपासायची, कारण त्यातून उदरनिर्वाह होईल, याची शाश्वती नसते, असा एक मध्यमवर्गीयांमध्ये प्रचलित समज. पण, निखिल यांनी भविष्यात हा गैरसमज मोडून काढत, संगीत क्षेत्राला आणि विशेषत: शिट्टी वाजवण्याच्या अनोख्या कलेला एक वेगळीच ओळख प्राप्त करुन दिली.
 
संगीत क्लासची १०० रुपये फी देखील स्वकष्टाने पै अन् पै बचत करत निखिल यांनी जमा केली. काही काळानंतर १९७२ पासून सुरू झालेल्या ‘वर्ल्ड व्हिस्लिंग चॅम्पियनशीप’बद्दल निखिल यांना समजले. जपानमध्ये होणार्‍या या स्पर्धेत निखिल यांना ‘हिकीफुकी’ या प्रकारात वाद्य वाजवत शिट्टीतून आपले गाण्याचे सादरीकरण करायचे होते.
 
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या ‘गुरुकुल’ या संगीत संस्थेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निखिल यांना केवळ पैशांच्या अभावी त्या संधीला मुकावे लागले. पण, मनातील जिद्द आणि मित्र-मैत्रिणींच्या पाठिंब्याच्या जोरावर त्यांनी जपान गाठले. ‘वर्ल्ड व्हिस्लिंग चॅम्पियनशीप’बद्दल समजले होते, त्यावेळी निखिल यांना जवळपास दोन ते तीन लाख रुपयांची आवश्यकता होती. पण, पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी जपानला जाणे रद्द केले होते. त्यांच्या भावाला आणि इतर मित्र-मैत्रिणींना याबद्दल समजल्यानंतर अगदी निनावी पैशांनी भरलेली पाकिटे निखिल यांच्या घरी आली आणि त्या खर्चातून त्यांनी जपानवारी केली. मुळात शिट्टी वाजवण्याचीदेखील स्पर्धा असू शकते, याची कल्पनादेखील नसणार्‍या निखिल यांनी २०१६ मध्ये भारताचे या अनोख्या स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करत ‘वर्ल्ड व्हिस्लिंग चॅम्पियनशीप’वर आपले नाव कोरले. निखिल हे ‘हिकीफुकी’ या प्रकारात प्रथम पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय स्पर्धक ठरले. पुढे २०१८ सालीही निखिल यांनी या स्पर्धेत भारताचा झेंडा अभिमानाने फडकविला.
 
जागतिक स्तरावर शिट्टी आणि शिट्टीतील गाणं पोहोचवणार्‍या निखिल यांनी २०२२ साली एका जागतिक विक्रमाचीही नोंद केली. या रेकॉर्डचं नाव होते ‘मदर इंडिया.’ या कार्यक्रमाचे स्वरुप असे होते की, ११ राष्ट्रांचे राष्ट्रगीत शिट्टीने वाजवायचे होते आणि निखिल यांच्या नावावर ‘चेीीं छरींळेपरश्र रपींहशा थहळींशश्रशव लू खपवर्ळींळर्वीरश्र’ असा हा जागतिक विक्रम. यात मॉरेशिस, ओमान, थायलंड, हंगेरी, इजिप्त, रशिया, इंडोनेशिया, नेपाळ, डेन्मार्क, इंग्लंड आणि अमेरिका अशा ११ राष्ट्रांची राष्ट्रगीते निखिल यांनी शिट्टीतून वाजवली होती आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा शेवट त्यांनी भारताच्या राष्ट्रगीताने केला होता. तसेच, निखिल भजनाचे कार्यक्रमदेखील महाराष्ट्रभरात करत असून, अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या घरी गणेशोत्सवादरम्यान पहिल्याच दिवशी गेली अनेक वर्षं भजनाचा कार्यक्रम ते सातत्याने करत आहेत.
 
कोणत्याही कलेच्या सादरीकरणासाठी आर्थिक पाठबळ आणि लोकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे. परंतु, उमेदीच्या काळात या दोन्ही बाजू कमकुवत असूनही, आपल्या पायांवर उभे राहत एका शिट्टीला जागतिक पातळीचा दर्जा मिळवून देणार्‍या ‘स्मायलिंग व्हिस्लर’ निखिल राणे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
९१५२२४५३३४