दुर्मिळ वटवाघळाची नविन स्थानांवरून नोंद

    15-Apr-2024   
Total Views |

bat



मुंबई (विशेष प्रतिनिधी):
भारतात पश्चिम मेघालयामधून ‘रॉटन्स फ्री टेल्ड बॅट’ची नोंद प्रथमच नोंद करण्यात आली असून याविषयीचा संशोधन अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. मॅमेलिया या फ्रांसच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हा संशोधन अहवाल प्रकाशित झाला असून यामध्ये सेकॉन (सलिम अली सेंटर ऑफ आर्निथोलॉजी अँड नॅटरल हिस्ट्री) आणि बॅट कॉन्झरवेशन इंडिया ट्रस्टच्या माध्यमातून हे संशोधन करण्यात आले आहे. राजकूमार पटेल, विनोदकुमार कुलकर्णी, श्रद्धा कुमारी, राजेश पुट्टस्वामी, होन्नावल्ली कुमारा, पी. व्ही. करूणाकरण आणि बाबू संथनाक्रिष्नन या संशोधकांचा यामध्ये समावेश आहे. यापुर्वी पुर्व मेघालयातुन या वटवाघळाच्या प्रजातीची नोंदी होत्या मात्र आता पश्चिम मेघालयाच्या काही भागांमधून ही नव्याने नोंद करण्यात आली आहे. या संशोधनामध्ये नवीन स्थानांची तसेच प्रजननाच्या काळांची नव्याने नोंदी करण्यात आल्या आहेत.

भारतात साधारण २० ते २५ वर्षापुर्वी गोव्याच्या जवळ असलेल्या उत्तर कर्नाटकातील भिमगड वन्यजीव अभयारण्यामध्ये रॉटन्स फ्री टेल्ड बॅटच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. भारतामध्ये फक्त कर्नाटकातच आढळत असलेल्या या वटवाघळाला आययुसीएनच्या लाल यादीत संकटग्रस्त श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते. वटवाघळाची ही प्रजात १९१३ मध्ये पहिल्यांदा नोंदवण्यात आली होती तर २००१ मध्ये कंबोडियामध्ये एक वटवाघूळ जाळ्यात अडकलेले आढळले होते. २००२ मध्ये ही अशा प्रकारे एक वटवाघूळ मेघालयामध्ये जाळीत अडकलेले आढळले होते. पश्चिम मेघालयातून एकही नोंद नसलेल्या या प्रजातीच्या वटवाघळाची आता नोंद झाल्यामूळे अभ्यास आणि संशोधनाच्या कामाचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. आययुसीएनच्या यादीमध्ये आता या वटवाघळाची डेटा डेफिशिअंट म्हणजे माहितीची कमतरता या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे.



bat


कर्नाटकामध्ये आढळत असलेल्या प्रजाती खोल गुहांमध्ये, तसेच काळोख असलेल्या ठिकाणीच आढळल्या होत्या. आता मात्र नव्याने केलेल्या या नोंदीमध्ये ओढ्याजवळ असलेल्या खडकांच्या खड्ड्यांमध्ये ही वटवाघळे संशोधकांना आढळल्याचे यातील संशोधक राजकूमार पटेल यांनी दै. मुंबई तरूण भारतशी बोलताना सांगितले.


“भारतीय वन्यजीव कायद्याच्या शेड्यूल १ मध्ये येणाऱ्या या प्रजातीवर फारच कमी संशोधन झाले आहे. त्यावर संशोधनाची अधिक गरज असून या नोंदी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण, यामध्ये फक्त नवीन ठिकाणांचाच नाही तर प्रजनन काळामध्येही फरक दिसून आला आहे.”

- राजकूमार पटेल
संशोधक, बॅट कॉन्झरवेशन इंडिया ट्रस्ट

त्याचबरोबर कर्नाटकात आढळलेल्या वटवाघळांचा प्रजननाचा काळ आणि मेघालयातील वटवाघळांच्या प्रजननाचा काळ यामध्येही संशोधकांनी फरक नोंदविला आहे. मेघालयातील वेगळ्या अधिवासामध्ये आढळलेल्या या वटवाघळाच्या रूस्टींग कॉलनीमुळे या वटवाघळांचा अधिवास केवळ खोल आणि काळोख असलेल्या गुहांमध्ये नाही तर इतरत्र ही आहे हे स्पष्ट झाले आहे.



समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.