मुंबई (प्रतिनिधी) : हिंदू आणि हिंदू धर्माच्या योगदानाची प्रशंसा करत, एका अमेरिकन खासदाराने हिंदूविरोधी कट्टरता, द्वेष आणि मंदिरांवरील हल्ल्यांच्या (Hindu Temple America) निषेधार्थ नुकताच एक प्रस्ताव मांडला. अमेरिकी संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये तो मांडण्यात आला. हा प्रस्ताव अमेरिकेतील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या घटनांचा आणि हिंदूफोबियाचा तीव्र निषेध करतो. संसदेच्या ओव्हरसाइट आणि अकाउंटेबिलिटी समितीकडे तो सध्या पाठवण्यात आला आहे. त्यावर चर्चा झाल्यानंतर तो सिनेटला पाठवला जाईल. सिनेटमध्ये तो मंजूर झाल्यानंतर कायदा करण्यासाठी मतदान होईल.
प्रस्तावात म्हटल्यानुसार, अमेरिकेच्या प्रगतीत हिंदू अमेरिकन समुदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र असे असूनही या वर्गाला पूर्वग्रहदूषितांना सामोरे जावे लागते. शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदू अमेरिकन विद्यार्थ्यांची छेड काढली जाते. अशा अनेक गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो. एफबीआयच्या अहवालानुसार, अमेरिकेत हिंदूंविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे आणि मंदिरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. सन १९०० पासून जगातील विविध भागांतून हिंदू समाजाचे लोक अमेरिकेत येत असून त्यांची संख्या सुमारे ४० लाख आहे. या समुदायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या आणि प्रत्येक औद्योगिक क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
अलीकडेच भारतीय अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, ठाणेदार, एमी बेरा आणि प्रमिला जयपाल यांनीही न्याय विभागाला पत्र लिहून हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या घटनांच्या चौकशीची माहिती मागितली होती. न्यूयॉर्कपासून कॅलिफोर्नियापर्यंत मंदिरांवर हल्ले झाल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या हिंदू समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे. मंदिरांवरील हल्ल्यांच्या प्रकरणांच्या तपासाच्या प्रगतीवरही खासदारांनी नाराजी व्यक्त केली आणि अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी तपास यंत्रणा काय करत आहेत, असा सवाल केला.