‘फास्ट फॅशन’चा विळखा

    15-Apr-2024   
Total Views |
fast fashion
 
फॅशन... अनेक मोठ्या इंडस्ट्रीजपैकी एक. ट्रेंडिंग कपडे, चपलाबूट आणि तत्सम इतर गोष्टींचं वाढणारे मार्केट. का लागतात आपल्याला ट्रेंडिंग कपडे आणि चपला? दोन ते तीन जोडांवर भागणार असले तरीही नवीन स्टाईलचा बूट विकत घ्यायला आपण का धजावतो? बरं, आपण करत असलेल्या या ट्रेंडिंग फॅशनमुळे कोणकोणत्या घटकांवर आणि काय परिणाम होतात? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी आज ‘फास्ट फॅशन’ म्हणजे नेमकं काय, ते पाहूया.
 
निसर्गचक्रामध्ये सर्वांत मोठ्या प्रमाणावर कचर्‍याची निर्मिती आणि प्रदूषण करणारा एक मोठा घटक म्हणजे फॅशन इंडस्ट्री. ट्रेंडिंग म्हणजेच ठरावीक कालावधीमध्ये एखाद्या स्टाईलचे कपडे किंवा चपला समाजमाध्यमांवर किंवा इतरत्र प्रसिद्ध होतात आणि कमी दर्जाची असलेली तिच वस्तू बाजारामध्ये कमी किमतीला उपलब्ध होते. ट्रेंड फॉलो करण्यासाठी कमी किमतीच्या आणि अधिक काळ न टिकणार्‍या या वस्तूंची ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदीही केली जाते. दीर्घकाळ न टिकणार्‍या एखाद्या गोष्टीसाठी पैशांचा अपव्ययही केला जातो, त्याचबरोबर त्याचे पर्यावरणाला मोठे धोकेही आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ‘फास्ट फॅशन’विषयी चर्चा असून, त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ‘फास्ट फॅशन’चा पर्यावरणावर किंवा निसर्गचक्रावर नेमका काय परिणाम होतो, या दृष्टिकोनातून फार कमीवेळा बघितले जाते.
 
उच्च-फॅशन डिझाईन्सची प्रतिकृती बनवून त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे आणि कमी खर्चात, मागणी सर्वाधिक असताना झटपट बाजारामध्ये आणून विक्री करणारे हे व्यवसाय मॉडेल आहे. २०व्या शतकामध्ये झालेल्या बदलांकडे पाहता, कपड्यांचा उत्पादन खर्च कमी होणे, सोपी आणि अधिक कार्यक्षम पुरवठा साखळी निर्माण होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर स्वस्त कामगारांची किंवा मजुरांची उपलब्धता, अशा अनेक कारणे हे मॉडेल पुढे येण्यास कारणीभूत ठरली. आशिया खंडातील सर्वाधिक म्हणजेच जवळजवळ ८५ ते ९० टक्के महिला कपड्यांच्या उद्योगातील कर्मचारी आहेत. कामगारांचे अनेकदा शोषण होत असून, महिला यामध्ये सर्वाधिक बळी पडतात.
 
ठरावीक काळामध्ये वापरून झाल्यानंतर कचर्‍यात फेकल्या जाणार्‍या या वस्तूंमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. कपडा हा घटक विघटनशील असला तरी त्याच्या विघटनाला बराच कालावधी जावा लागतो. सातत्याने मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार्‍या कचर्‍याची तितक्याच वेगाने विघटन प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. जागतिक फॅशन उद्योग दरवर्षी आठ-दहा टक्के जागतिक कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार आहे, यावरुन याचा अंदाज यावा.
 
उत्पादनाची कमी किंमत, कृत्रिम साहित्याचा वापर, रसायने यामुळे अतिरिक्त कचरा निर्माण होऊन प्रदूषणात वाढच झाली. एका ताज्या अहवालानुसार, ९२ दशलक्ष टन कपड्यांचा कचरा दरवर्षी लँडफिल्सवर (कचर्‍याचे मोठे ढिगारे) येताना दिसतो. यामध्ये नैसर्गिक साधनस्रोतांबरोबर इतर अनेक घटकांचा विचारच होताना दिसत नाही. मग याला पर्याय काय? तर, शाश्वत जीवनशैली. स्वस्त किमतीला न भूलता चांगल्या दर्जाचे कपडे, चपला व इतर गोष्टींची खरेदी कशी करता येईल, यावर भर द्यायला हवा. यावर भर दिला, तर अनावश्यक खर्चाबरोबरच, अनावश्यक खरेदी त्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण, निर्मिती आणि उत्पादनावर वाढता खर्च या सगळ्याला आळा घालता येऊ शकतो.
 
भारतीय संस्कृतीमध्ये मात्र नव्याने आणलेल्या कपड्याचे टप्प्या- टप्प्याने अगदी पायपुसण्यापर्यंत वापर केला जातो. अशा पद्धतीने विचार केल्यास, तसेच पुनर्वापर केलेल्या कपड्यांच्या वस्तू, पिशव्या असे पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. अशा पर्यायांचा विचार केल्यास अनाठायी खर्चाच्या या विळख्याचे आपण बळी ठरणार नाही. तसेच, काही प्रमाणात वाढलेल्या गरजाही कमी करायला हव्यात. ‘मिनिमलिस्ट लाईफस्टाईल’ म्हणजेच शक्य तितक्या कमीतकमी आणि गरजेच्याच गोष्टींवर पैसे खर्च करण्याची जीवनपद्धती ही सध्या रूढ होऊ लागली आहे. यामुळे अनेक सकारात्मक परिणाम दिसत असून, ते अवलंबणे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच ‘सस्टेनेबल’ आणि ‘मिनिमलिस्ट लाईफस्टाईल’कडे वाटचाल करण्याची आणि योग्य पर्यायांची निवड सुज्ञपणे केल्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन व्हायला मदत होईल.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.