समान नागरी कायदा लागू करणारच! पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही
लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित
14-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली : देशहितासाठी भारतात समान नागरी कायदा लागू करणारच आणि भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई सुरू राहणारच, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भाजपचा जाहीरनामा जारी करताना दिली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा नवी दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावरील विस्तारित पक्ष मुख्यालयात प्रकाशित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या निर्मितीसाठी पुन्हा एकदा भाजपला जनतेने आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले. ते म्हणाले की, "देशहितासाठी कठोर निर्णय घेण्यापासून मागे हटण्याची भाजपची मनोवृत्ती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशहितासाठी कलम ३७० हटविले असून सुधारित नागरिकत्व कायदादेखील लागू केला आहे. आता देशात लवकरच समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. देशाच्या राज्यघटनेमध्ये कलम ४४ मध्ये त्याचा उल्लेख असून सर्व नागरिकांना समान अधिकार देणे ही भाजपची जबाबदारी आहे," अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
देशात एकत्रित निवडणुका घेण्याविषयीदेखील भाजप सकारात्मक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे पोलिस दलाचे आधुनिकीकरण करणे, न्याय प्रणाली काळानुरूप बनविणे, राष्ट्रीय सहकार धोरण राबवून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास करणे, सरकारी सेवा जास्तीतजास्त ऑनलाईन करण्यावरही भाजप सरकारचा भर राहणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
देशात सामाजिक, डिजिटल आणि फिजिकल पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. सामाजिक पायाभूत सुविधांच्या अंतर्गत शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची स्थापना व विकास, आरोग्य सुविधांचा विकास केला जाईल. त्याचवेळी महामार्ग, रेल्वे, हवाई सेवा, जलमार्गांचा विस्तार करून फिजिकल पायाभूत सुविधा बळकट केल्या जातील. डिजिटल विकासंतर्गत 5जी चा विस्तार करून 6जी च्या विकासावर काम सुरू केले जाईल. त्याचप्रमाणे देशात सर्व भागांमध्ये नव्या शहरांची अर्थात 'सॅटेलाइट सिटी' उभारल्या जातील. दळणवळणास वेग देण्यासाठी वंदे भारत स्लीपर, चेअरकार आणि मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आता भाजपने संकल्प केला आहे की ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणले जाईल. ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब असो किंवा मध्यमवर्गीय असो, त्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. भाजप सरकारने गरिबांसाठी ४ कोटी कायमस्वरूपी घरे बांधली आहेत. आता, राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त माहितीचा विचार करून आणखी ३ कोटी घरे बांधण्याचे वचन घेऊन आम्ही पुढे जाऊ. आत्तापर्यंत आम्ही प्रत्येक घरापर्यंत स्वस्त सिलिंडर पोहोचवले आहेत, आता आम्ही प्रत्येक घरात पाईपद्वारे स्वस्त दरात स्वयंपाक गॅस पोहोचवण्यासाठी वेगाने काम करू, असेही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले आहे.
अशा आहेत घोषणा :
येत्या पाच वर्षांत सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची हमी.
पीएम सूर्यघरकडून पुढील पाच वर्षांसाठी मोफत रेशन, पाणी आणि गॅस कनेक्शन आणि शून्य वीज बिल.
आयुष्मान भारतद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार सुरू राहणार.
मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पक्की घरे.
२०३६ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करणार.
पायाभूत सुविधा, गुंतवणूक, उत्पादन, उच्च मूल्य सेवा, स्टार्टअप आणि पर्यटन आणि क्रीडा यांच्या माध्यमातून तरुणांसाठी लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
नारी तू नारायणी अंतर्गत आणखी ३ कोटी लखपती दीदी तयार करण्यात येणार.
महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी जोडून नवीन संधी उपलब्ध करून देणार.
महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि ऑस्टिओपोरोसिसवर विशेष लक्ष देणार.
सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली जातील.
नारी वंदन कायदा लागू करणार.
बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार.
मच्छीमारांसाठी बोटीचा विमा, मत्स्य प्रक्रिया युनिट, उपग्रहाद्वारे वेळेवर माहिती देणे या सर्व गोष्टींना बळकटी देणार.
मत्स्य उत्पादकांना समुद्री तण आणि मोत्यांची लागवड करण्यास प्रोत्साहित करणार.
महामार्गावर ट्रकचालकांसाठी आधुनिक सुविधा उभारण्यात येणार.
तिरुवल्लुवर कल्चरल सेंटरच्या माध्यमातून भारताची संस्कृती जगासमोर नेणार.
उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये भारतातील अभिजात भाषांच्या अभ्यासाची व्यवस्था केली जाईल.
२०२५ हे वनवासी गौरव वर्ष म्हणून घोषित करणार.
एकलव्य शाळा, पीएम जनमन वन उत्पादनांमध्ये मूल्यवर्धन आणि इको-टूरिझमला प्रोत्साहन.
ओबीसी, एससी, एसटी समाजाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सन्मान देणार.
भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्याची हमी.
शहरी गृहनिर्माण, वाहतूक, पाणी व्यवस्थापन, स्वच्छ हवा, कचरा विल्हेवाट आणि स्वच्छ पाणी यासाठी मिशन मोडवर काम केले जाईल.
रामायण सण जगभर साजरा होणार आहे. अयोध्येचा विकास होईल.
परफॉर्म, रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म हा मंत्र शासनाच्या प्रत्येक क्षेत्रात लागू होईल.
भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्याची हमी.
ईशान्येकडील विकासाचा प्रवास सुरूच राहणार आहे. प्रत्येक किनारपट्टी, बेट आणि डोंगराळ भागाच्या विशेष गरजांनुसार मास्टर प्लॅन तयार करणार.
अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम, सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान यामध्ये भारत अग्रेसर होईल.
२०४७ पर्यंत ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णता प्राप्त करू. पेट्रोलची आयात कमी होईल.
लाभार्थ्यांची उपस्थिती
मोदी सरकारच्या योजनांचे चार प्रातिनिधिक लाभार्थी यावेळी उपस्थित होते. त्यांना पंतप्रधान मोदी यांनी भाजपचा जाहीरनामा प्रदान केला. त्यामध्ये, दिल्लीतील छोले - कुलचे विक्रेते आणि स्वयंनिधी योजनेचे लाभार्थी रघुवीर; आवास योजनेचे लाभार्थी असलेले गाझियाबादचे तरुण रविकुमार, पंतप्रधान शेतकरी सन्मान, पशुधन योजनेचे लाभार्थी असलेले हरियाणातील शेतकरी रामवीर आणि आवास योजना, उज्ज्वला योजना, नल से जल योजनेच्या लाभार्थी बस्तरमधील लीलावती मोर्य उपस्थित होत्या. याद्वारे भाजपने गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला या पंतप्रधानांच्या संकल्पनेतील चार जातींच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली आहे.
देशात चौफेर बुलेट ट्रेन
सध्या अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प निर्णायक टप्प्यात आला आहे. त्यानंतर आता उत्तर भारत, दक्षिण भारत आणि पूर्व भारत येथेही बुलेट ट्रेन प्रकल्प राबवणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.