भरारी ऋतुजाची..

    14-Apr-2024
Total Views |
rutuja
करिअरची वेगळी वाट निवडून चोखंदळपणे आपल्या ललाटरेखा जोखत साताऱ्याजवळच्या कराडकन्येचा उद्योजिका होण्यापर्यंत झालेला हा प्रवास. पालघरच्या ऋतुजा दांडेकर यांच्याविषयी..
भारतीय संस्कृती आपल्याला आपल्या स्वतःकडे लक्ष देण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळवण्याच्या अनेक पद्धती पूर्वजांनी प्रकृती, निसर्गातून शोधून काढू दिलेल्या आहेत. मात्र, या धावपळीच्या जगात रासायनिक तत्वांचा मारा करून आपण स्वतःकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतो. आपल्या या सांस्कृतिक देणगीची ओळख करून देणारी उत्पादने ऋतुजा तयार करते. ऋतुजाचा जन्म मूळचा कराडचा. तिला डॉक्टर व्हायचे होते. त्यानंतर फार्मसीने तिचे लक्ष वेधले. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तिने टेक्सटाईल इंजिनिअरिंग केले आणि दिल्ली गाठली. तिच्या करिअरची सुरुवात दिल्लीत झाली. परंतु, फार काळ टेक्सटाईल डिझायनिंगमध्ये ती रमली नाही. तिने दिल्लीतून पालघरला येण्याचा निर्णय घेतला.
 
भारताच्या राजधानी शहरातून महाराष्ट्रातील एका छोट्या गावात. लग्न झाले. आयुष्याला एक अतिशय महत्त्वाचे वळण मिळाले.
पालघरला आल्यानंतर केवळ संसारी गृहिणी होणे तिला मान्य नव्हते. दिल्लीसारख्या संधी इथे असणे शक्यच नव्हते. मुंबईसुद्धा पालघरपासून किमान चार तासांच्या प्रवासावर. तेव्हा डहाणूजवळच एका डिझायनरकडे काही काळ तिने नोकरी पत्करली. परंतु, स्वतंत्र बुद्धिमत्ता, उच्च आकांक्षा असलेल्या व्यक्ती फारकाळ कुणाच्या अधिपत्याखाली राहू शकत नाहीत. ऋतुजाने मग ‘इमेज डिझायनिंग’ सुरू केले. एखादे व्यक्तिमत्व, त्याचे व्यावसायिक व्यक्तिमत्व आणि त्यासाठी त्याने आपल्या स्वतःची ठेवलेली बडदास्त अशी आपण याची मराठीत व्याख्या करू शकतो.
 
मुळात ‘इमेज डिझायनिंग’ ही पद्धतच भारताला नवी आहे. महत्त्वाची असली तरीही अजून आपल्या संस्कृतीत रुजलेली नाही. कॉर्पोरेटजगतात मात्र या ‘इमेज डिझायनिंग’च्या कार्यशाळा नियमितपणे होतात. आपल्या व्यवसायाला, हुद्द्याला साजेसे आपले रूप असावे, असा साधा आणि उदात्त हेतू यामागे आहे. म्हणावा तसा प्रतिसाद भारतीयांकडून याला मिळाला नाही. तेव्हा, आपला कम्फर्ट झोन ऋतुजाने जवळ केला. आता ती कुणाशीच बांधील नव्हती. पण साधारण 2016 दरम्यान एक महत्त्वाची घटना घडली.
ऋतुजाच्या आईने मानसशास्त्र विषयात पदवी घेतली होती, तर वडिलांचा स्वतंत्र व्यवसाय होता, लग्नानंतरही सासू ‘एलएलबी’ झालेली. गावातल्या महिलांसाठी काहीतरी सतत करत असणार. मुंबई शहर दूर, गावात महिलांसही काही खास वेळ जाण्यासाठी नव्हतेच, मग त्या सतत कुणा ना कुणाला बोलवत, काहीतरी कार्यशाळा, नवा उपक्रम राबवत असतात.
 
अशातच घरातल्या घरात साबण बनवायची कार्यशाळा त्यांनी पालघरमध्येेच आयोजित केली. यात अनेक स्त्रियांसोबत ऋतुजासुद्धा सहभागी झाली होती. तिला हे आवडू लागले. एके दिवशी एका ‘युके बेस्ड’ संस्थेचा ऑनलाईन कोर्स तिने पूर्ण केला आणि आपली उत्पादने ती बनवू लागली. लोकांना हे आवडू लागले, यातून तिचा आत्मविश्वास दुणावला आणि याच क्षेत्रात काही करण्याची इच्छा जागृत झाली.
  
‘अर्थ रिच्युअल्स’ नावाचा ब्रॅण्ड तिने सुरू केला. 2023 पासून या ब्रॅण्ड नावाखाली तिने उत्पादनही सुरू केले. ती याबद्दल बोलताना सांगते, काहीवेळा आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा आवश्यक वाटते, तर केव्हातरी आपल्याला संपूर्णपणे शांतता मिळेल अशा ठिकाणी विश्राम करावासा वाटू शकतो, तर काहीवेळेस आपल्याला आपलं जीवन साजरे करावेसे वाटते. अशावेळी, मनाला आनंद देण्यासाठी, स्वतःच्या शरीरावर संस्कार करण्यासाठी म्हणून या उत्पादनांकडे पाहायला हवे. बाह्य संस्कारातून आत्मानंदाकडे जाण्यासाठी याचा उपयोग तुम्ही करून पाहू शकता.
 
 
आजच्या काळात अगदी दर दिवशी अशी उत्पादने वेगळ्या नावाने बाजारात येत असतात. तेव्हा प्रत्येक उत्पादकाला आपल्या उत्पादनाचा पीआर करणे गरजेचे वाटते. परंतु, ऋतुजाची इच्छा होती काही दिवस लोकांनी ते अनुभवू दे, त्यानंतर लोकांचा प्रतिसाद पाहून पीआरचे पाहूया. परंतु, ऑनलाईन माध्यमावरून भारतभर पोहोचलेले हे उत्पादन सुप्रसिद्ध नटी हेमा मालिनी हिच्या मुलीने मागवले. तिला ते आवडले आणि तिने तिच्या आईला याविषयी सुचवले. काहीही न करता ‘अर्थ रिच्युअल्स’ लोकाभिमुख झाला त्याची गोष्टही रोमांचकारी आहे. त्याचे काय झाले.
 
हेमा मालिनीचा 75 वा वाढदिवस होता. त्यावेळी रिटर्न गिफ्ट म्हणून तिला हे प्रोडक्ट्स द्यायचे होते, अशा तर्हेने सुरुवातीच्या सहा महिन्यांतच जम बसवलाच पण एका उंच आशेनं भरारीसुद्धा घेतली. ऋतुजाची गोष्ट इथवरच नाही. आता तर सुरुवात आहे. प्रीमियम उत्पादने असल्याने ती वापरणार्यांचा वर्ग वेगळा आहे. या उत्पादनांचे असे असते, तुमच्या उत्पादनाची किंमत जेवढी जास्त तेवढेच उत्पादनसुद्धा उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे. ते नसेल, तर पॅकेजिंग आणि इतर सर्व मेहनतीवर पाणी पडते. ऋतुजाला असेच यश पुढील आयुष्यातही प्राप्त होवो, याच दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!