शिवनेत्र बहिर्जी : शिवकालीन हेरखात्याच्या शौर्यगाथांची कादंबरी

    13-Apr-2024   
Total Views |

bahirji
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी मिळवलेले स्वराज्य आज आपण चार शतकांनंतरही मिरवतो. आपल्या राजांचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी यांचे कौतुक करताना त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि त्यांचे १२ मावळातले मावळे यांचे आपण तोंडभरून कौतुक करतो. परंतु, राजांना आक्रमणांचा सुगावा कसा लागत असे, याबाबत आश्चर्य व्यक्त करताना, मात्र हेरखात्यास आपण सपशेल विसरून जातो. या हेरखात्याविषयी लिखित आणि उपलब्ध माहिती फारच त्रोटक आहे. या खात्याविषयी काहीही माहिती उपलब्ध नसणे, हेच या खात्याचे यश आहे आणि म्हणूनच त्यांचे कार्य नाही, किमान कर्तृत्व समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने प्रेम धांडे या नवलेखकाने लिहिलेली ही रहस्यमय चित्तथरारक कादंबरी.
 
प्रेम धांडे म्हणतात की, ”वरून भव्यदिव्य दिसणारा हा इतिहासाचा समुद्र तेवढाच खोल आणि अनेक शौर्यगाथा लपवून बसला आहे. शिवरायांचे अदृश्य शक्ती बल म्हणजे त्यांचे हेर खातं; पण त्या हेरखात्याबद्दल मात्र फारच त्रोटक माहिती इतिहासात लिहिलेली आहे. अगदी कमी अभ्यास मुद्दे घेऊन, त्याच्याभोवती गोष्ट गुंफून ही कादंबरी तयार केली आहे.” त्यांच्या कर्तृत्वाविषयी सुरुवातीला प्रश्न मांडून, त्या प्रश्नांची उत्तर शोधत, या दोन्ही पुस्तकांची निर्मिती झाली आहे. पहिला खंड लिहिण्यासाठी लेखकाला सहा महिने अभ्यास करावा लागला. राजांच्या राजनीतीचं कौतुक करण्यासाठी, ही कादंबरी लिहिली असल्याचे लेखक म्हणतात. ‘शिवनेत्र बहिर्जी’ आकारास येण्यासाठी, बर्‍याच कलाकारांनी आपले योगदान दिले आहे. उत्कृष्ट आकर्षक मुखपृष्ठ आणि चित्र अजय हातेकर यांनी साकारली आहेत. मनातल्या कल्पनांना, रुपांना कागदावर चित्रांच्या रुपात त्यांनी उतरवले. डॉ. पल्लवी पाटील यांनी संहिता संपादन करून, लेखनातल्या त्रुटी संपादित केल्या आहेत, तर संजय वनकुंद्रे यांनी उत्कृष्टरित्या ग्रंथ संपादित केला आहे. सारद मजकूर यांनी पुस्तकाचे मुद्रितशोधन आणि अंतर्गत मांडणी केली.
 
पहिल्या खंडामध्ये सुद्धा कादंबरीचे विभाजन तीन भागांमध्ये केले आहे. पहिल्या भागात भोपाळगडी देह टेकला, राजांशी पहिली भेट, गुरू कान्होजी जेथे यांचे प्रथम दर्शन, दौलतरावाचे विजापूरकडे मार्गक्रमण, नावाड्याचा गुप्तहेर झाला, दौलतरावाचे बहिर्जी नाईक झाले, पत्नी शारदेला पाहण्याची ओढ, सारंगा स्वराज्य स्थापनेची शपथ अशा पाठांचा अंतर्भाव केला आहे. दुसर्‍या भागात विजापुरात पुनरागमन, पहिल्या युद्धाची चाहूल, कावेरी, फतेह खानाच्या सैन्यात प्रवेश, पहिला युद्धात स्वराज्याचा विजय, शहाजीराजांची सुटका, औरंगजेब ज्युमलाच्या मैत्रीचा भेद अशा कथांचा समावेश आहे. भाग तीनमध्ये सारंगाला वीरगती प्राप्त झाली, औरंगजेबाचे आदिलशाहीवर आक्रमण, श्रीगोंद्याच्या पेठेची पाहणी आणि जुन्नरची लूट असे चार भाग समाविष्ट केलेले आहेत.
 
‘बहिर्जी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि ती अवघ्या २० दिवसांत संपली! त्यानंतर प्रेमला दुसर्‍या भागाविषयी विचारणा सुरू झाली. खरेच आहे म्हणा, हेरखाते एक असं खात आहे, ज्याबाबत फारशी माहिती लोकांना नसते. तेव्हा अशी माहिती जगासमोर आणल्यावर, त्याबाबत उत्सुकता असतेच. त्या उत्सुकतेतून अगदी सात वर्षांच्या वाचकांपासून ते ७०च्या आजोबांपर्यंत सर्वांनी याबाबत विचारणा सुरू केली. पुढचा खंड फार संघर्षमय नसला, तरी त्यात चित्तथरारक घटनांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे.
 
या काळात बहिर्जी थोडासा मुरलेला होता. त्याची संघटना तयार झाली होती आणि स्वराज्याचा डोलाराही वाढला होता. पुस्तकाबाबत बोलताना प्रकाशक नवनाथ जगताप सांगतात की, ”महाराष्ट्राच्या अभूतपूर्व इतिहासात अगदी महत्त्वाचं पात्र, ज्याचा स्वराज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे, ते हेरखाते त्या हेरासारखेच काळाच्या ओघात गुप्त राहिले. लेखकाने प्रसंगांचा अंदाज घेत, इतिहासाचा मागोवा घेताना, त्याच्या कल्पनाशक्तीचा योग्य उपयोग करत, ही कादंबरी लिहिली आहे. ऐतिहासिक संदर्भ नसले, तरी कल्पनाशक्तीच्या जोरावर इतिहासाबद्दल आपली मते मांडली आहेत.
 
दोन्ही पुस्तकांच्या सुरुवातीला अनुक्रमणिकेच्या आधी प्रमुख व्यक्तिरेखांचा उल्लेख केल्यामुळे, पुस्तक वाचताना सुलभ जाते. तीन भाग नसले तरी एकाच भागात विस्तारित पट मांडला आहे. एकूण १४ पाठांपैकी पहिला जंजिरा त्यानंतर मुघल तक्तपटावरची भनक, सिद्धीवर जरब, अफजलखान, संभाजीराजांचे प्रथम दर्शन, महामोहिमेची खबर, तो येत आहे, पंढरपूर तुळजापूरचे रक्षण, शेवटी मासा जाळ्यात अडकलाच, मोठ्या पहाडाला केले उद्ध्वस्त, सिद्धी जोहर, दुहेरी संकट, शाहिस्ताखान, शास्त्र, सुरत अशा अनेक पाठांचा समावेश आहे. वाचताना वाचकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, ही कादंबरी संपूर्णपणे लेखकाच्या कल्पनाविस्तार असल्याने, या कथेत वापरली गेलेली नावं, चरित्र, स्थळ यांना काल्पनिक रूप देऊन त्यांचं नामांतर करण्यात आलं आहे. परंतु, या सर्वांच्या आधारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीशिवछत्रपती महाराजांच्या हेरखात्याच्या कार्याचा वेध घेतला आहे.
 
पुस्तकाचे नाव : शिवनेत्र बहिर्जी खंड-२
लेखकाचे नाव :प्रेम धांडे
प्रकाशन :रुंद एंटरप्रायजेस
पृष्ठसंख्या : ३३०
मूल्य : ४४९ रु.
 
पुस्तकाचे नाव : शिवनेत्र बहिर्जी खंड-१
लेखकाचे नाव : प्रेम धांडे
प्रकाशन : रुंद एंटरप्रायजेस
पृष्ठसंख्या : ३००
मूल्य : ३९९ रु.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.