संत ज्ञानेश्वरांचा ‘परब्रह्म राम’(पूर्वार्ध)

    13-Apr-2024
Total Views | 111

ज्ञानेश्वर
संत शिरोमणी ज्ञानेश्वरांना वारकरी परंपरेतील सकल संतांनी गुरूस्थानी मानले आहे. त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी’, ‘हरिपाठ’ आणि ‘अभंग गाथा’ या साहित्यामध्ये परब्रह्म रामाच्या सगुण आणि निर्गुण अशा दोन स्वरूपाचे दर्शन घडते. विठ्ठलाच्या एकविध भक्तीचा पुरस्कार करणार्‍या ज्ञानदेवांनी राम, कृष्ण, हरी, शिव या नामरुपामागील ईश्वर एकच आहे, या ‘अद्वैत’ तत्त्वाचा बोध केला आहे. त्यांच्या दृष्टीने विठ्ठलभक्ती आणि रामभक्ती एकच आहेत. राम तोच विठ्ठल आणि विठ्ठल तोच राम...असा त्यांचा अद्वैत उपदेश आहे.
धन्य धन्य आमुचा जन्म। मुखी रामनाम उत्तम॥
जया रामनामे प्रेम। तोचि तरेल सर्वथा॥
 
संत ज्ञानदेव हे सकल संत परंपरेचे मेरूमणी. मराठी साहित्य शारदेच्या गळ्यातील कंठमणी आहेत. अनेक संतांचे सांगाती, परात्पर गुरू, मार्गदर्शक आणि वारकरी भक्ती आंदोलनाचे प्रवर्तक आहेत. म्हणूनच सकल संतांनी ‘ज्ञानदेवे रचिला पाया।’ अशा श्रद्धाभावाने त्यांना वंदन केलेले आहे. महान योगी, प्रतिभासंपन्न महाकवी, साक्षात्कारी संत, द्रष्टा-क्रांतदर्शी, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, विनय व वात्सल्याची प्रत्यक्ष मूर्ती अशा संत ज्ञानदेवांची विठ्ठल भक्ती सर्वश्रुत आहे. पण, त्यांच्या साहित्यात विठ्ठलाएवढेच रामनाम माहात्म्यालाही विशेष स्थान आहे. विठ्ठलाची एकविध भक्ती हा वारकरी पंथाचा मुख्य आचार धर्म आहे; पण त्याचबरोबर नामरूप भेदापलीकडे ईश्वरी तत्त्व एकच आहे. अशा त्यांच्या उदात्त समन्वयी दृष्टीला विठ्ठल, राम, कृष्ण, शिव सारे एकच आहेत. म्हणूनच विठ्ठलाच्या नामाने, विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य धन्य होणारे, संत ज्ञानदेव उपरोक्त अभंगात रामनामाने आपला जन्म धन्य धन्य झाल्याची कृतार्थता व्यक्त करतात.
 
राम कृष्ण माळा। घाला पा रे गळा।
अखंड जीवनकळा। राम जपा॥१॥
करावा विचार। धरावा आचार।
करावा परिकर। राम नामी॥२॥
सकळाचा सकळी। त्याते तू आकळी।
जिव्हा हे वाचाळी। रामरती॥३॥
रिघे रे शरण। तुज नाही मरण।
ठाकिसी चरण। श्री विठ्ठलाचे॥४॥
 
या अभंगातील पहिली तीन कडवी रामनाम महती सांगणारी आहेत आणि त्याच अभंगाच्या चौथ्या कडव्यात विठ्ठलाला शरण जा, असा उपदेश ज्ञानदेव करतात. हा अभंग ज्ञानदेव व समस्त वारकरी संतांच्या, श्रीराम आणि विठ्ठल एकत्वाच्या उदात्त दृष्टीचेच एक दर्शन आहे.
 
ज्ञानदेवांची अक्षर संपदा
संत ज्ञानदेवांच्या अक्षर साहित्यातील ‘राम दर्शन’ घेण्यापूर्वी आपण त्यांच्या विपुल व वैविध्यपूर्ण समग्र साहित्याचा अगदी थोडक्यात आढावा घेणे संयुक्तिक ठरणार आहे. संत ज्ञानदेवांचे भगवद्गीतेवरील मराठी टीकाभाष्य ‘भावार्थदीपिका’ सर्व परिचित आहे. जिला आपण ‘ज्ञानेश्वरी’, ‘ज्ञानदेवी’, म्हणून ओळखतो. ‘गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी।’ म्हणत संकल संतांनी तिचा गौरव केलेला आहे.
 
‘ज्ञानेश्वरी’नंतरचा ज्ञानदेवांचा सर्वोत्तम अक्षर ग्रंथ म्हणजे ‘अनुभवामृत.’ काही जण त्याला ‘अमृतानुभव’ असेही म्हणतात. हा ज्ञानदेवांचा स्वयंप्रज्ञ असा स्वतंत्र ग्रंथ आहे. गुरू निवृत्तीनाथांच्या द्वारे प्राप्त अद्वयानंद तत्त्वविचाराचे ते अक्षररूप आहे. ज्ञानदेवांच्या प्रज्ञा-प्रतिभेचा तो अनोखा शब्दाविष्कार आहे. यथार्थ रुपात त्यांच्या आध्यात्मिक अनुभवाचे, चिंतनाचे अमृत आहे.
संत ज्ञानदेवांच्या साहित्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे सर्व लेखन संवादशील आहे. ज्ञानेश्वरी हा श्रोतृसंवाद आहे, तर ‘अनुभवामृत’ त्यांचा आत्संवाद आहे. ‘चांगदेव पासष्टी’ हा मित्रसंवाद आहे, तर ‘अभंग गाथा’ हा लोक संवाद, जनसंवाद आहे. ज्ञानदेवांच्या साहित्याचा उद्देश पांडित्य दर्शन वा कोणाशी वादविवाद नसून लोकसमूहाशी, समाजातील तळागाळातील वेदवंचित उपेक्षित समाजबांधवांशी, सुसंवाद साधून सात्विक भक्ती प्रचाराचा आहे. धर्मसुधारणेबरोबरच धर्मरक्षणाचा आहे. भक्तीद्वारे सामाजिक क्रांतीचे एक प्रभावी साधन म्हणजे ज्ञानदेवांचे साहित्य होय.
 
ज्ञानेश्वरीतील ‘श्रीराम गौरव’
‘ज्ञानेश्वरी’ हे ज्ञानदेवांचे गीता भाष्य आहे. त्यापूर्वी गीतेवर अनेक भाष्ये लिहिली गेली; पण ती सर्व संस्कृत भाषेतून होती. एखाद्या प्राकृत भाषेत, मराठीत गीता भाष्य लिहिण्याचे धाडस करणारे, ज्ञानदेव हे त्याकाळातील पहिले बंडखोर होते. ज्ञानदेवांचे मराठी गीता भाष्य हे मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ करणे आहे. “तैसा वाग्विलास विस्तारू। गीतार्थे विश्व भरू। आनंदाचे आवारू। मांडू जगा।” ही ज्ञानदेवांची ओवी पुरेशी स्पष्ट आहे. १७-१८ भाषेवर प्रभुत्व असलेल्या व सर्व भाषेतील साहित्य अभ्यासलेल्या थोर चिंतक विनोबा भावेंच्या मते ‘ज्ञानेश्वरी’ हे गीतेवरील सर्वोत्कृष्ट भाष्य आहे.
 
ज्ञानेश्वरीमध्ये चार अध्यायात, विविध संदर्भात ‘रामा’चे उल्लेख व गौरव आहे. अध्याय क्र. सात, अध्याय क्र. नऊ, अध्याय क्र. दहा आणि अध्याय क्र. ११ मधील ओव्या पाहिल्यावर हे लक्षात येते की, येथे सगुण-निर्गुण अशा दोन प्रकारे रामाचे वर्णन आहे.
१) अयोध्येचा राजा राम, सगुण राम
२) सर्वव्यापी परब्रह्म स्वरूप निर्गुण राम
 
ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायाचे महत्त्व, वैशिष्ट्य सांगताना, दहाव्या अध्यायाच्या प्रारंभिक ओव्यामध्ये ज्ञानदेव ‘रामरावण युद्धाचा’ उल्लेख करतात. रामरावण युद्ध कसे? तर रामरावण युद्धासारखेच! त्याला दुसरी उपमाच नाही, ‘रामरावण झुंजिन्नले कैसे। रामरावण जैसे॥’
 
ज्ञानेश्वरीचा दहावा अध्याय हा ‘विभुती योग’ नावाचा आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या अनंत विभुतींची नावे कथन केलेली आहेत. त्यामध्ये ‘शस्त्रधरां समस्ता। माजी ‘श्रीराम’ तो मी॥’ शस्त्रधार्‍यांमध्ये मी धनुर्धारी श्रीराम आहे असे म्हटले आहे. तसेच श्रीरामाचा पुढीलप्रमाणे गौरव केलेला आहे-
 
जेणे देवांचा मानु गिवसिला। धर्मासि जीर्णोद्धारू केला।
सूर्यवंशी उदेला। सूर्य जो का॥५२॥
 
ज्ञानेश्वरीत अध्याय क्र. सात, अध्याय क्र. नऊ, अध्याय क्र. दहामध्ये तीन ठिकाणी ‘रामु’ अशा शब्दाची योजना ज्ञानदेवांनी केेलेली आहे; पण हे तिन्ही ‘रामु’, परब्रह्म राम, आत्माराम असे निर्गुण आहेत. त्या ओव्या अशा
१) भूताच्या ठायी कामु। तो मी म्हणे रामु। (७/४६),
२) म्हणौनि ऋग्यजुः सामु। हे तिन्ही मी म्हणे रामु। (९/७७)
३) तो सर्वसाक्षी धर्मु। तो मी म्हणे रामु। (१०/२४६)
ज्ञानेश्वरीतील श्रीरामाच्या उल्लेखाप्रमाणेच संत ज्ञानदेवांच्या अभंगगाथा आणि हरिपाठामध्ये श्रीरामनामाचे विशेष माहात्म्य गायलेलेे आहे. संत ज्ञानदेवांच्या अनेक अभंगातील ‘श्रीराम’ आणि हरिपाठातील ‘रामनामाचे’ या लेखाच्या उत्तरार्धात पुढील रविवारी शब्ददर्शन करूया. ॥श्रीराम॥
-विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
(पुढील अंकात : ज्ञानदेवांचा राम उत्तरार्ध)
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121