थोर समाजसुधारक व राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    13-Apr-2024
Total Views |

चवदार तळे
 
एकूणच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्रभक्तीने रसरसलेले व एका सच्चा समाजसुधारकाचे जीवन आहे. कुठल्याही भारतीय उपासना पद्धतीचा विरोध त्याच्यात दिसत नसून, जर असेल तर तो केवळ आणि केवळ समाज सुधारणेच्या दृष्टीनेच आहे. मात्र, त्यांच्या सगळ्या भूमिका लक्षात येण्यासाठी, त्यांची स्वतः लिहिलेली पुस्तके वाचणे गरजेचे असून, त्यांच्याबाबत अनेक एजंटांनी स्वतःची मतं बाबासाहेबांच्या तोंडी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, ती वाचून आपल्याला खरे बाबासाहेब उमजणार नाहीत. आपले राष्ट्रभक्त व समाज सुधारक बाबासाहेब त्यांच्या स्वतःच्या योग्य स्वरुपात समाजासमोर आणणे, ही काळाची गरज आहे.
 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान हे तसे सर्वश्रुत. त्यांच्या अथक प्रयत्नांशिवाय आपल्या देशाचे संविधान आज जितकं परिणामकारक झालं आहे, तितकं परिणामकारक कदापि होऊ शकलं नसतं, हेदेखील आता जगानं मान्य केलं आहे. आपल्या संविधानाची निर्मिती होत असताना, सर्वप्रथम तत्कालीन काँग्रेसचे नेते पंडित नेहरू संविधान सभेत सर्वांसमोर उभे राहून म्हणाले होते की, ”भारताचे संविधान स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्याय अशा त्रिमितीवर आधारित असायला हवं.” कारण, दरम्यानच्या काळात जगभरातली अन्य संविधानेदेखील याच तत्त्वांवर बनवली गेली होती. पण, आपल्या देशाच्या सुदैवाने तत्कालीन जगातील संविधानाचे सर्वोच्च अभ्यासक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशात आपल्या या मूलभूत व दिशादर्शक कार्यासाठी उपलब्ध होते. बाबासाहेबांनी आपल्या संविधानात त्रिमितीऐवजी आणखी एक छोटा; पण अत्यंत महत्त्वाचा बदल सूचवला, तो म्हणजे बंधुतेचा. स्वाभाविकच बाबासाहेब त्यावेळी म्हणताना असं म्हणाले की स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय यांच्यापैकी कोणत्याही एका गोष्टीचा जर अतिरेक झाला, तर त्याचा अन्य दोन बाबींबाबतचा समन्वय ठेवणं, हे केवळ अशक्य होऊ शकेल.
 
या तिघांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम बंधुता हे तत्त्व करू शकते. म्हणजेच बंधुतेशिवाय आपली समता, स्वातंत्र्य व सामाजिक न्याय या सगळ्याच गोष्टी अधुर्‍या राहू शकतील. त्यामुळे भारताचे संविधान अन्य जगाप्रमाने त्रिमितीवर आधारित न राहता, चतुःश्मितीवर अवलंबून व्हावे, असे सर्वानुमते ठरले. स्वाभाविकच भारतीय तत्त्वज्ञानात असणारी ही बंधुता व त्या आधारावर संविधानाला यशस्वी करण्याची या महामानवाची योजना ही संविधानाच्या यशस्वीतेचे खरे गमक आहे, असे आपल्याला जाणवते. त्याच वेळी अन्य जगात समता आणण्यासाठी झालेले प्रयत्न पाहिले, तर जगात अन्य कुठल्याही देशात इतक्या सहजतेने समता येऊ शकली नाही. याच सामान्य वाटणार्‍या समतेसाठी फ्रान्स, अमेरिका, रशिया यांना लाखो-कोट्यवधी लोकांची बलिदाने, रक्तपात, नरसंहार सहन करावा लागला आहे. या जगभरातील नरसंसाराला पाहिल्यावर, भारतात संविधानाच्या माध्यमातून व बंधुत्वाच्या तत्त्वावर भारतामध्ये येऊ घातलेली समता सर्वाधिक सहजतेने अवतरत आहे, असेच आपल्याला म्हणता येऊ शकेल.
 
भारतात ही समता आणण्यासाठी, भारतातील विविध संतांनी आपल्या विपुल धार्मिक साहित्यातून समाजामध्ये आणलेली बंधुता जितकी महत्त्वाची आहे, तितकेच महामानवाने प्रत्यक्ष समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे घेतलेले उपक्रम व भूमिका यादेखील महत्त्वाच्या आहेत, हे सर्व अभ्यासकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.
 
समतेसाठीचा बाबासाहेबांचा पहिला प्रयत्न म्हणजे दि. २० मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याचा. जो अधिकार या देशात प्राणिमात्रांना होता, तो अधिकारदेखील माझ्या दलित, वंचित बांधवांना नाही, ही गोष्ट समाजाला समजेल, अशा भाषेत या आंदोलनाने दाखवून दिली व संपूर्ण समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालण्याचे काम यानिमित्ताने केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले काळाराम मंदिर आंदोलनदेखील तितकेच महत्त्वाचे. मंदिरातील प्रवेशाने समाजाचे पोटापाण्याचे प्रश्न सुटणार नव्हते, तरी जो अधिकार अन्य सर्वांना आहे. तो दलित, वंचितांना का नाही? हा प्रश्न बाबासाहेबांनी सगळ्यांच्या समोर यानिमित्ताने उपस्थित केला व हिंदू समाजाच्या हृदयात राम असल्यामुळे या रामाच्या मंदिराच्या प्रवेशातून संपूर्ण हिंदू समाजाच्या हृदयात प्रवेश मिळवण्याचा त्यांचा हा स्वाभाविक प्रयत्न होता; पण दुर्दैवाने महामानव डॉ. बाबासाहेबांच्या आंदोलनाची दिशा, त्याचे सामाजिक महत्त्व, त्याची व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टीने असलेली आवश्यकता, ही तत्कालीन हिंदू समाजातील त्या-त्या ठिकाणच्या सर्व नेतृत्वाच्या लक्षात न आल्यामुळे, बाबासाहेबांना पुढची पावलं उचलावी लागली असे दिसते.
 
या दोन्ही आंदोलनात बाबासाहेबांना समाजाचा मिळणारा पाठिंबा, त्यांच्या पाठीशी असणारी शक्ती या गोष्टी लक्षात घेता, बाबासाहेबांनी या आंदोलनाला कुठेही हिंसक वळण न येऊ दिलेले नाही; किंबहुना सोबत असणार्‍या अनेकांची तशी इच्छा असूनदेखील बाबासाहेबांनी मात्र सकारात्मक व संविधानिक मार्गानेच आपले प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण संयम दाखवला. हा संयम भारतीय इतिहासात अत्यंत मोलाचा व आगामी आंदोलनांना दिशा देणारा मानला गेला पाहिजे. बाबासाहेबांच्या या तत्कालीन संयमाची आज देशातील अनेक विद्रोही संघटनांना अडचण होताना, त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ऐकायला मिळते; पण ‘मी प्रथमतः व अंतिमतः भारतीय आहे’ ही भूमिका बाबासाहेबांनी इतक्या बिकट मनस्थितीत देखील सांभाळली म्हणून त्यांना पुनःपुन्हा नमन करावेसे वाटते.
 
एकूणच तत्कालीन हिंदू समाजात वारंवार प्रयत्न करूनही, सामान्य अधिकारसुद्धा दलित, वंचितांना मिळत नाहीत, हे पाहिल्यावर मात्र बाबासाहेबांनी टोकाचे पाऊल घेण्याचा इशारा देत, येवला येथे धम्मचक्र प्रवर्तनाची घोषणा केली. खरं तर ही घोषणा १९३५ सालची. त्यानंतर समाजात बदल होईल, असं एक समाजसुधारक म्हणून बाबासाहेबांना नेहमीच वाटत होते. पण, सलग २१ वर्षं वाट पाहूनही समाजात आवश्यक तो बदल होत नाही, हे पाहिल्यानंतर दलित, वंचित समाजाच्या सर्वांगीण भवितव्यासाठी ठोस भूमिका घेणे बाबासाहेबांना आवश्यक वाटू लागलं. पण, त्याच वेळी देशातील अराष्ट्रीय शक्तींना आपल्या कृतीचा गैरफायदा घेता येऊ नये, याचीदेखील पूर्णपणे काळजी बाबासाहेबांनी घेतल्याचे आपल्याला स्पष्टपणे जाणवते. धम्मचक्र प्रवर्तनाबद्दल भूमिका व्यक्त करीत असताना, हिंदू धर्माचे कमीत कमी नुकसान व्हावे, अशीच काळजी त्यांनी घेतली आहे.
 
‘इतिहासात माझी ओळख विध्वंसक म्हणून नव्हे, तर समाजसुधारक म्हणूनच झाली पाहिजे व मी खोली बदलली आहे घर नाही,’ ही त्यांची भूमिका इतर सर्वांना अभ्यासायला लावणारी आहे. तसेच, ‘तुम्हाला वाटत असेल, तर मला तुम्ही प्रोटेस्टंट हिंदू म्हणू शकता,’ ही त्यांची भूमिका समाजसुधारक अशी प्रतिमाच देशासमोर आणते. त्यामुळे एकूणच आपले बाबासाहेब त्यांच्या सर्वांगीण राष्ट्रहिताच्या भूमिकेसह समाजासमोर योग्य पद्धतीने आजपर्यंत आणले गेले नाहीत, हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.
 
समाजसुधारक म्हणून त्यांची भूमिका जशी महत्त्वाची, त्याचवेळी एक कट्टर देशभक्त म्हणूनसुद्धा त्यांच्या भूमिका समोर येणे गरजेचे आहे. कारण, ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले; अर्थातच ते विविध राजांना वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्याची पत्र इंग्रजांची देण्याची योजना होती. तसेच एक पत्र त्यांनी हैदराबाद संस्थान स्वातंत्र्याबाबतचे निजामाला सुद्धा दिले होते. हे पत्र सोबत घेऊन, ही केस बाबासाहेबांनी लढावी, असं मत निजामाने व्यक्त केलं होतं. जर बाबासाहेबांनी ती केस घेतली असती व न्यायालयामध्ये निजामाची बाजू मांडली असती, तर देशासमोर काश्मीरसारखाच हैदराबादचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला असता. पण, या प्रकरणी बाबासाहेबांनी निजामाला कुठल्याही प्रकारची मदत तर केली नाहीच; पण त्याचवेळी देशाचे गृहमंत्री असणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल यांना ‘पोलीस अ‍ॅक्शन’बाबत सूचना दिली, अन्यथा ‘मिलिटरी अ‍ॅक्शन’ ही दोन भिन्न देशांमध्ये झालेली ‘अ‍ॅक्शन’ असा अर्थ सूचित झाल्याने, कदाचित ’युनो’मध्ये हैदराबादचा प्रश्न सडत पडण्यासाठी गैरवापर होऊ शकला असता. त्यामुळे निजामाचे भारतातील विलीनीकरण ही बाबासाहेबांच्या विद्वत्तेची कमाल आहे, हे स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान आपल्याला समाजासमोर आणणे गरजेचे आहे.
 
‘हिंदू कोड बिल’
बाबासाहेबांनी आपल्या समाजातील महिलांच्या दैनंदिन जीवनातील वैवाहिक व कौटुंबिक सगळ्या अन्याय- अत्याचाराला दूर करण्यासाठी ‘हिंदू कोड बिला’ची निर्मिती केली व समाजातील नागरी विषयातील सर्व कूप्रथा एका झटक्यात नष्ट करण्याचा प्रयत्न संविधान निर्मितीच्या वेळेस केला. काही लोकांच्या विनाकारण हट्टामुळे हे विधेयक जरी त्यावेळी लगेच मंजूर झाले नसले, तरी पुढच्या काळात चार टप्प्यांत हे विधेयक मंजूर झाले. त्यामुळे हिंदू समाजाअंतर्गत दैनंदिन जीवनातील कूप्रथा निर्मूलनाचे संपूर्ण श्रेय महामानवालाच द्यावे लागेल. पण, दुर्दैवाने त्यांची इच्छा असूनदेखील अशाच प्रकारची सुधारणा त्यांना मुस्लीम व ख्रिस्ती धर्मांमधील महिलांच्या जीवनात करता आली नाही, याचे शल्य त्यांच्या मनात होतेच. त्यामुळेच संविधान मार्गदर्शक तत्त्वांमध्ये त्यांनी किमान नागरी विषयातील तरी सर्व धर्मांमध्ये एकच समान नागरी कायदा असावा, याबाबत स्पष्ट सूचना लिहून ठेवली आहे. राष्ट्रीय दृष्टीने सध्या चर्चेत असणारे ’कलम ३७०’ बाबतही हे कलम कुठल्याच पद्धतीने मान्य नसल्यामुळे, बाबासाहेबांनी या कलमाला ‘तात्पुरते कलम’ असा शब्दप्रयोग राज्यघटनेत केल्याचे आपल्याला वाचायला मिळते.
 
एकूणच बाबासाहेबांची सगळीच विद्वत्ता त्यांनी हिंदू समाजाच्या व राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी लावली, हे आपल्याला त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांमधून लक्षात येते. इंग्रजांना मात्र हा देश तोडायचा होता, इथल्या समाजात भांडणे लावून, आपली सत्ता अधिक अधिक काळ कायम लादायची होती. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा कूविचार, कुभांड समाजात रुजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. पण, त्यांच्या दुर्दैवाने व राष्ट्राच्या सुदैवाने त्यांचा हा प्रयत्न बाबासाहेबांनी वेळीच हाणून पाडल्याचे आपल्याला वाचनाअंती समजते. त्यांच्या कुभांडातील परमोच्च विषय म्हणजे आर्य सिद्धांत की, जो इंग्रजांनी भारतावर लादण्याचा प्रयत्न केला. हा सिद्धांत बाबासाहेबांनी ’ुहे ळी ीर्हीवीर’ या पुस्तकात स्पष्टपणे नाकारला आहे व आर्य हे पूर्णतः भारतीयच आहेत, हे ठासून मांडले आहे. आर्य जर बाहेरून आले असते तर ते कुठून आले? कसे आले? ते जेथून आले, तेथे आज शिल्लक का नाही? व ते तेथून भारतात घोड्यांनी आले असतील तर तेथे घोड्यांची पैदास का नाही? जर आर्य बाहेरून आले, तर इथल्या भूमीला त्यांनी माता कसे मानले? व इथल्या निर्जीव नद्या व डोंगर यांच्यामध्ये थेट देवतांचा वास त्यांना कसा जाणवला? आर्यांबाबत हे सगळेच विषय, सगळ्या भूमिका आर्य बाहेरून आल्याचे न दर्शवता ते इथलेच आहेत, अशी त्यांची स्पष्ट भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
 
खरं तर स्वतः बाबासाहेब हे जोगेंद्रनाथ मंडल यांच्या माध्यमातून संसदेत पोहोचले होते. त्यामुळे त्यांनी मुस्लीमविषयक घेतलेल्या भूमिकांच्या अनुकूल भूमिका बाबासाहेबांना घेणे अत्यावश्यक होते. असे असताना फाळणीच्या वेळेस मात्र बाबासाहेबांनी जोगेंद्रनाथ मंडल यांच्या परस्पर भिन्न भूमिका घेतली. जोगेंद्रनाथ मंडल यांनी पाकिस्तान व पर्यायाने मुस्लीम धर्मीय यांना जवळ केले, तर बाबासाहेबांनी मुस्लीम धर्मीय व पाकिस्तानला पूर्णपणे विरोध करून हिंदूंच्या व भारताच्या बाजूने भूमिका घेतली व भारताच्या म्हणजेच सर्व सहकारी हिंदूंच्या सोबत सर्व अनुयायांसह राहणे पसंत केले. त्याच्यामुळेच त्यांना पुढे संविधान निर्मितीसारखा महत्त्वाचा मान या देशात त्यांच्या अभ्यासानुसार पुढे नेता आला व त्याच वेळी जोगेंद्रनाथ मंडल यांचे मुस्लिमांसोबत गेल्यामुळे, लगतच्या काळात बॅ. जिनांच्या मृत्यूनंतर झालेले हाल देशातील सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यांना ना पाकिस्तानात राहता आलं, ना भारतात, त्यांचा पुढे सन्मान राहिला. त्यामुळे एक अत्यंत कर्मदारिद्य्र, गलितगात्र जीवन मुस्लीम व पाकिस्तानच्या सोबत गेलेल्या जोगेंद्रनाथ मंडल यांना जगावे लागले, तेदेखील भारताच्या भूमीवर परत येऊनच! हे आपण नेमकेपणाने लक्षात घेतले पाहिजे.
 
आज अनेक लेखक बाबासाहेबांना हिंदुत्वविरोधी दाखवण्याचा प्रयत्न करतात व त्याच वेळी ते संघविरोधक होते, हे देखील सांगायला ते मागेपुढे पाहत नाहीत. पण, हे करीत असताना, हे विद्रोही म्हणविणारे लोक याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात की, बाबासाहेबांनी कम्युनिझमच्या विरोधात ’बुद्ध की मार्क्स’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी या भारत देशात बुद्धाचा विचार हजारो वर्षांपासून आहे, त्यामुळे येथे नव्याने मार्क्सच्या तत्त्वज्ञानाची कुठलीही गरज नाही, हे स्पष्टपणे व्यक्त केले आहे. काँग्रेस विचारसरणीच्या विरोधात काँग्रेसने व गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले? व मुस्लिमांच्या विरोधात लिहीत असताना, ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिले आहे. वरील सर्व पुस्तकांमध्ये बाबासाहेबांनी त्यांचा व्यक्तिगत विरोध असणार्‍या, सर्व विचारसरणीचा खरपूस समाचार घेतला आहे. एखाद्या विचाराच्या विरोधात जेव्हा एखादे तत्त्ववेत्ते चारचारशे पान लिहितात, त्यावेळी त्यांच्या मनात या विचारसरणीविषयी कोणत्या भावना असतील, याचा आपल्याला सहजतेने अंदाज येऊ शकतो. पण, त्याच वेळी रा. स्व. संघ विचाराच्या विरोधात बाबासाहेबांनी कधीही कोणत्याही प्रकारचे लेखन केल्याचे आजपर्यंत कोणाला आढळले नाही.
 
पुस्तक तर सोडा; पण काही टिप्पणीसुद्धा कुठेही बाबासाहेबांनी केलेली नाही. उलटपक्षी कमलाकर ठकार यांच्यासारख्या गांधीहत्येतील खोट्या कुभांडामध्ये इतर अनेकांसोबत अटक होऊन बाहेर पडलेल्या स्वयंसेवकाला बाबासाहेबांनी आपल्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सन्मानपूर्वक नोकरीस ठेवले व आयुष्यभर त्यांची परस्परांशी मैत्री कायम राहिली, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस भंडारा येथून खासदारकीची निवडणूक लढली, त्यावेळेस त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची मुख्य धुरा ही भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांनी वाहिल्याचे आपल्याला विविध पुस्तकांमधून वाचायला मिळते. त्यावेळी बाबासाहेबांना दलितेतर नागरिकांची मिळालेली भरघोस मते, हीच बाबासाहेबांच्या पक्षाचे नाव बदलण्यास कारणीभूत ठरली. कारण, त्यानंतर लगेचच बाबासाहेबांनी आपल्या पक्षाचे नाव ’शेड्यूल कास्ट फेडरेशन’ऐवजी ’रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ असे करण्याबाबतची सूचना सर्वांना पत्राद्वारे कळविलेली आहे.
 
एकूणच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्रभक्तीने रसरसलेले व एका सच्चा समाजसुधारकाचे जीवन आहे. कुठल्याही भारतीय उपासना पद्धतीचा विरोध त्याच्यात दिसत नसून, जर असेल तर तो केवळ आणि केवळ समाजसुधारणेच्या दृष्टीनेच आहे. मात्र, त्यांच्या सगळ्या भूमिका लक्षात येण्यासाठी, त्यांची स्वतः लिहिलेली पुस्तके वाचणे गरजेचे असून, त्यांच्याबाबत अनेक एजंटांनी स्वतःची मतं बाबासाहेबांच्या तोंडी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे, ती वाचून आपल्याला खरे बाबासाहेब उमजणार नाहीत. आपले राष्ट्रभक्त व समाजसुधारक बाबासाहेब त्यांच्या स्वतःच्या योग्य स्वरुपात समाजासमोर आणणे, ही काळाची गरज आहे.आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना व सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या संविधान म्हणजेच भारताच्या या आधुनिक स्मृतीला विनम्र अभिवादन!
निलेश गद्रे 
८२७५०४३९८७