स्टार्टअपसह व स्टार्टअपच्या माध्यमातून लघु उद्योग क्षेत्रात नवउद्योजकांना नव्या व वाढत्या प्रमाणांवर संधी मिळत असतानाच, प्रत्यक्ष स्टार्टअप क्षेत्रातील नवउद्योजक म्हणून महिलांची संख्या मात्र अगदी जागतिक स्तरावर सुद्धा मर्यादित राहिली आहे. भारताच्या संदर्भात पण हीच बाब लागू असून, ऐतिहासिक पार्श्वभूमी व सद्यःस्थिती अशाच स्वरुपाची असून, त्यामुळेच या विषयाचा मुळातून विचार होणे गरजेचे ठरते.
संदर्भात सकृतदर्शनी अनुभवास येणारी बाब म्हणजे, स्टार्टअपसह आपल्या लघु उद्योग वा छोटेखानी व्यवसाय सुरू करणार्या महिलांच्या व्यवसाय प्रस्तावांना त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यातच नाकारण्यात येते अथवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. बहुसंख्य महिला लघु उद्योजकांना या समस्येला तोंड द्यावे लागते. हा अनुभव बहुसंख्य महिला नवउद्योजकांना येतो.
‘हाय वे-एआय’च्या सहसंस्थापिका दीपिका लोगनाथन यांच्या मते, “महिलांमध्ये व विशेषतः तरुणींमध्ये आज स्वतःचा छोटेखानी व्यवसाय करून, स्वयंरोजगार करण्याची मोठी इच्छा आहे. त्यानुसार त्यांचे प्रयत्न सुरू असतात. या प्रयत्नांच्या पहिल्या टप्प्यात त्यांना अधिकांश अर्थसाहाय्य हवे असते. त्यानुसार त्यांचे प्रयत्न सुरू असतात व येथेच त्यांच्या अडचणींची सुरुवात होते.”
दीपिका लोगनाथन आपल्या अनुभवातून सांगतात की, ”या वयोगटातील महिलांसमोर त्यांच्या लघु उद्योगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुरुवातीची गुंतवणूक व अर्थसाहाय्य यासंदर्भात दुहेरी संकटे व प्रश्नचिन्ह संकट स्वरुपात उभे ठाकतात. एक म्हणजे, या अधिकांश युवतींचे नव्यानेच लग्न झाले असते व त्यामुळे लग्नानंतरच्या पहिल्या टप्प्यातच स्वतःच्या लघु उद्योगासाठी पैसे कुठून आणि का म्हणून गुंतवावे व दुसरा येणारा प्रश्न म्हणजे, ही नव्या गुंतवणुकीची रक्कम कशी आणि कुठून आणायची?
वरील प्रश्न आणि प्रश्नावलीच्या पार्श्वभूमीवर, नव्या अर्जदार-उद्योजक महिलांना ‘तुम्हाला व्यवसायाचा अनुभव नाही वा पैशांचे पाठबळ नाही’ यांसारख्या कारणांवरून त्यांची बोळवण केली जाते. परिणामी, बर्याच महिलांच्या गृहोद्योग वा लघु उद्योगांसह स्टार्टअप सुरू करण्याच्या प्रयत्नांना त्यांच्या प्रयत्नांच्या पहिल्याच टप्प्यात खीळ बसते.”
नव्या स्टार्टअप संदर्भातील आकडेवारीनुसार, स्पष्ट होणारी बाब म्हणजे, नव्याने स्टार्टअपसह आपला स्वतःचा लघुु उद्योग सुरू करणार्या पुरुषांच्या तुलनेत महिला नवउद्योजकांची संख्या कमी होत गेली आहे. यामागे वर नमूद केल्याप्रमाणे, या महिलांना सुरुवातीची गुंतवणूक व अर्थसाहाय्य न मिळणे, हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
’बीसीटी डिजिटल’ या कंपनीच्या मुख्याधिकारी व ‘प्राईस वॉटर कूपर’ कंपनीच्या संचालक जया वैद्यनाथन याच्या मते, ”आपल्या स्टार्टअपविषयक वा नवउद्योजकांशी संबंधित सध्याची जी व्यवस्था आणि मानसिकता प्रचलित आहे, त्यानुसार या मंडळींच्या मते, महिला उद्योजक-अर्जदारांच्या आर्थिक स्थिती वा क्षमतेच्या संदर्भात सुरुवातीपासूनच शंका उपस्थित केल्या जातात. आर्थिक प्रस्तावाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या वा मूलभूत बाबी पडताळून घेणे आवश्यक असले, तरी या संदर्भात अतिरेकी स्वरुपात भूमिका घेण्याचे कारण नसून, असे झाल्यास महिलांच्या नवउद्योजकतेला कधीच पाठबळ मिळणार नाही,” असे परखड मत जया वैद्यनाथन यांनी व्यक्त केले आहे.
याच विषयाची पुष्टी जागतिक संदर्भात देखील केली गेली. यासंदर्भात सुमारे दहा वर्षांपूर्वी हॉवर्ड विद्यापीठातर्फे जागतिक स्तरावर केलेल्या अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे की, त्यावेळीच्या एकूण लघु उद्योजकांच्या अर्थसाहाय्याच्या एकूण प्रस्तावांपैकी जे प्रस्ताव पारित करण्यात आले होते, त्यापैकी ७० टक्के प्रस्ताव हे पुरूष लघु उद्योजकांकडून सुरू करण्यात आले होते व महिला लघु उद्योजकांना मंजूर करण्यात आलेल्या आर्थिक प्रस्तावांचे प्रमाण ३० टक्के आहे. या परिस्थितीत अद्याप फारसा बदल झालेला नाही.
‘कॅस्पियन डेब्ट’ या उद्योजकांना आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रात साहाय्य व मार्गदर्शन करणार्या व्यवस्थापन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अविशेक गुप्ता सुद्धा महिला उद्योजकांच्या संदर्भात नमूद केलेले तथ्य आणि आकडेवारीशी सहमत आहेत. ’कॅस्पियन डेब्ट’ने साहाय्य केलेल्या महिला स्टार्टअपचे प्रमाण सुमारे ३३ टक्के आहे. हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. अविशेक गुप्ता यांच्यानुसार, स्टार्टअप वा लघुउद्योग क्षेत्रात नवउद्योजकांना अर्थसाहाय्य करताना रकमेची परतफेड ही बाब महत्त्वाची ठरते. या पडताळणीच्या प्रक्रियेमध्ये आर्थिक साहाय्य वा व्यवस्थापन करणार्या कंपन्यांचा कल स्वाभाविकपणे पुरूष लघु उद्योजकांच्या प्रस्तांवाकडे जातो.
यासंदर्भात स्पष्ट झालेली अन्य बाब म्हणजे, आर्थिक कंपन्यांपैकी ज्या कंपन्यांचे प्रशासन- व्यवस्थापन महिलांकडे आहे, अशा कंपन्या महिलांच्या स्टार्टपला आर्थिक साहाय्य देण्यासाठी पुढाकार घेतात. या मागे या महिला आर्थिक वा व्यवस्थापन तज्ज्ञांचे स्वतःचे अनुभव व त्यांचा पुढाकार महत्त्वाचा असतो. या संदर्भात ’शोभितम’ या ऑनलाईन विक्री व्यवस्थापनाचे काम करणार्या कंपनीच्या सहसंस्थापक व मुख्य तांत्रिक अधिकारी अपर्णा त्यागराजन. ’इंडियन एंजल्स’ या स्टार्टअप उद्योजक मंचावर सहभागी महिलांच्या स्टार्टअप प्रस्तावांची पाठराखण करून, तसा पुढाकार घेणार्या, त्या एकमेव परीक्षक ठरल्या. त्यांच्या मते, “स्टार्टअप वा तत्सम उद्योजक क्षेत्रातून येणारे व्यवसाय प्रस्ताव व त्यावरील विशेषतः अर्थसाहाय्य विषयक मुद्द्यांचा विचार करताना, पुरूष-महिला अशी तुलना करता योग्य व सक्षम स्टाटर्र्अप प्रस्ताव महिलांकडून आला, तरी त्याचा सकारात्मक विचारा करायला हवा.”
महिला स्टार्टअप प्रस्तावांच्या संदर्भात प्रकाशित विविध अहवाल आणि अभ्यासांचा मुळातून विचार होणे गरजेचे ठरते. २०२३च्या ‘महिलांचा विज्ञान अणि अभियांत्रिकी क्षेत्रातील सहभाग’ या विषयावरील संशोधनाद्वारे स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, सध्या स्टार्टअप क्षेत्रात सुमारे ३२ टक्के स्टार्टअप महिलांद्वारे स्थापन करण्यात आले असून, त्याचे व्यवस्थापन-संचालन महिलाच करीत आहेत.
त्याचप्रमाणे २०२०च्या ’बेन अॅण्ड कंपनी’ या व्यवस्थापन सल्लागार कंपनीच्या अभ्यासानुसार, महिलांद्वारे संचालित स्टार्टअप व्यवसायातून आजवर सुमारे दोन कोटी स्वयंरोजगार वा रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये काम करणार्यांमध्ये महिलांची संख्या सुमारे ६५ टक्के आहे, हे विशेष. यातून महिलांच्या आर्थिक प्रगतीमध्ये लक्षणीय स्वरुपात वाढ झालेली आहे. स्टार्टअप-लघु उद्योग क्षेत्रात महिलांचे प्रमाण तुलनेने कमी असले, तरी त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)