हे तर नामधारी मुंबईकर!

    11-Apr-2024   
Total Views |

UDDHAV THACKERY

उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता हाती असताना, गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक तरी चांगले काम दाखवावे,” अशी टीका नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांच्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. आता यावर कोणी म्हणेल की, खरंच २५ वर्षांत मुंबई पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना, काहीच कामे झाली नाहीत का? तर तसे नाही. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत विविध प्रकल्प राबविले गेले खरे. परंतु, फडणवीस म्हणतात, तसे चांगले अथवा ठोस किंवा मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला हातभार लावेल, असे काम मात्र या काळात झालेले दिसून येत नाही. वर्सोवा-घाटकोपर मुंबई मेट्रो-१ असेल अथवा वांद्रे-वरळी सी लिंक हे प्रकल्प राज्य सरकारचे आणि त्यांच्याही अंमलबजावणीत कमालीचा विलंब झाला, हे मान्य करावेच लागेल. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासून ते आरोग्य सेवेपर्यंत सर्वच व्यवस्थांवर आज कमालीचा ताण जाणवतो. तसेच वाढती लोकसंख्या, या महानगराचे औद्योगिक महत्त्व याचा दीर्घकालीन विचार ठाकरेंनी यत्किचिंतही केलेला दिसत नाही. कारण, जर मुंबईच्या सर्वंकष नियोजनाचा, पायाभूत सुविधांचा २५ वर्षांपूर्वीच सांगोपांग विचार केला असता, तर कदाचित आज मुंबईचे सर्वांगीण चित्र आश्वासक असते. पण, दुर्दैवाने झोपडपट्ट्यांना वेळोवेळी दिलेले राजकीय संरक्षण असेल अथवा धारावी पुनर्विकासासारखा रखडवलेला प्रकल्प, ठाकरेंनी मुंबईचा नव्हे, तर केवळ मतपेढीचाच विचार केला. ठाकरेंना यदाकदाचित दूरदृष्टी असती, तर मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न वर्तमानाइतका बिकट झाला नसता, ऐन मार्चमध्ये मुंबईला पाणीटंचाईच्या झळाही सोसण्याची वेळ आली नसती की, पालिकेच्या रुग्णालयांमध्ये आजच्या सारखी विदारक अवस्था दिसली नसती. त्यामुळे केवळ मुंबईमध्ये वास्तव्य असल्याने आणि इथूनच सत्तेची सूत्रे हलविल्याने आपण मुंबईकर झालो, मुंबईवर आमचाच हक्क हा आर्विभाव चुकीचाच.फडणवीसांच्या विकासदृष्टीतून साकारलेले मेट्रो, कोस्टल रोड यांसारखे प्रकल्प मुंबईकरांच्या डोळ्यांदेखत मागील दशकभरातच उभे राहिले आहेत. त्यामुळे खरोखरंच २५ वर्षांत या नामधारी मुंबईकरांनी मुंबईला केवळ ओरबाडले अन् लुटले, हेच खरे! 


...म्हणूनच ‘इंजिना’ची धास्ती!
 
आपल्या राजकीय पक्षाची, नेत्याची भूमिका न पटल्यामुळे संबंधित पक्षाचा राजीनामा देणारे अनेक कार्यकर्ते, नेते हल्ली पाहायला मिळतात. यापैकी काहींची पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची कारणं राजकीय असतात, तर काही कार्यकर्ते-नेते खरंच आपल्या नेत्याने घेतलेली विशिष्ट भूमिका न रूचल्याने बाहरेचा रस्ता धरतात. मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मनसेमधील काही नेते-कार्यकर्त्यांना राज ठाकरेंची ही भूमिका पचनी पडली नाही, म्हणून त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. पण, यावरून राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका कशी पक्ष फोडणारी आहे आणि त्यामुळे मनसेला भविष्यात गळती लागेल, अशी आरोपांची लडी पेटवत, विरोधकांनी त्यावर तोंडसुख घेतले. पण, मुळात विरोधी पक्षात असलेला उद्धव ठाकरेंचा गट असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्या पक्षाचेच दोन शकले उडाली. त्यामुळे ज्यांचे पक्षच दुभंगलेले, ज्यांनी आपले निवडणूक चिन्हही गमावले, त्यांनी मनसेला काही कार्यकर्त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ केला म्हणून इतके हुरळून जाण्याचे ते कारणच काय? मनसेमधून यापूर्वीही बरेच नेते-कार्यकर्ते बाहेर पडले. काही नेत्यांनी वेगळी वाट धरली. आज ते लोकप्रतिनिधी म्हणून इतर पक्षांतून निवडूनही आले. अशीच परिस्थिती हल्ली कमी-अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांत दिसून येते. साहजिकच कोणत्याही नेत्या-कार्यकर्त्याने पक्षत्याग करणे, हे पक्षासाठी अनुकूल नाहीच. पण, म्हणून संबंधित पक्षाचे अस्तित्वच संपले, असे होत नसते. खुद्द उद्धव ठाकरेंनी मविआसोबत सरकार स्थापन केल्यानंतरही, कित्येक शिवसैनिकांनी ठाकरेेंना राम राम ठोकला होताच. त्यामुळे राज ठाकरेंनी भाजपला समर्थन दिल्याने, त्यांची संघटनाच कमकुवत झाली वगैरे दावे करणे, हेच मुळात हास्यास्पद. महायुतीऐवजी राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला समर्थन दिले असते आणि त्यानंतर काही नेत्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली असती तर? असे नेते मग महाविकास आघाडीसाठी धोकेबाज ठरले असते. असो. मनसेच्या इंजिनाने यंदा राष्ट्रोत्थानाच्या शक्तीची दिशा निवडली आहे. त्यामुळे आता ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत आपलीच पोलखोल होते की काय, या धास्तीने मविआच्या नेत्यांचे दाबे दणाणलेले दिसतात. म्हणूनच छिद्राला आणखी भोके पाडण्याचेच हे केविलवाणे प्रयत्न...


विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची