सर्वांसाठी रामभक्ती...

    10-Apr-2024   
Total Views |
shri ram


सज्जनांना त्रास देणार्‍या, देवांना तुरुंगात टाकणार्‍या, सीतेचा मानभंग करणार्‍या लंकासम्राट रावणाचा अंत रामाने केला होता आणि सार्‍यांना जाचातून मुक्त केले होते. रामचरित्राचा हा वेगळा अर्थ, सामाजिक आशय स्वामींच्या लक्षात आल्याने दिल्लीसम्राट कपटी, क्रूर औरंगजेबाचा अंत रामावतारी पुरुषाकडून होणार आहे, असे मानून स्वामींनी रामकथा आपल्या समाज व संस्कृती रक्षणासाठी श्रेष्ठ मानली.

कृतिशून्य बाष्फळ बडबड, तसेच सर्व ठिकाणी संशयाने पाहणे या सवयीमुळे आयुष्यात काहीही साध्य करता येत नाही. वायफळ बडबड आणि संशयी स्वभाव यामुळे प्रपंचातील, व्यवहारातील साध्या गोष्टीही मिळवता येत नाहीत, भगवंताची भक्ती तर फार दूर राहते. भगवद्भक्तीसारखे शाश्वत ध्येय मिळवण्यासाठी जो सत्यसंकल्प करायचा असतो, तेथे व्यर्थ बडबड व संशय यांना जवळ फिरकू देणे उपयोगाचे नाही. त्यांना मनातून हद्दपार करणे इष्ट. तसे केल्यानंतर एकांतकाळी परमेश्वराचे चिंतन करावे, असे स्वामींनी मागील श्लोेक क्र. १३० मध्ये सांगितले आहे. हिंदवी स्वराज्याचा हेतू मनात ठेवून हिंदूसंस्कृती रक्षणार्थ स्वामींनी हिंदुस्थानभर अनेक मठ स्थापन केले. त्यावर महंतांच्या नेमणुका करून महंतांना आपल्या कार्यासाठी कामाला लावले. स्वामींनी महंतांचे संघटन तयार केले. शिष्यसमुदाय मिळवला. समर्थांनी मोठा लोकसंग्रह संपादन केला.

स्वामींच्या कार्यकर्तृत्वामुळे व वेधवंती निःस्पृह व्यक्तिमत्त्वामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. स्वामींच्या कार्याचा विचारांचा विलक्षण प्रभाव तत्कालीन समाजावर होता. त्यातून स्वामींना लोकप्रियता लाभली होती. तरी लोकान्ताच्या आहारी न जाता स्वामींनी एकांत प्रिय मानला. आपले काम झाले की, स्वामी जवळच्या एखाद्या घळीत मुक्कामाला जात. निसर्गसान्निध्यात एकांतात राहणे स्वामींना आवडे. पण, त्यामुळे त्यांच्या कार्यात खंड पडत नसे. दासबोधात अनेक ठिकाणी स्वामींनी एकांताची महती गायली आहे. स्वामींच्या मते, एकांतात अनेक विषयांवर सखोल चिंतन करता येते, त्या विषयांचे आकलन होते. तसेच त्यांचा विविधांगी अभ्यास करता येतो. स्वामी म्हणतात.
 
अखंड येकांत सेवावा। अभ्यासचि करीत जावा।
काळ सार्थकी करावा। जनासहित॥
 
स्वामींना जुलमी म्लेंच्छ राजसत्तेपासून देशाला, तीर्थक्षेत्रांना, लोकांना आणि हिंदू संस्कृतीला सोडवायचे होते. महत्त्वाच्या
कार्यसिद्धीसाठी एकांतात राहून शांतपणे योजना करता येतात, विचारांचे वेगवेगळे पैलू समजून त्यांचा बोध होतो. स्वामी म्हणतात,

जयास येकांत मानला।
अवघ्या आधी कळे त्याला।
 
 
परमार्थातील सत्यसंकल्प पूर्तीसाठी एकांताची आवश्यकता असते. भगवद्भक्ती एकाग्र मनाने करायची असते आणि एकांतात मन लवकर एकाग्र होते. यासाठी स्वामींनी शिष्यांना उपदेश केला आहे की,

शिष्या येकांती बैसावे। स्वरूपी विश्रांतीस जावें।
तेणे गुणे दृढावें। परमार्थ हा॥


एकाग्र मनाने भगवंताची उपासना केल्यास परमार्थातील आनंद अनुभवास येऊ लागतो. एकांतात आपल्या मूळ स्वभावाशी स्थिर झाल्यावर परमार्थ दृढ होतो. परमार्थ निश्चितपणे साधता येतो. आपल्या उपास्य देवतेशी भक्तिभावाने एकरूप झाल्यावर उपास्य देवतेचे थोडेतरी गुण उपासकात दिसू लागतात, असा भक्तिपंथातील एक नियम आहे. त्यातून भक्ताचे मन शांत होते. मन अल्प स्वल्प क्षूद्र संकल्प करण्याऐवजी मनाला सत्यसंकल्पाची जाणीव होते. परमार्थिक सत्यसंकल्प साधण्यात जीवाचे कल्याण आहे, हे पटल्याने मन त्यादृष्टीने प्रयत्न करू लागते. येथे भगवद्भक्तीला सुरुवात होते.भगवद्भक्ती करण्यासाठी कोणत्या देवाची निवड करावी, असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असतो. यासंदर्भात लोकरूढी, परंपरा, प्रथा यांना महत्त्व देतात अथवा इतरांचे अनुकरण करताना दिसतात. वास्तविक कोणत्या देवाची भक्ती करावी, हा प्रश्नच मुळात अनाठायी आहे. सर्व देवांचे मूळ स्थान एक परमात्मतत्त्व आहे. सर्व देवांची केलेली उपासना, भक्ती त्या एका परमात्म तत्त्वाला जाऊन मिळते. समर्थ त्या परमात्म तत्त्वाला ‘थोरला देव’ म्हणून संबोधतात. असे असले तरी कोण्या एका देवाची निवड करायची, तर ती रामाची करावी, असा स्वामींचा अभिप्राय आहे. कारण, रामाच्या अंगी असलेले सद्गुण परमार्थ व प्रपंच दोन्हीकडे अनुकरणीय आहेत. हा भाव स्वामींनी पुढील श्लोकात प्रकट केला आहे-

भजाया जनीं पाहतां राम येकु।
करीं बाण येकु मुखीं शब्द येकु।
क्रिया पाहतां उधरे सर्व लोकु। 
धरा जानकी नायकाचा विवेकु ॥१३१॥

 
नाशिक येथील १२ वर्षांच्या तपाचरणानंतर स्वामींना रामरायाचा साक्षात्कार झाला. रामाच्या आज्ञेने स्वामींनी पुढील १२ वर्षे सार्‍या हिंदुस्थानभर तीर्थयात्रेच्या मिषाने पायी भ्रमण केले. त्या काळात स्वामींनी हिंदू समाजाची आणि हिंदू संस्कृतीची अवनत अवस्था पाहिली. म्लेंच्छांची जुलमी राजसत्ता, त्यांची हिंसक आक्रमकता व दहशत यामुळे तत्कालीन हिंदू समाज भांबावून गेला होता. ही सामाजिक दुरवस्था व सांस्कृतिक पडझड पाहून दासांचे हृदय द्रवले, यासाठी या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचारात स्वामी तीर्थयात्रेहून परतले. तीर्थयात्रा संपल्यावर आपल्या राष्ट्राला, समाजाला, संस्कृतीला वाचवले पाहिजे, या निर्धाराने स्वामी कामाला लागले.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपल्या कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम लोकांना कोणत्या देवाची उपासना सांगावी, हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. हिंदूंच्या देव्हार्‍यात तर देवदेवतांची दाटी झाली होती. जो तो आपल्या आवडीप्रमाणे, परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे देवांची उपासना करीत होता. स्वामींनी तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीनुसार उपासनेचा हा प्रश्न मोठ्या कौशल्याने सोडवला. तत्कालीन राजकीय परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर स्वामींना कपटी क्रूर औरंगजेब हा रामायणकालातील रावणाप्रमाणे भासला. औरंगजेब आणि रावण दोघेही या भूमीचे नव्हते. त्यांचे आचरण इथल्या संस्कृतीच्या विरोधात होते. म्लेंच्छ सैन्य राक्षसांप्रमाणे निर्दयी होते. त्यांना कशाची चाड नव्हती. सज्जनांना त्रास देणार्‍या, देवांना तुरुंगात टाकणार्‍या, सीतेचा मानभंग करणार्‍या लंकासम्राट रावणाचा अंत रामाने केला होता आणि सार्‍यांना जाचातून मुक्त केले होते. रामचरित्राचा हा वेगळा अर्थ, सामाजिक आशय स्वामींच्या लक्षात आल्याने दिल्लीसम्राट कपटी, क्रूर औरंगजेबाचा अंत रामावतारी पुरुषाकडून होणार आहे, असे मानून स्वामींनी रामकथा आपल्या समाज व संस्कृती रक्षणासाठी श्रेष्ठ मानली म्हणून स्वामींनी त्याचा स्पष्ट शब्दात उल्लेख केला आहे-


कथा नृसिंह वामना भार्गवाची।
कथा कौरवा पांडवा माधवाची।
कथा देवइन्द्रादी ब्रह्मादिकांची।
समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची॥

 
सर्व विचारमंथनातून इतर देवांविषयी आदरभाव व भक्ती असूनही ‘रामासारखा देव नाही’ असा निष्कर्ष स्वामींनी काढला. स्वामी वरील श्लोकात म्हणाले, ‘भजाया जनीं पाहता राम येकु।’ या नंतरच्या पुढील ओळीत स्वामींनी रामाची वैशिष्ट्ये, त्याचे गुणविशेष, क्रियाविशेष व विवेकपूर्ण आचरण ही सांगितली आहेत. ती पुढील लेखात पाहता येतील.




सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..