यंदा 'सपा'चा बालेकिल्ला ढासळणार?

भाजपतर्फे मैनपुरीमधून योगी सरकारचे मंत्री जयवीरसिंह ठाकूर मैदानात

    10-Apr-2024
Total Views |
SP Uttar pradesh bjp candidates
 

नवी दिल्ली ( पार्थ कपोले ) :   समाजवादी पक्षाचा (सपा) बालेकिल्ला असलेल्या मैनपुरी मतदारसंघातून भाजपने उत्तर प्रदेश सरकारचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीरसिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. सपा संस्थापक आणि राज्यातील दिग्गज नेते म्हणून दिवंगत मुलायसिंह यादव यांची ओळख होती. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, तसेच त्यांनी लोकसभेतही पक्षाचे प्रतिनिधीत्व केले होते.

मैनपुरी मतदारसंघातून मुलायमसिंह यादव १९९६ साली पहिल्यांदा खासदार झाले होते. त्यानंतर २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे पाचवेळा खासदार होते. त्याचप्रमाणे हा मतदारसंघ १९९६ सालापासूनच सपाचा बालेकिल्ला राहिला आहे. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर २०२२ साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या सुनबाई आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या येथून खासदार झाल्या आहेत. यंदादेखील सपाने डिंपल यादव यांनाच उमेदवारी दिली आहे.


हे वाचलंत का? - कॅनडा सरकारचा भारताविरोधात खोटा अपप्रचार; कॅनेडियन गुप्तचर संस्थेने दाखविला आरसा!


भाजपने आतापर्यंत एकेकाळी समाजवादी बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आग्रा, इटावा, फिरोजाबाद, कन्नौज, एटा, फारुखाबाद आदी लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सपाचा हा बालेकिल्ला काबीज करण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यासाठी पक्षाने उत्तर प्रदेश सरकारचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीरसिंह ठाकूर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे.
 
जयवीरसिंह ठाकूर हे सध्या मैनपुरी सदर या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. विशेष म्हणजे २०२२ साली ठाकूर यांनी सपाचे सलग दोनवेळचे आमदार राजू यादव यांचा पराभव केला होता. मैनपुरी लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्याच्या इराद्याने भाजपने दोन वर्षांपूर्वी ठाकूर यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद दिले होते. त्यानंतर गेल्या वर्षीच्या पंचायत निवडणुकीत तब्बल ३० वर्षे सपाकडे असलेली जिल्हा पंचायतीची जागा भाजपने काबीज केली आहे. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात प्रभाव निर्माण करण्यात भाजपला यश आले आहे.

दरम्यान, भाजपने लोकसभा उमेदवारांची दहावी यादी बुधवारी जारी केली. यामध्ये उत्तर प्रदेशातील सात, चंदीगढ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांना बलिया येथून उमेदवारी दिली आहे. कौशांबीमधून विनोद सोनकर, फुलपूरमधून प्रवीण पटेल, अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी, गाझीपूरमधून पारस नाथ राय, मच्छिलिशहरमधून बी. पी. सरोज यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून एस. एस आणि चंदीगढमध्ये संजय टंडन यांनी उमेदवारी जाहिर झाली आहे.


अशी आहेत सामाजिक समीकरणे

मैनपुरी मतदारसंघामध्ये यादव समुदायाच्या मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे जवळपास ४.२५ लाख आहे. त्याखालोखाल शाक्य समुदायाचे मतदार ३.२५ लाख तर ब्राह्मण समुदायाचे मतदार १.१० लाख, अनुसूचित जातींच्या मतदारांची संख्या १.२० लाख एवढी आहे, तर मुस्लिम मतदार जवळपास ५५ हजार आहेत. यादवबाहुल्य मतदासंघ असतानाही ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये विजय प्राप्त केला होता. त्यामुळे भाजपला त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे. त्याचवेळी मुलायमसिंह यादव यांच्या पुण्याईवर पुन्हा एकदा विजय मिळविण्याची डिंपल यादव यांना खात्री आहे.