माघार घेऊ नका! विजय शिवतारेंना मध्यरात्री फोन; अजितदादांचा खुलासा
10-Apr-2024
Total Views | 173
पुणे : विजय शिवतारेंनी निवडणूकीतून माघार घेऊ नये यासाठी त्यांना रात्री फोन आले असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच नुसती संसदेत भाषणं करुन बारामतीचा विकास होत नाही, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंचे नाव न घेता लगावला आहे. ते मंगळवारी बारामतीतील सभेत बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "विजय शिवतारेंना काही लोकांनी रात्री फोन करुन माघार घेऊ नको, फॉर्म खाली ठेव असं सांगितलं. त्यांनी कुणाकुणाचे फोन आले ते मला दाखवलं. ते नंबर कुणाचे होते हे तुम्हाला दाखवलं तर तुम्ही म्हणणार कुठल्या थराला राजकारण चाललं आहे. शिवतारेंनी मला, एकनाथ शिंदेंना आणि फडणवीसांनाही ते फोन दाखवलेत. मला इतकं वाईट वाटलं की, ज्यांच्यासाठी मी जिवाचं रान केलं त्यांच्याकडून इतक्या खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे."
"पण यावेळी भावनिक होऊ नका. जसाजसा एक एक दिवस पुढे जाईल तसं तसं भावनिक केलं जाईल. नुसतं पार्लमेंटमध्ये भाषणं करुन माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत. मी सुद्धा भाषणाच्या बाबतीत नंबर एक आहे. पण मी भाषणंही करतो आणि कामंही करतो. मी विकासाकरिता निधीसुद्धा आणतो," असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "बारामतीतील १०० टक्के कामं मी केलेली आहेत. परंतू, काहींनी स्वत:च्या पुस्तकात हे आम्हीच केलं आहे, असं दिलंय. आताच्या विद्यमान खासदारांच्या पुस्तकात नगरपालिकेची इमारत दिसली. पण याला सगळा पैसा मी दिला. त्याचं डिझाईनही मी केलं. पंचायत समिती, बसस्थानक, पोलिसांचे ऑफिस ही कामं मी केली," असेही त्यांनी सांगितले.