शिक्षण-संस्कृती संवर्धनासाठी...

    01-Apr-2024   
Total Views |
Aritcle on Amit Suresh Apte



चेंबूरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कलाविश्वात स्वत:च्या विचारकार्याचा ठसा उमटवणारे अमित सुरेश आपटे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...

कला, सामाजिक विश्वात स्वतःचा ठसा उमटवणारे अमित सुरेश आपटे. ते पेशाने कर सल्लागार. आपल्या यशाची गुरुकिल्ली सहसा कोणीही कुणाच्याही हातात देत नाही. मात्र, अमित यांनी आजपर्यंत शेकडो युवक-युवतींना कर सल्लागार संदर्भातील प्रात्यक्षिक शिक्षण दिले. त्यामुळे कर क्षेत्रामध्ये शेकडो तरूण-तरुणी आज यशस्वीरित्या कार्यरत आहेत.

अमित आपटे म्हणजे चेंबूरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक विश्वातले सुपरिचित नाव. उत्तम व्याख्याते आणि निवेदक म्हणूनही ख्याती. त्यांच्या व्याख्यानाचे विषयही अगदी वेगळ्या धाटणीचे. महामानव म्हटले की, महामानवाच्या ठरावीक गुणविशेषालाच केंद्रबिंदू करून, त्यावरच बोलायचे-लिहायचे असेच सर्वसाधारणपणे केले जाते. पण, त्यापलीकडे जाऊन, त्या महापुरुषांच्या दुर्लक्षित केलेल्या गुणाबद्दल, कार्याबद्दल जनजागृती करण्याचा निर्धार आणि कार्य चेंबूरचे अमित आपटे करतात. उदाहरणार्थ, लोकमान्य टिळक म्हटले की त्यांचा जहाल मतवाद, देशभक्ती यांवर चिंतन केले जाते. अमित हे टिळकांच्या ज्ञानोपासनेबद्दल, प्रखर बुद्धीतेज आणि त्यातून निर्माण झालेल्या अद्वितीय ग्रंथसंपदेवर व्याख्यान देतात. ’विवेकानंद चरित्र चिंतन’, ’विवेकांनद विचारधन’, ‘सावरकर’, ‘वासुदेव फडके’, ’वंदे मातरम् गीताचा इतिहास’ यांसारख्या अनेक विषयांवर अमित यांचा अभ्यास आहे.

चेंबूरच्या सुप्रसिद्ध ’बालविकास संघा’चेही ते गेली अनेक वर्षे कार्याध्यक्ष आहेत. चेंबूरमध्ये ’संत महोत्सव समिती’तर्फे ‘संत महोत्सव’ साजरा होत असून त्या समितीचेही ते सक्रिय सदस्य आहेत. ‘चेंबूर हिंदू गणेशोत्सव मंडळा’मध्ये त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. चेंबूरमधील विविध कला, सामाजिक संस्था यांच्या एकत्रिकरणातून ’कलारंग’ संस्थेची निर्मिती झाली. अमित ’कलारंग’ संस्थेचे सक्रिय सदस्य आहेत. २००५ सालचा मुंबईतील महापूर असू दे की, २०२० सालची कोरोना महामारी, या दोन्ही आपत्तींमध्ये अमित यांनी सहकारी आणि संस्थांच्या माध्यमातून अविस्मरणीय लोकसेवेचे दर्शन घडविले.

आताचे सर्वार्थाने चेंबूरकर झालेले अमित आपटे यांचे मूळ गाव राजापूरचे देवाच गोठण. मात्र, कामानिमित्त त्यांचे पूर्वज मुंबईत चेंबूर येथे स्थायिक झाले. सुरेश आणि नीला आपटे या पापभिरू दाम्पत्याला दोन अपत्ये. त्यापैकी एक अमित. अमित लहानपणापासूनच रा. स्व. संघाच्या शाखेतही जाऊ लागले. त्यावेळी त्यांचे शिक्षक होते-शेलेश कर्‍हाडकर, विजय नलावडे. समाजशीलता, राष्ट्रनिष्ठा याचे बाळकडूच त्यांना येथे मिळाले. तसेच रामायण महाभारत आणि अनेक धार्मिक ग्रंथसंपदांचे अक्षरशः पारायणेच आपटे कुटुंबात व्हायची. आपला धर्म, आपली संस्कृती आपण जपलीच पाहिजे, यासाठी सुरेश आग्रही असत. त्यामुळे समाजातील कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्याला जाताना, ते अमित यांना सोबत घेऊन जात.

अमित तेव्हा दहावीला होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की, ”एका व्यक्तीचे निधन झाले आहे. ती व्यक्ती कोण आहे, माहिती नाही; पण त्यांना नातेवाईक नाहीत असे दिसते. त्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला तुला खांदा द्यायला जायचे आहे.” असे मानले जाते की, आईबाबा जीवंत असलेल्या व्यक्तीने अंत्ययात्रेत खांदा द्यायचा नसतो. अमित यांनी हे त्यांच्या वडिलांना सांगितले. त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले की, ”त्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेत खांदा द्यायला माणसं नाहीत. आपण भारतीय सगळे एकमेकांचे बंधू आहोत. तू त्याच परिसरात आहेस म्हणून तू तिथे जा.” अमित तिथे गेले, तर खरोखरच तिथे तीन जणच होते. अमित गेल्यामुळे चार जण झाले आणि मृत व्यक्तीची अंत्ययात्रा निघाली. ‘आपण सगळे बंधू’ हे तेव्हापासून अमित यांच्या मनात जे कोरले गेले, ते आजतागायत!

असो. अमित यांना त्यांच्या बाबांनी सांगितले होते की, ”तुला तुझ्या गुणवत्तेवरच पुढील शिक्षण घ्यावे लागेल. पैसे भरून किंवा ओळख दाखवून तुला महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला, तर ते चालणार नाही.” त्यामुळे बर्‍याच विचाराअंती ८२ टक्के गुण मिळवूनही, अमित यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. त्यांना नोकरी करायची नव्हती, तर स्वतःचा व्यवसाय करायचा होता. वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यानंतर, त्यांनी तीन वर्षे कर सल्लागार क्षेत्रातील शिक्षण घेतले. पुढे त्यांच्या मामाकडे ते कर सल्लागार म्हणून नोकरीही करू लागले. पण, ही नोकरी म्हणजेही शिक्षणच होते. या क्षेत्रातले जमेल तेवढे शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी २००३ साली स्वतःची ’अमित आपटे’ नावाची कंपनी सुरू केली.

नवीन कंपनीला लगेच काम मिळणे शक्य नव्हते. त्यावेळी अमित अक्षरशः १८-१८ तास काम करत, शुल्क नका देऊ, आम्ही काम कसे करतो, हे तरी पाहा, एकदा कामाची संधी द्या, असे म्हणून सुरुवातीला त्यांनी कामं मिळवली. मनापासून ती कामे पूर्ण केली. अशाप्रकारे कर सल्लागार क्षेत्रात स्थिरता मिळवली. कर क्षेत्राबाबत युवकांमध्ये साक्षरता यावी, यासाठी युवकांना मार्गदर्शन सुरू केले. त्याच काळात संगणक युग अवतरत होते. अमित यांनी संगणकाचा वापर प्रत्येक क्षेत्रात कसा होईल, या संदर्भातले शिक्षण घेतले आणि त्याची अंमलबजावणीही केली. या सर्व काळात त्यांच्या पत्नी आर्या यांनी त्यांना मोलाची साथ दिली. व्यवसाय, समाज, कला अशा विभिन्न क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अमित यांचे ध्येय आहे की, शिक्षण आणि संस्कृतीपासून वंचित झालेल्यांना पुन्हा शिक्षण आणि संस्कृतीच्या मूळ प्रवाहात आणणे; त्यासाठी ते सर्वतोपरी सक्रिय आहेत. अमित आपटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

९५९४९६९६३८

 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.