प्राणप्रतिष्ठा सोहळा : एका नव्या युगाचा ऐतिहासिक शुभारंभ

    09-Mar-2024
Total Views |
Ram Mandir Pranpratishthapna


‘राम आयेंगे’ म्हणत २२ जानेवारीच्या पवित्र मुहूर्तावर अखेरीस रामलला प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले. त्या क्षणापासून अयोध्यानगरी ही लाखो रामभक्तांनी अक्षरश: ओसंडून वाहते आहे. त्यानिमित्ताने प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे महात्म्य वर्णन करणारा रामलाल यांचा विशेष लेख...

अयोध्या या प्राचीन अशा शहरात दि. २२ जानेवारी २०२४ रोजी एकता, श्रद्धा, भक्ती आणि समरसता यांचा अविस्मरणीय संगम पाहायला मिळाला. जिथे देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यातून, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले हजारो रामभक्त रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे साक्षीदार म्हणून भव्य राम मंदिरात जमले होते. श्रीरामललाच्या आगमनाने केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात उत्साहाची, आनंदाची, हर्षाची, एका स्वर्णिम रामराज्याची पहाट उजाडली आहे.

भारताच्या इतिहासात अशाप्रकारचा भव्य सोहळा क्वचितच घडला असेल, ज्यात सूक्ष्म स्तरावर नियोजनबद्ध कार्यक्रम व बृहदस्तरीय समायोजनाचा अनोखा मेळ पाहायला मिळाला. अयोध्येत भारत आणि सनातन संस्कृतीची प्रत्येक भावना, प्रत्येक परंपरा आणि प्रत्येक प्रतिबिंब भगवान श्रीरामांच्या छत्राखाली एकवटले होते. लक्षद्वीप आणि अंदमानच्या निर्जन बेटांपासून ते अगदी लडाखच्या दुर्गम पर्वतांपर्यंत मिझोराम आणि नागभूमीच्या हिरव्यागार जंगलांपासून ते राजस्थानच्या वाळवंटाच्या वाळूपर्यंत भारतातील २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश या नेत्रदीपक महोत्सवाचे साक्षीदार बनले आणि या क्षणी भारतातील सर्व भाषांनी दाखवून दिले की, ’राम सर्वांचा आहे!’

सप्टेंबर २०२३ पासूनच निमंत्रितांची यादी बनवण्याचा आणि त्यांना अवधपुरीत बोलावण्याची व्यवस्था करण्याचा विचार सुरू झाला. डिजिटल पत्रव्यवहाराद्वारे सर्वांना आमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यानंतर देशातील दुर्गम भागातही सर्व निमंत्रितांना वैयक्तिकरित्या आमंत्रित करण्यात आले. शेवटी सर्व आमंत्रितांना वैयक्तिक कोड देण्यात आला. कार्यक्रमाचे स्वरूप पूर्णपणे धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक होते. यासाठी सर्व राष्ट्रीय आणि प्रांतिक दलांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वगळता एकाही केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यादिवशी निमंत्रित विशेष पाहुण्यांमध्ये हाही चर्चेचा विषय होता. आमंत्रित मान्यवरांमध्ये दहा रुपयांपासून अगदी एक कोटी रुपयांपर्यंत समर्पण देणार्‍या सर्व श्रेणीतील देणगीदारांची उपस्थिती होती. राष्ट्र आणि सनातन संस्कृतीच्या विभिन्न परंपरेच्या १३१ प्रमुख आणि ३६ जनजातीय तसेच नवीन आणि प्राचीन धार्मिक परंपरांच्या महानुभवांची सोहळ्याला उपस्थिती होती.

कबीर पंथी, रैदासी, निरंकारी, नामधारी, निहंग, आर्य समाज, सिंधी, निंबार्क, पारशी धर्मगुरू, बौद्ध, लिंगायत, रामकृष्ण मिशन, सत्राधिकारी, जैन, बंजारा समाज, मैतेई, चकमा, गोरखा, खासी या प्रमुख परंपरांचाही सोहळ्यात सहभाग होता. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भटक्या विमुक्त जमातीतील प्रतिष्ठित लोकांचेही प्रतिनिधित्व या शुभप्रसंगी होते. इस्लाम, ख्रिश्चन, पारशी अशा विभिन्न मत-पंथाचे प्रतिनिधित्व करणारेही या ठिकाणी उपस्थित होते. १९४९ मध्ये रामललाच्या बाजूने निकाल देणारे, जिल्हा न्यायाधीश श्री. नय्यर यांचे कुटुंब तसेच साक्ष देणारे, तत्कालीन ड्यूटी कॉन्स्टेबल अब्दुल बरकत यांच्या कुटुंबालाही विशेष आमंत्रित करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर रामलला यांच्या विरोधात खटला लढणार्‍या कुटुंबासोबतच तत्कालीन अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले होते. रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि या आंदोलनात प्राणांची आहुती देणार्‍या रामभक्तांचे कुटुंबीय, रामजन्मभूमीच्या न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी असलेले वकीलही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींसोबतच माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. भारताचे संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असलेले तिन्ही सैन्यांचे निवृत्त लष्करप्रमुख आणि परमवीर चक्र विजेते तसेच भारताला चंद्रावर नेणार्‍या ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांपासून ते भारतीय ‘कोविड’ लस बनवणारे, वैज्ञानिकही येथे आवर्जून उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे तीन माजी मुख्य न्यायमूर्ती, निवृत्त प्रशासकीय अधिकारी, पोलीस दलातील अधिकारी तसेच इतर अधिकारी, विविध देशांतील भारताचे राजदूत, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, ‘नोबेल’ पारितोषिक विजेते, ‘भारतरत्न’, ’पद्मविभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मश्री’ आणि ‘मॅगसेसे’ पुरस्कार विजेते यांच्यासह अनेक माजी न्यायाधीश, पुरस्कार विजेते उपस्थित होते. यासोबतच ‘साहित्य अकादमी पुरस्कारा’ने सन्मानित मान्यवरांचाही विशेष सहभाग होता. या कार्यक्रमाला देशातील प्रख्यात वकील, डॉक्टर्स, सीए, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे संपादक, प्रख्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स इत्यादींसह देशातील मोठ्या उद्योग परिवारांचीही उपस्थिती होती. भारतातील प्रमुख राजघराण्यातील सदस्यांपासून ते अनेक खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूंपर्यंत; चित्रकला, शिल्पकला, गायन, लेखन, वादन, नृत्य इत्यादी ललित कलांचे कलाकार; हिंदी, कन्नड, मल्याळम, तामिळ, तेलुगू, मराठी, गुजराती, बंगाली, ओडिया, आसामी, भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी चित्रपट क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटीही या सोहळ्यात सहभागी झाले होते. मुख्यत्वे ५३ देशांतील १५० प्रतिनिधीदेखील या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाले होते.

श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य पूजेला १६ यजमान उपस्थित होते. ज्यात सर्व जाती आणि वर्गाचे प्रतिनिधित्व होते (शीख, जैन, नवबौद्ध, निषाद समाज, वाल्मिकी समाज, जनजातीय समाज, घुमंतू जाती इ.) तसेच त्यात भारताच्या सर्व दिशांमधून (उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, उत्तर-पूर्व) आलेल्या लोकांचा समावेश होता. या सर्वांसाठी मंचावरच बसण्याची व्यवस्था होती. देशाचे पालनपोषण आणि विकास करणार्‍या शेतकरी आणि मजुरांसोबतच सहकार आणि ग्राहक संघटनांचे प्रतिनिधीही येथे उपस्थित होते. ’एल अ‍ॅण्ड टी’ आणि ’टाटा’ समूहाचे अधिकारी, अभियंते आणि कामगारही येथे उपस्थित होते. प्रभू श्रीराम मंदिराच्या बांधकामाला आकार देणार्‍या कामगारांना स्वतः पंतप्रधानांनी पुष्पवृष्टी करून अभिवादन केले. संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या अनेक व्यवस्थापकीय कार्यकर्त्यांपासून ते सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत आणि भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनीही या कार्यक्रमाची शोभा वाढवली. रामलला विराजमान झाल्यावर, सर्व देवी-देवतांनी या ठिकाणी उपस्थित होऊन, नक्कीच शुभाशीर्वाद दिला असेल, यात तिळमात्र शंका नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेचे शेकडो कार्यकर्ते ’श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या विनंतीवरून रात्रंदिवस झटत होते. सोबतच इतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे अनेक कार्यकर्तेही अतिशय शिस्तबद्धरित्या स्वतःला झोकून देऊन कार्य करीत होते. त्यांच्या व्यवस्थापन अनुभवाचा फायदा सूक्ष्म दृष्टिकोनातून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, सखोल विचार करण्यात होता. ज्याचा अनुभव तिथे येणार्‍या प्रत्येक रामभक्ताला येत होता. भक्तांचे स्वागत असो, बॅटरीवर चालणारी वाहने असोत, व्हीलचेअरची व्यवस्था असो, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था असो; स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते स्वत: आपल्या हाताने सर्वांच्या चपला काढून एकत्र ठेवत होते. इतकेच नव्हे तर ते आल्यावर परत त्यांना घालूनही देत होते. अगदी प्रसाधनगृहांच्या बाहेरही चप्पलची व्यवस्था केली होती. बारकाईने विचार करून, सर्व तयारी सुसज्ज केली होती.

अयोध्येतील नागरिक आणि प्रशासनानेही ट्रस्टच्या समन्वयाने अयोध्येचे सौंदर्यीकरण, सुशोभीकरण सुरू केले. चार महिन्यांत अयोध्या शहराचा चेहरामोहरा अचानक कसा बदलला, हा अयोध्येतील सर्वसामान्यांसाठी उत्सुकतेचा, आनंदाचा विषय होता. भाविक, पूज्य संत आणि अनेक मान्यवरांची सुरक्षा हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा होता, जो स्थानिक प्रशासन, पोलीस आणि इतर सुरक्षा पथकांच्या मदतीशिवाय अशक्य होता. उत्तर प्रदेश आणि अयोध्या पोलिसांच्या सहकार्य आणि मैत्रिपूर्ण वर्तनाने सर्वजण प्रभावित झाले. याचा परिणाम असा झाला की, एवढं मोठं काम कोणत्याही अडथळ्याविना आणि मोठ्या आनंदाने, उत्साहाने, यशाने पूर्ण झालं. कारण, प्रत्येकाला भगवान श्रीरामाचा शुभाशीर्वाद लाभला होता. तीन दिवसांत, ७१ खासगी विमाने कोणत्याही राजकीय किंवा व्यावसायिक कार्यक्रमाशिवाय अयोध्येतून उड्डाण करत आहेत. लखनौ-अयोध्येच्या विमानतळांवर तर लखनौ, अयोध्या, काशी, गोरखपूर, गोंडा, सुलतानपूर, प्रयागराज इत्यादी रेल्वे स्थानकांवर स्वागत आणि वाहतुकीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. विविध उपस्थितांच्या गरजा लक्षात घेऊन, सर्वांसाठी निवास व्यवस्थादेखील काळजीपूर्वक तयार करण्यात आली होती. टेंट सिटी, हॉटेल, आश्रम, धर्मशाळा, काही शाळा आणि २०० स्थानिक कुटुंबांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण अयोध्या ’राम आयेंगे’ या गाण्याच्या स्वरांनी दुमदुमली होती. रात्री उशिरापर्यंत सर्वांनी अयोध्येतील रस्त्यांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटला. भारताचा इतिहास साक्षीदार आहे की, अशा प्रकारचा हा एकमेव कार्यक्रम होता. ज्यामध्ये महनीय महानुभाव चार ते पाच तास सामान्य खुर्च्यांवर बसले होते. भारताचे माजी पंतप्रधान देवेगौडा तेथे चार तास व्हीलचेअरवर होते. तेथे ना कोणाचे सहकारी होते ना सुरक्षा कर्मचारी. प्रसाद म्हणून प्रत्येकाला त्यांच्या खुर्चीवर बसून जलसेवा आणि अल्पोपाहार देण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या दारात सर्व जाती, सर्व वर्ग, सर्व प्रदेश समान होते. प्रत्येकाने आपापल्या दर्जाच्या आणि सामाजिक-आर्थिक महत्वाकांक्षेच्या वर उठून अयोध्येचे साधे आदरातिथ्य मनापासून सहृदय स्वीकारले.

भारतातील प्रत्येक शहरात आणि खेडेगावात प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी सर्वजण आतुर झाले होते. भारतातील प्रत्येक गाव, प्रत्येक परिसर, प्रत्येक मंदिर जणू अयोध्या बनले होते. जे अयोध्येत येऊ शकले नाहीत, त्यांनी स्थानिक मंदिरांमध्ये पूजा-अर्चना करून रात्री दीपोत्सव साजरा केला. त्या दिवशी सर्वांचे मन आणि आत्मा अयोध्येत होते. श्रीरामलला यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी आणि मंदिर परिसरही असंख्य क्विंटल फुलांनी सजवण्यात आला होता. भारतातील सर्व राज्यांतून आलेल्या पारंपरिक वादकांनी, ३० हून अधिक कलाकारांनी रामनामाच्या गजराने वातावरण संगीतमय केले होते. तसेच आरतीच्या वेळी हजारो लोक उपस्थित होते. मंदिर परिसर घंटानादांनी दुमदुमून, मंत्रमुग्ध होऊन गेला. यावेळी मंदिराच्या प्रांगणावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली, त्यावेळी जणू संपूर्ण जग आनंदी होऊन पुष्पवृष्टी करतंय अशी दिव्य अनुभूती होत होती. हा कार्यक्रम निव्वळ सोहळ्याच्या पातळीपेक्षा वर होता, त्याचे एका दिव्य अनुभवात, आध्यात्मिक प्रवासात रुपांतर झाले होते. लोक आनंदी होते, वातावरण एखाद्या दिव्य जगासारखे अलौकिक आभाने व्यापलेले होते.

काही भक्तांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते, काही नाचण्यात तल्लीन झाले होते. काहींना स्वर्गाची अनुभूती होत होती, तर काहींना त्रेतायुगाची! सर्वांसाठी श्रीराम पुन्हा लंकेहून अयोध्येला परतत होते. दुसर्‍या दिवशी श्रीरामललाच्या दर्शनासाठी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांनी रांगा लावल्या. दि. २३ जानेवारी रोजी सुमारे पाच लाख लोकांनी उत्साहात आणि संपूर्ण शिस्तीत श्रीरामललाचे दिव्य दर्शन घेतले. अयोध्येच्या या दैवी घटनेने जात, वर्ग, भाषा, प्रांत, पंथ यांच्या सीमा ओलांडल्या, परंपरेने जोडलेल्या, प्रगतीचा स्वीकार करणार्‍या राष्ट्राची सामूहिक जाणीव जागृत होत होती. हा कार्यक्रम प्रभू श्रीराम यांच्या चिरस्थायी वारशाचा पुरावा आहे. जे जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देतात आणि एकत्र करतात. एकता, अखंडता, समरसता आणि भक्तीचा हा ’रामोत्सव’ म्हणून तो युगानुयुगे चिरंजीवी राहील. आता वेळ आली आहे की, आपण प्रभू श्रीरामाचे स्मरण करून भारताला एक सुखी, समृद्ध, निरोगी, सक्षम, आत्मनिर्भर, बलशाली आणि आदरणीय राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी संकल्पबद्ध होऊया. चला भारताची ‘विश्व गुरू’ म्हणून स्थापना करूया. जय श्रीराम!

रामलाल
(लेखक रा. स्व. संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख आहेत.)