मोहित सोमण
आयुष्यात शेवटी आठवणीच माणसांचे आयुष्य सावरतात किंवा बिघडवतात. पण करारी बाणा आयुष्यात भलीमोठी झुंज देत समृद्धीचा वारसा अंगिकारण्यास मदत करतात. नेहमी आपण शून्यातून विश्व निर्माण केलेल्या गोष्टींतून आकलन करत असतो. परंतु आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी व्यवसाय उभारताना झुंज कशी द्यावी याबद्दल मात्र फारसे भाष्य होताना दिसत नाही.
परिणामी त्रोटक प्रेरणा घेत अखेरीस माणूस जिद्द हरवतो. पण कितीही संकटे आली तरी त्याला तोंड कसे द्यावे याचा परामर्श एखाद्या महिला गृहिणी व नंतर झालेल्या उद्योजक झालेल्या महानुभवाकडून घ्यायचा झाल्यास नक्कीच महिलांनाच नाही तर पुरूषांना प्रेरणादायी ठरेल.आज अशाच एका कर्तृत्ववान महिलेच्या कामाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न मुंबई तरूण भारतने केलेला आहे.
सायली मुतालिक यांनी लग्नानंतर उद्योजिका बनत सगळ्या व्यवस्थेला छेद देत सामर्थ्याचे उदाहरण ठेवले याविषयी जाणून घेऊया...
७०-८०च्या दशकातील मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय स्त्रीचे स्वप्न फार फार पदवीधर होऊन नोकरी करणे किंवा गडगंज संपती असलेला पती पाहून एकप्रकारे सेटल होणे मात्र तेव्हा विशेष कार्यसिद्धीस नेलेल्या स्त्रियांना एक तर वेडे ठरवले जात असे अथवा प्रवाहाच्या विरुद्ध पोहू नकोस हेच सांगितले जात असे.
अशा पारंपरिक संस्कृतीत एक घरंदाज स्त्री लग्न करून संसार थाटते व त्यानंतर सगळ घरदार सांभाळून मुलांना शिक्षण देत सगळ्या कर्तव्याची पूर्तता करत अखेर वेगळा विचार करण्याचा निर्णय घेते. हातात शिक्षण पण व्यवसायिक क्षेत्रातील तितकीशी कल्पना नसताना काहीतरी व्यवसाय करू पाहते आणि आज एक ५०० हून अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीची सर्वेसर्वा बनते याच यशस्वी उद्योजिका सायली मुतालिक यांची ही कहाणी....
सायली मुतालिक या मूळच्या पुण्याच्या, तिकडे शिक्षण घेतल्यावर एक सुखवस्तू कुटुंबातून दुसऱ्या घरंदाज सुखवस्तू कुटुंबात लग्न झाल्यावर सामान्यतः फार स्वप्न पाहण्याचे विचार मनात येत नाहीत पण सायली मुतालिक यांनी परंपरेला ब्रेक लावत काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांच्या वडिलांकडून साथ मिळाली परिणामी त्यांनी घरोघरी साबण व तत्सम पदार्थ विकून सेल्स व मार्केटिंग तंत्रज्ञानील प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त केले.
बहुदा आजही सामान्य कुटुंबातील स्त्रिया सेल्समन होण्यास कमीपणाचे वाटते.परंतु सायली ताईंनी हा निर्णय घेत लोकांच्या व्यक्ती विशेष स्वभावाचा अभ्यास करत आपले मार्केटिंग तंत्र अवगत केले. सत्य तेव्हा उतरते जेव्हा माणूस जमीनीवर प्रत्यक्ष काम करतो.
असे करत करत त्यांनी लग्नानंतर पतीचीही साथ मिळाली. उद्योगविश्वात पाऊल टाकून तरणे महत्वाचे असते.
हे विचार करताना एकदा जुन्या सिक्युरिटी एजन्सी मालकाने सायली मुतालिक यांना मदतीची हाक दिली. प्रत्यक्ष साथ पतीनेही देत त्यांनी सिक्युरिटी संस्थेच्या व्यवसाय व व्यवस्थापनात उतरायचे ठरवले. वेळप्रसंगी आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी कर्जही काढले.आणि पुरूषी व्यवसाय म्हणून प्रसिद्ध असलेला सिक्युरिटी व्यवसायात २० वर्षांपूर्वी येण्याचे ठरवले.
व्यवसाय करत असताना कोणाला अडचणी येत नाहीत? परंतु त्यावर मार्ग काढण्यासाठी तो व्यवसाय त्यांनी पुढे चालू ठेवला. एकीकडे घरची जबाबदारी दुसरीकडे व्यवसाय असा डोलारा सांभाळताना अखेरीस व्यवसायाचा वटवृक्ष झाला.
सायली मुतालिक यांच्या मुलाने व्यवसायात लक्ष घातल्यावर हळूहळू वाढविलेल्या व्यवसायाला चारचांद लागले. आज कंपनी क्षमता ५०० कर्मचारी इतकी वाढली आहे. विविध कंपन्यांच्या, तसेच संस्थांना,व्यक्ती व्यक्तीसमूह यांना संरक्षणाची गरज असते. तसे हे रिस्की काम. आर्थिक दृष्ट्या चिकाटीचे तसेच मानसिक दृष्ट्यादेखील जिकिरीचे काम. कारण सिक्युरिटी स्टाफमध्ये फारशी शिक्षणाची अट नसल्याने मनुष्यस्वभाव सांभाळत व्यवसाय यशस्वी करण्याचे तंत्र सायलीताईंनी बखुबीने शिकत त्यात आपला जम बसवला.
परिणामी सिक्युरिटी व्यवस्थापन,नवीन उद्योग कंत्राटे आणणे,आर्थिक नियोजन अशा बारीकसारीक गोष्टीचा अभ्यास करून पुढे व्यवसाय वृद्धींगत केला. पण मन स्वस्थ बसत नव्हते. मग काय आकाश मोकळेच होते. उद्योजिका तर झाल्या पण समाजातील अनेक स्त्रियांना व्यासपीठ नव्हते किंवा मार्गदर्शक नव्हते. अखेरीस त्यांनी या क्षेत्रात उतरत अनेक स्त्रियांना उद्योगासाठी प्रेरणा देत लघु उद्योजिकांची फळीच निर्माण केली. कदाचित सिक्युरिटी व्यवसाय केल्याने जगाची व्यवहार करण्याची रित त्यांनी ओळखली होती. विविध महिलांना एकत्र करत त्यांनी त्याला संघटनात्मक स्वरूप देण्याचे ठरवले.
'स्वकृता ' संघटनेची त्या जोडल्या गेल्या. ही संस्था स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचे काम करते. समाजातील कुठल्याही स्तरातील स्त्रियांना कलागुणांना वाव देत त्यातून व्यवसाय निर्मितीचा चंग त्यांनी एक दशकांपूर्वीच बांधला होता. लघू सूक्ष्म मध्यम उद्योग (MSME) व महिला लघू उद्योग,स्टार्टअप अशा प्रेरणादायी व्यवसायिक संकल्पनेची बांधणी करत त्यासाठी लागणारे सर्व काही स्त्रोत एकत्रित करण्याचे मुतालिक यांनी ठरवले.
एकत्रितपणे येत गरजू स्त्रियांना आर्थिक मदत, प्रशिक्षण तसेच मानसिक दृष्ट्यादेखील सक्षम करत विविध पातळ्यांवर मार्गदर्शन सुरू केले.काळाप्रमाणे बदलत त्यांनी संस्थेचे संकेतस्थळ(Website) उभारत त्यांनी काम सुकर केले. आता बंगलोर,पुणे शहरातही याच्या शाखा उपलब्ध असून या संस्थेच्या २०० हून अधिक सदस्य तयार झाल्या आहेत.
पण एकेकाळी ही लढाई सोपी नव्हती. साबण विकण्यासाठी केलेले कष्ट ते आज अनेक सेवाभावी काम यात अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. आज त्या महिला समिती व भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीच्या प्रमुख आहेत. याशिवाय पारास्टेज प्रायव्हेट लिमिटेड (ParaStays Pvt Ltd) या हॉस्पिटालिटी क्षेत्रातील सेवा क्षेत्रातील कंपनीच्या संचालक आहेत.आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत.
पण या पुरस्काराची महती कळण्यासाठी त्यांच्या संघातील दोन किस्से सांगण्यासारखे वाटतात. एकदा सिक्युरिटी व्यवसाय सुरू केल्यानंतर एक सुरक्षारक्षक पैसे घेऊन गावाला पळाला.परंतु त्याचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक ते पर्याय नव्हते.अखेरीस त्यांनी घरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावाला दुचाकीवरून प्रवास करत या व्यक्तीचे गाव गाठले. व त्यांची मनधरणी करत केली परंतु त्या व्यक्तीने बायकोकडून देखील पैसे घेत फसवणूक केली होती.
या एका घटनेने त्यांना व्यवसाय करु का नाही यासाठी प्रश्न पडले असताना अखेरीस त्यांच्या पतीने नवी उमेद देत पुन्हा एकदा व्यवसायासाठी प्रेरणा देत आधार दिला.एकदा सिक्युरिटी सेवा दिली की ती जागतिक दर्जाची असावी हा त्यांचा कायम भर राहिला त्यांचे उदाहरण म्हणजे एका सेवा पुरवलेल्या मॉल मधील सुरक्षा रक्षक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मद्यपान केलेला होता. परंतु सेवा देणे ही कमिटमेंट असल्याने स्वतः संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली यातूनच आपल्या कामाप्रती श्रद्धा या उदाहरणावरून लक्षात येते. अनेकदा त्यांना अडीअडचणीला स्वतः झाडू हाती घेत दुकानात स्वच्छता राखण्याचे काम हाती घेत पूर्ण केले आहे.
संरक्षणाचा व्यवसाय तितका सोपा नाही.पण रोजच्या अडचणीला मात देत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. कुठल्याही उद्योगात उमेद व सकारात्मकता असल्यास काही अशक्य नसते याच उदाहरण म्हणजे सायलीताई. यावर न थांबता स्त्रियांचे प्रश्न मांडत त्यावर पर्याय काढणे त्यांनी पसंत केले आहे.उद्योजक घडवतानाच त्यांचे ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी वूमन एंत्रप्रिनर बियोंड बाऊंडरीज (Women Entrepreneurs Beyond Boundaries) नावाच्या बुलेटिनचीही सुरूवात केली आहे.
यातून महिला उद्योजकांचे प्रश्न मांडताना महिलांना आवश्यक त्या संकल्पना व त्यावर क्लुप्त्या काढत पर्याय देणे,आवश्यक ती गुंतवणूक, भविष्यातील व्यवसायांची मांडणी यावर चर्चा होत अपेक्षित मार्गदर्शन केले जाते.
त्यामुळेच त्यांनी यात घौडदौड चालू ठेवत आपले कार्य सुरू ठेवले आहे.यात स्वकृता संस्थेच्या अध्यक्षा माणिक पटवर्धन यांची त्यांना मोलाची साथ लाभली .सायली ताईंना पुढील विविध पातळ्यांवर काम करण्यासाठी आभाळभर शुभेच्छा.