समाधानी, समृद्ध आणि समंजस-समन्वित समाजजीवनाच्या शोधात आज सारे जग चाचपडत आहे, असे म्हटले तरीही अतिशयोक्ती होणार नाही. दुसर्या शब्दात सांगायचे, तर समाजवादी, साम्यवादी वा भांडवलशाही या सर्व आकृतीबंधांचे अपुरेपण स्पष्टपणे प्रत्ययाला आले आहे. अशा स्थितीत विशुद्ध भारतीय विचारवंत, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेले ‘एकात्म मानव दर्शन’ समस्त मानवतेला ते आश्वासन देण्याची क्षमता बाळगते काय, याचा गंभीरपणे विचार ही केला जाऊ लागला आहे. मात्र, दीनदयाळजींनी केलेल्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीचा व्यावहारिक स्तरावर कसा अवलंब केला जाऊ शकतो, याबद्दल विचारमंथन व्हावे, असाही सूर व्यक्त करण्यात येतो.
त्याच अनुषंगाने गेली सलग काही वर्षे सामूहिक चिंतनाच्या स्वरुपात सविस्तर चर्चा अंतिम काढलेल्या निष्कर्षांचे फलित म्हणजे ’समाजजीवन ः सुयोग्य दिशा’ हे पुस्तक होय, असे म्हणता येईल. पुस्तकाचे संपादक प्रा. श्याम अत्रे आणि रवीन्द्र महाजन हे त्या चिंतन गटातील विचारविनिमयात नियमितपणे सहभागी होत आले आहेत. त्यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचे स्वरूप स्वाभाविकपणे मार्गदर्शक स्वरुपाचे झाले आहे. अर्थात, या पुस्तकातील मांडणी प्रामुख्याने सूत्ररूप आहे. त्यात मांडण्यात आलेली सूत्रे व संकल्पना यांचा सविस्तर विस्तार घडवून आणणे आवश्यक आहे. असा विस्तार घडविण्यात पुढाकार घेऊ इच्छिणार्यांसाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकाचे प्रकाशन दि. १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता, डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते भाविसा भवन, १२१४/१५, पेरुगेट हायस्कूल जवळ, सदाशिव पेठ, पुणे येथे संपन्न होईल.
समाज धारणा, समाज रचना आणि समाज परिवर्तन (दीनदयाळजी ‘युगानुकूल परिवर्तन’ असा शब्द प्रयोग करीत) हे समाजजीवनाचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. या तीनही पैलूंचा समग्र विचार करून, आपल्या समाजाच्या पूर्वसूरींनी येथील जीवन रचना सिद्ध केली. पिढी दर पिढी जीवनसूत्रे, जीवनमूल्ये यांची रुजवण करीत, भारतीय समाजजीवन परिपुष्ट होत आले. सृष्टीतील एकात्मता, तिच्यातील मानवी जीवनाचे स्थान, मानवी व्यक्तिमत्त्वाचे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा हे चार घटक आणि त्या चारही घटकांचे समाधान करणारी सुखविषयक परिकल्पना यांचा समन्वित विचार, हा ‘एकात्म मानव दर्शना’चा गाभा आहे.
याचा संक्षिप्त आढावा घेत समाज धारणा, समाज संचालन आणि समाज परिवर्तन याबाबतचे सूत्ररूप विवेचन या पुस्तकात वाचायला मिळेल. संस्कार, संस्कृती तसेच समाज धारणेची मार्गदर्शक सूत्रे, या विषयीचा उहापोह या पुस्तकात केला गेला आहे. अनुषंगाने समाजजीवनात काळाच्या ओघात निर्माण झालेले दोष आणि ते दूर करण्यासाठीची कृती योजना याचीही चर्चा करण्यात आली आहे.
मानवी जीवनाचे साफल्य, समाज जीवनाचा उद्देश, धर्माचे अधिष्ठान, स्वयंभू समाज, पुरुषार्थ चतुष्ट्य, अध्यात्म आणि विज्ञान, कुटुंब व्यवस्था, दुर्बल घटकांचे सक्षमीकरण, अशा अनेक मुद्द्यांचा उल्लेख या पुस्तकात ठळकपणे आला आहे. त्या सर्वच बाबींचा कालोचित आणि कालसंगत विचार विद्यमान व्यवस्थेच्या अंतर्गत त्यांचा सुयोग्य विकास याविषयीच्या मंथनाला या पुस्तकाने चालना मिळावी. या आधीच नमूद केल्याप्रमाणे, पुस्तकातील मांडणी सूत्ररूप आहे. तिच्या विवेचक विस्ताराचा आणि प्रामुख्याने आजच्या काळात तिच्या व्यावहारिक अवलंबाच्या प्रयोगाचा प्रदेश अद्याप नीती निर्धारकांना आव्हान देणाराच आहे.
याच विचार गटातर्फे काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या (National Policies in light of Ekatma Manav Darshan) या ग्रंथासह ’समाज जीवन ः सुयोग्य दिशा’ या पुस्तकावर एकत्रित विचार केल्यास, त्या आव्हानाला समर्पकपणे पेलता येईल, असे वाटते.
पुस्तकाचे नाव : समाजजीवन ः सुयोग्य दिशा (एकात्म मानव दर्शनाच्या प्रकाशात तत्त्व, व्यवहार व परिवर्तन)
संपादक : रवीन्द्र महाजन व प्रा. श्यामकांत अत्रे
प्रकाशक : सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अॅण्ड रिसर्च, पुणे
पृष्ठसंख्या : १२०
मूल्य : १५० रु.
अरुण करमरकर