म्हाडा अंतर्गत भूखंडांच्या विक्रीसाठी ई-लिलाव जाहीर

छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे २० अनिवासी व्यावसायिक, सुविधा भूखंडांसाठी ई-लिलाव

    08-Mar-2024
Total Views |
MHADA Plot sale auction


मुंबई :
   म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध जिल्ह्यातील २० अनिवासी भूखंडांच्या विक्रीकरिता ई-लिलाव ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. याकरिता अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला.

मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, जालना जिल्ह्यातील टोकवाडी व भोकरदन , परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, लातूर जिल्ह्यातील मुरुड व बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका येथील एकूण २० अनिवासी व्यावसायिक व सुविधा भूखंडांच्या विक्रीकरिता ई-लिलावाचे नियोजन करण्यात आले आहे. अनिवासी भूखंडांचा ई लिलाव ऑनलाइन पद्धतीने होणार असून अर्जदारांना अर्ज करण्याची कार्यपद्धती तसेच सविस्तर माहितीपुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.


हे वाचलंत का? >>>  ईडीची मोठी कारवाई! रोहित पवारांचा कारखाना जप्त



इच्छुक अर्जदार मंडळाच्या ई-लिलाव प्रक्रियेत म्हाडाच्या http://www.eauction.mhada.gov.in आणि https://www.mhada.gov.in या अधिकृत संकेत स्थळावरून नोंदणी करणे, अर्ज करणे, कागदपत्र अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादी प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. ई लिलावासाठी अर्ज करण्यासाठीचा अंतिम दि. ५ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत आहे. ई लिलावाकरिता आरटीजीएस व एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दि. ६ एप्रिल २०२४ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आहे.

ई-लिलावात ऑनलाईन बोली दि. १२ एप्रिल, २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत बोली लावता येणार आहे. ई-लिलाव प्रक्रियेचा एकत्रित निकाल दि. १३ एप्रिल, २०२४ रोजी दुपारी १२ वाजता जाहीर केला जाणार आहे. वैद्य यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही.

शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.