धावण्यातून आरोग्याचे धनसंचय

    08-Mar-2024   
Total Views |
 Health conscious Dhananjay Padhye


अर्धांगवायूचा झटका, पाठीचा त्रास त्यानंतर चालणेही मुश्किल झाले. परंतु, त्यांनी जिद्दीने जगभरात प्रसिद्ध ‘कॉमरेड मॅरेथॉन’ दोनदा पूर्ण केली. जाणून घेऊया धावपटू धनंजय पाध्ये यांच्याविषयी...

मुंबईतील बोरिवलीमध्ये जन्मलेल्या, धनंजय अविनाश पाध्ये यांचे वडील खासगी कंपनीत, तर आई मध्य रेल्वेत परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. आईला टाळूचा कर्करोग होता. दीड वर्षं उपचार घेऊन, पुन्हा त्या कामावर रुजू झाल्या. परंतु, सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्करोग पुन्हा बळावला आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे जिथे त्यांनी नोकरी केली, तिथेच त्यांचा मृत्यू झाला. गोखले हायस्कूलमधून धनंजय यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय वयात क्रिकेटसोबत धावण्याचीही त्यांना आवड होती. शाळेतील धावण्याच्या स्पर्धांमध्ये ते नेहमी अव्वल येत असे. १९९० साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांना ’सीए’ करण्याची इच्छा असल्याने, त्यांनी पुढे गोखले महाविद्यालयात वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. पुढे पदवीनंतर ‘जनकल्याण बँके’त नोकरी आणि विवाहामुळे सनदी लेखापाल (सीए) होण्याचे त्यांचे स्वप्न मागे पडले.

सहा वर्षं ’जनकल्याण बँके’त नोकरी केल्यानंतर, ते ‘एचडीएफसी बँके’मध्ये २००६ साली असिस्टंट मॅनेजर म्हणून रुजू झाले. सगळं काही सुरळीत सुरू असताना, त्यांना २०१५ साली अर्धांगवायूचा झटका आला. बोबडी वळत होती, तोंड वाकडे होत असल्याने, ते बँकेतून घरी गेले. त्यानंतर त्यांनी लागलीच रक्तदाब तपासणी करून, सिटीस्कॅन केले. एमआरआय केल्यानंतर मेंदूत रक्ताच्या गुठळ्या (क्लॉट) झाल्याचे निदान झाले. पुढे हॉस्पिटलमध्ये दाखल करून इंजेक्शन दिल्याने मोठा धोका मात्र टळला. रक्तदाब सामान्य झाल्यानंतर, तीन-चार दिवसांतच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, अर्धांगवायूचा झटका हा त्यांना एक प्रकारे धोक्याचा इशाराच होता. पुढे पाठीचा त्रास सुरू झाल्याने, चालणेदेखील मुश्किल झाले. पुन्हा सिटीस्कॅन केल्यानंतर, तत्काळ शस्त्रक्रिया पार पडली.

यावेळी धनंजय यांचे वजन तब्बल १०७ किलो इतके होते. डॉक्टरांनी वजन कमी करणे आणि तब्येत सांभाळण्याचा सल्ला दिला. अवघ्या चाळीशीत आरोग्य ढासळत असल्याचे पाहून, धनंजय यांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी जमेल, तसे चालण्यास सुरुवात केली. यातच शाळेतील मित्र निरज एरंडे दररोज धावण्याचे स्टेटस सोशल मीडियावर टाकत असे. ते पाहून त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी ’रनर्स अकॅडमी’त प्रवेश घेतला. तिथे त्यांनी धावण्याचा सराव सुरू केला. एका महिन्यात वजन कमी झाल्याने, धनंजय यांचा हुरूप आणखी वाढला. आधी एक, दोन नंतर पाच, दहा किमी धावण्याचा प्रवास सुरू झाला. प्रसिद्ध धावपटू सतीश गुजरण यांच्याशी चर्चा करताना, धनंजय यांनी ‘कॉमरेड’ स्पर्धा यशस्वी पूर्ण करू शकेल का, असा प्रश्न केला.

तेव्हा सातत्य, संयम, चिकाटी, सराव याने हे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतील ’कॉमरेड मॅरेथॉन’ पूर्ण करण्यासाठी, धनंजय यांनी सराव सुरू केला. ऊन, वारा, पाऊस न पाहता सराव जोरदार सुरू होता. अगदी रात्री, पहाटेसुद्धा धावण्याचा सराव सुरू होता. अखेर दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारिट्झबर्ग ते डर्बन अशी ९० किमीची ‘कॉमरेड मॅरेथॉन’ त्यांनी पूर्ण केली. दोन वेळा ही मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर, आता तिसर्‍यांदा ही मॅरेथॉन पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. जैसलमेर ते लोंगेवाला अशी १०० किमीची बॉर्डर मॅरेथॉनही त्यांनी पूर्ण केली आहे.

‘टाटा अल्ट्रा मॅरेथॉन’ तर चार वेळा पूर्ण केली. मंगळवारी धावणे, बुधवारी आणि शुक्रवारी व्यायाम-योग, गुरुवारी हिल रीपिट्स, शनिवारी स्पीड रन असे धनंजय यांचे नियोजन असते. ”रक्तदाबाचा त्रास बर्‍यापैकी कमी झाला. आरोग्यदायी जीवन मी जगतोय. धावलो नाही तर चुकचुकल्यासारखं वाटतं. अगदी बाहेरगावी गेलं, तरी धावणं चुकवायचं नाही. आळस करून चालत नाही. पत्नी, मुलगा, बहीण हेदेखील आता धावण्याचा सराव करत आहे. मी परिसरातील लोकं, मित्रमंडळी यांनाही चालण्यासाठी आग्रह करतो. दुचाकी चालविण्याची माझी इच्छाही होत नाही. जिथे शक्य होईल, तिथे पायीच जातो. कुणावर विसंबून राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे,” असे धनंजय पाध्ये सांगतात.

‘लडाख’, ‘सातारा’, ‘उटी’, ‘सह्याद्री अल्ट्रा’ अशा प्रसिद्ध मॅरेथॉन पूर्ण करण्याची त्यांची इच्छा आहे. आई अनिता, पत्नी जान्हवी, मुलगा साईश यांच्यासह सोनाली होनराव, चेतन अग्निहोत्री, उमेश बूब, हेमंत आपसुंदे, पंकज भदाणे, दिगंबर लांडे यांचे धनंजय यांना सहकार्य लाभते. धनंजय यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते.

यासोबतच आतापर्यंत त्यांनी ५० हून अधिक मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. एक वेळ त्यांना साधे चालणेही मुश्किल होते; मात्र आता ते देशातीलच नव्हे, तर देशाबाहेरील मॅरेथॉनही गाजवत आहेत. मरणाच्या दारातून परत येऊनही, सामान्य माणसालाही जे शक्य होत नाही, ते करून दाखविण्याची किमया साधणार्‍या, धनंजय पाध्ये यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने अगदी मनःपूर्वक शुभेच्छा!

 
७०५८५८९७६७
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.