मुंबई : जगभरात ८ मार्च रोजी जगातील महिला दिवस साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू असल्याने कीर्ती कॉलेज एनएसएस विभागाने कीर्ती नारी अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन/पॅड्स कलेक्शन ड्राईव्ह चे आयोजन केले. दि. १ मार्च रोजी त्यांनी ही कलेक्शन ड्राईव्ह राबवली ज्यामध्ये त्यांना प्राध्यापक आणि विद्यार्थी या सर्वांनी एकत्र येऊन काम केले. स्वयंसेवकांनी फक्त सहा तासात तब्बल ऐंशी सॅनिटरी पॅड्स व दहा हजार हून अधिक रक्कम जमा केली. याचवेळी वंचित समाजातील महिलांचे सर्वेक्षण राबवले. ज्यामध्ये स्वयंसेवकांना असं कळालं की बऱ्याच वंचित महिला हे मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी पॅड्स न वापरता कपडा वापरतात जे महिलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. म्हणूनच कीर्ती कॉलेज एनएसएस विभागाचे स्वयंसेवकांनी ८ मार्च रोजी 300 हून अधिक महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स/पॅड्स वाटण्याचे ठरवले आहे.
"मासिक पाळी स्वच्छता ही काळाची गरज आहे आणि सॅनिटरी पॅड ही महिलांसाठी विलासी गोष्ट नसून ती त्यांच्यासाठी एक मूलभूत गरज आहे. समाजात काम करताना वंचित दुर्लक्षित भागातील महिलांसाठी काहीतरी करता यावे म्हणून स्वयंसेवक हा उपक्रम राबवणार आहेत. तसेच स्वयंसेवकांनी हाताने तयार केलेले वुमन्स डे वर आधारित ग्रीटिंग कार्ड्स वाटप करणार आहे." अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली.
एन. एस. एस. युनिटने सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या गंभीर समस्येचे निराकरण करणे आणि स्वच्छताविषयक आव्हानांचा सामना करणाऱ्या महिलांना मदत करणे हा आहे. या सॅनिटरी नॅपकिन्स/पॅड्स कलेक्शन ड्राईव्ह ला विद्यार्थी, प्राध्यापक, प्रोग्राम ऑफिसर्स आणि कीर्ती महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच स्थानिक समुदायाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.