तया नेणती ते पापरूपी...

    06-Mar-2024   
Total Views |
 adhyatm
 
अध्यात्माबद्दल बोलायचे तर संतांनी अंतिम सत्य जाणलेले असते. भगवंताची प्रचिती घेतलेली असते. मग त्यांचे सांगणे, त्यांची अनुभूती, आपण का स्वीकारत नाही? भगवंत आहे, हे जाणूनही काही माणसे आपल्या ज्ञानाहंकाराने ते नाकारतात. त्यांना स्वामींनी ‘पापी’ म्हटले आहे. कारण, ते इतरांच्या बुद्धीत ईश्वराविषयी भ्रम निर्माण करतात. ही माणसे जाणूनबुजून ईश्वराचे अस्तित्वच नाकारतात. इतरांचा बुद्धिभ्रंश करतात, म्हणून स्वामी त्या देह बुद्धीधारक अहंकारी माणसांची दुरात्मा, अतिशय वाईट (महांनष्ट) व चांडाळ म्हणजे दुष्कृत्ये करणारे म्हणून संभावना करतात. भगवंताचे स्वरूप मान्य करून त्याच्या सान्निध्यात कालक्रमणा करणे, हा भक्तिमार्ग सहजसोपा असून समाधानाचा मार्ग आहे. जे हे जाणत नाहीत, ते अभागी दुरात्मे आहेत, असे समर्थांचे मत आहे.

सर्वसामान्यपणे लोकांनी सर्व बाबतीत जसे बोलावे, तसेच आपले आचरण ठेवावे. काही लोक बोलतात चांगले, परंतु ते त्यांच्या वागण्यातून दिसत नाही. अशा कृतिशून्य बोलघेवड्या माणसाच्या बडबडीला अर्थ नसतो. बोलणे एक आणि वागणे भलतेच यातून दांभिकता, खोटेपणा निर्माण होतो. तेव्हा हे वागणे टाळणे श्रेयस्कर, असा उपदेश केल्यावर समर्थ सांगतात की, देवाच्या एकनिष्ठ भक्तीत आपली वृत्ती पालटण्याचे सामर्थ्य असते. तेव्हा तुम्ही कसेही असलात तरी सदाचरण सांभाळून देवाची भक्ती केली, तर वृत्ती पालटून तुमची मानसिक, आध्यात्मिक प्रगती होईल. यासाठी भगवंताच्या भक्तीची वाटचाल माणसाने सोडू नये. हे सांगून झाल्यावर श्लोक क्र. ११६ ते १२५ या श्लोकांतून ‘देव भक्ताची उपेक्षा करीत नाही’ असा आश्वासक संदेश स्वामींनी दिला आहे.

त्याच्या पुष्ठ्यर्थ स्वामींनी पुराणकथांचा आधार घेतला आहे. समर्थकालीन लोकांना या पुराणकथा परिचित होत्या. या पुराणकथांतील राजा अंबरीष, ऋषितुल्य उपमन्यू, चिरंजीव पद प्राप्त केलेला ध्रुवबाळ, प्राणांतिक संकटातून वाचलेल्या गजेंद्रमोक्षाची कहाणी, पापी अजामेळ यांच्या कथांचे संदर्भ देत ‘देवाला भक्ताचा अभिमान असतो’ हे स्वामींनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर भक्ताच्या काजासाठी भगवंताने घेतलेल्या मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण आणि भविष्यातील कल्की या अवतारांचे उल्लेख करून ‘नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी‘ हा विचार लोकांच्या मनावर बिंबवला आहे. या विचारमालिकेतील शेवटचा श्लोक पुढीलप्रमाणे आहे-

जनाकारणे देव लीळावतारी।
बहूतांपरी आदरें वेषधारी।
तया नेणती ते जन पापरूपी।
दुरात्मे महां नण्ट चांडाळ पापी ॥१२६॥

उपरोक्त पुराणकथांतील अनेक दाखले देऊन रामदासस्वामींनी तत्कालीन समाजाला आश्वासक, सकारात्मक विचार दिले आहेत.परकीय जुलमी राज्यसत्तेमुळे समर्थांच्या काळातील लोकांची सामाजिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थिती खालावलेली होती. अशा दिशाहीन झालेल्या समाजाला आपल्या सांस्कृतिक ठेव्याची, सर्वज्ञ भगवंताच्या अवतारांची, पुराणकथांची आठवण करून देऊन स्वामींनी लोकांना कोदंडधारी राम, पराक्रमी भक्त हनुमान यांच्या उपासनेला लावले आणि तत्कालीन लोकस्थिती सावरली. भगवंत सर्वशक्तिमान, सज्जनांचा कैवारी, दृष्टांचा संहार करणारा आहे. लोकांच्या दृष्टीने तो अज्ञात आहे. म्हणजे त्यांना तो डोळ्यांनी दिसत नाही. तथापि देव मानवी शरीर धारण करून अवतार कार्यासाठी, दुष्ट दुर्जनांचा नाश व सज्जनांचे रक्षण करण्यासाठी जनहितार्थ खाली उतरतो. तेव्हा त्या लीलावतारी देवाला सामान्यजन त्याच्या लीलांनी, चमत्कारांनी ओळखतात. भक्तांसाठी मानवी देहधारी वेषात अवतार घेऊन भगवंत अफाट कार्ये लीलेने सहजगत्या पार पाडतो.

पुराणातील अवतारकथांत आपण पाहतो की, अवतारी देवाचा पराक्रम कसा आहे. हिरण्यकश्यपू हा असूर राजा त्याला मिळालेल्या वराने मदोन्मत्त झाला होता. आत्यंतिक अहंकाराने स्वतःला अपराजित, अजिंक्य व देवापेक्षा श्रेष्ठ समजत होता. स्वतःच्याच मुलाचा प्रल्हादाचा, तो भगवंताचे नाम घेतो म्हणून अपरिमित छळ करीत होता. अशा असूरी महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या हिरण्यकश्यपूला भगवंतांनी नृसिंह अवतार घेऊन त्याला मिळालेल्या वराच्या सर्वअटी सांभाळून तीक्ष्ण नखांनी फाडून संपवला. रामावतारात दुष्ट, कपटी, तसेच अनेक वर मिळालेल्या अहंकारी रावणाला भगवंताने ठार केले. समुद्रापलीकडे लंकेत साम्राज्य उभारून स्वतःला अजिंक्य समजणार्‍या रावणापर्यंत पोहोचणेही अशक्य. तरी रामाने वानरसेनेच्या साहाय्याने समुद्र सहजगत्या पार करून रावणाचा अंत केला. देवाने अवतारात अशक्य वाटणारी अफाट कामे सहजरित्या पार पाडली आहेत. अवतारीदेव सामान्य माणसासारखा देह धारण करतो खरा, पण त्याचे असामान्यत्व त्याच्या कृतीतून प्रगट होते. अवतार काळात भगवंत सज्जनांचा पाठीराखा व दुर्जनांचा कर्दनकाळ असतो. तथापि अवतारघेऊन महान कार्य करून जाणार्‍या भगवंताला मानायला काही महाभाग तयार नसतात. अर्थात, त्यांच्या मानण्या न मानण्यावर काही भगवंताचे माहात्म्य अवलंबून असत नाही, पण ही माणसे आपल्या बुद्धीचा गैरवापर करून इतरांच्या मनात देवाविषयी साशंकता निर्माण करतात. लोकांना अश्रद्ध बनवतात.

सध्याचे लोक विज्ञाननिष्ठ आहेत. त्यामुळे ही बुद्धीनिष्ठ, तर्कनिष्ठ माणसे फक्त वैज्ञानिक प्रयोग सिद्धतेला सत्य मानतात. त्याव्यतिरिक्त जे आहे ते कल्पित, अशी त्यांची धारणा असते. तथापि भौतिकशास्त्राचे, तर्कशास्त्राचे नियम जसेच्या तसे अध्यात्माला लावता येत नाहीत. अध्यात्मात प्रयोगसिद्धतेला, अनुभूतीला महत्त्व असते. विश्वचालक सर्वशक्तिमान भगवंताची अनुभूती ही कल्पनेच्या व बुद्धीच्या पलीकडे अवस्था असल्याने तेथे तर्कशास्त्र उपयोगी पडत नाही. भौतिक विज्ञानातही काही प्रश्नांची उत्तरे शास्त्रज्ञांना इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांची चक्राकार गती समजते. त्यांना विलग करण्याचा प्रयत्न केला,तर त्यातून प्रचंड शक्तिशाली स्फोट होऊन आसमंतात धूर व ज्वाळा पसरते. पदार्थांच्या अणूतील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांची गती कोण नियंत्रित करते? ती गती कोणी लावून दिली? हे शास्त्रज्ञ सांगू शकत नाही. तसेच, आपल्या शरीराच्या आत घडणार्‍या श्वसन, पचन, रूधिराभिसरण क्रिया आपल्याला जाणवत नाहीत. माहीतही नसतात. आपली ज्ञानेंद्रिये, कर्मेंदिये, विचार, स्मृती, कल्पना, मेंदूपेशी, मज्जातंतू, अब्जावधी पेशी यांचा समन्वय साधून सूसुत्रबद्धता साधणारी कोणती कार्यसंस्था शरीरात आहे, हे शास्त्रज्ञ सांगू शकत नाहीत. थोडक्यात, विज्ञाननिष्ठ भौतिक ज्ञानाला मर्यादा आहेत. ते आपल्याला पूर्ण सत्याचे दर्शन घडवू शकत नाहीत.

 भौतिक ज्ञानाचे सिद्धांत, आकलन वर सांगितलेल्या क्रिया आपण शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्या तशा स्वीकारतो. अध्यात्माबद्दल बोलायचे तर संतांनी अंतिम सत्य जाणलेले असते. भगवंताची प्रचिती घेतलेली असते. मग त्यांचे सांगणे, त्यांची अनुभूती, आपण का स्वीकारत नाही? भगवंत आहे, हे जाणूनही काही माणसे आपल्या ज्ञानाहंकाराने ते नाकारतात. त्यांना स्वामींनी ‘पापी’ म्हटले आहे. कारण, ते इतरांच्या बुद्धीत ईश्वराविषयी भ्रम निर्माण करतात. ही माणसे जाणूनबुजून ईश्वराचे अस्तित्वच नाकारतात. इतरांचा बुद्धिभ्रंश करतात, म्हणून स्वामी त्या देह बुद्धीधारक अहंकारी माणसांची दुरात्मा, अतिशय वाईट (महांनष्ट) व चांडाळ म्हणजे दुष्कृत्ये करणारे म्हणून संभावना करतात. भगवंताचे स्वरूप मान्य करून त्याच्या सान्निध्यात कालक्रमणा करणे, हा भक्तिमार्ग सहजसोपा असून समाधानाचा मार्ग आहे. जे हे जाणत नाहीत, ते अभागी दुरात्मे आहेत, असे समर्थांचे मत आहे. त्यामुळे ‘तया नेणती ते जन पापरूपी’ असे म्हटले आहे.


सुरेश जाखडी


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..