मुंबई महापालिकेतील ५२ हजार रिक्त पदे भरणार?

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

    06-Mar-2024
Total Views |

MMC

मुंबई :
मुंबई महापालिकेत विविध खात्यात कार्यरत पदांची एकूण संख्या १ लाख ४५ हजार १११ होती. मात्र गेल्या अनेक वर्षात हजारो कर्मचारी हे सेवा निवृत्त झाले. तर काही कर्मचारी आजारपणाने, अपघाताने मृत्युमुखी पडले. त्यामुळे सध्या मुंबई महापालिकेत ९२,८९० कर्मचारी विविध खात्यात कार्यरत असून ५२,२२१ पदे रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना युनियनतर्फे करण्यात आली आहे.
 
यासंदर्भातील पत्र युनियनतर्फे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय बापेरकर यांनी महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना नुकतेच दिले आहे. पदे भरण्यासाह युनियनच्या मागण्यादेखील मान्य कराव्यात अशी विनंती करण्यात आली आहे. महापालिकेतील एकूण पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांबाबतची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या युनियनतर्फे मिळविण्यात आली. त्यानंतर सदर माहिती नागरिकांच्या माहितीकरिता उघड करण्यात आली आहे.

 
मुंबई महापालिकेकडून शहर व उपनगरे येथे रस्ते, पाणी पुरवठा, उद्याने, शिक्षण, घनकचरा उचलणे, स्वच्छता आदी विविध सेवासुविधा उपलब्ध करण्यात येतात. त्यासाठी मुंबई महापालिका हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च करते. या सर्व कामांसाठी पालिकेला मनुष्यबळ आवश्यक असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सध्या स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ्ता अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात अगदी सुट्टीच्या दिवशी सफाई कर्मचारी, अधिकारी काम करत आहेत.
 
तसेच, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अभियंता वर्ग, अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असतात. सध्या शासन व निवडणूक आयोग यांच्या आदेशाने निवडणूक पूर्व तयारीसाठी दहा हजारांहून अधिक अभियंता, अधिकारी, कर्मचारी यांचा वापर करण्यात येत आहे. अगदी पाणीपुरवठा, आरोग्य खाते, घनकचरा, अग्निशमन दल, आपत्कालिन विभाग आदी खात्यातील कर्मचारी, अधिकारी यांचाही वापर करण्यात आला आहे. त्यामुळे महत्वाच्या नागरी सेवासुविधावर परिणाम होत आहे. त्यात ५२ हजार रिक्त पदे न भरल्याने त्याचा ताण नियमित सेवा बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर येत असून त्यामुळे सध्या कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांच्या प्रकृतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कामगार नेते बाबा कदम व संजय बापेरकर यांनी दिली आहे.

 
युनियनतर्फे पालिकेकडे सादर करण्यात आलेल्या मागण्या!
 
१) पालिकेने निर्गमित केलेले सीपीए-१२२ परिपत्रक पुर्नजिवित करुन कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला पालिका सेवेत घेणे.
२) कंत्राटी पध्दतीने काम करणारे जे कर्मचारी ज्या रिक्त पदांवर काम करीत आहेत. त्यांचा अनुभव अर्हता लक्षात घेऊन त्यांना सदर पदांवर कायमस्वरुपी सामावून घेणे.
३) उर्वरित रिक्त शेडयुल्ड पदांसाठी जाहिरात देऊन भरती करणे आदी उपाययोजना करुन पालिकेतील रिक्त शेडयुल्ड पदे भरुन, मुंबईकर जनतेला उत्तम नागरी सेवा देण्यासाठी पालिकेला सुसज्ज करावे.