आदर्श हिंदू व्यक्ती कोणत्या गुणांनी युक्त असावयास हवी, याचे ‘ज्ञान’ ज्यांच्या चरित्रातून होते व तसे स्वतःस घडविण्यासाठी जीवनभर पुरेल, अशी ‘प्रेरणा’ ज्यांच्या जीवनचरित्रातून प्राप्त होते, असे श्रीगुरुजींचे चरित्र. आज विजया एकादशी, तिथीनुसार श्रीगुरुजींची जयंती. त्यानिमित्ताने श्रीगुरुजींच्या हिंदुत्वाच्या परिपूर्ण गुणांचे हे विचारपाथेय...
दीपज्योतिने सूर्या ओवाळावे तेजाचे दर्शन शब्दे केवि घडावे?
‘जगाच्या गुरुस्थानी असलेला भारत’ पुन्हा उभा करता येईल, अशी अंगभूत शक्ती आजही भारताच्या ठिकाणी विद्यमान आहे. ती शक्ती जागृत करून, प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात पुनर्स्थापित करावी. त्या शक्तीचे कालोचित सामूहिक स्वरुपात प्रकटीकरण करण्याची रचना आणि व्यवस्था कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. आपल्या राष्ट्रात वेळोवेळी हे कार्य झाले आहे. तथापि, ‘उत्थान व पुढे काही काळाने पुन्हा ‘पतन.’ ‘पुन्हा पतन होऊच नये’ या दृष्टीने कार्य कसे उभे करावे, याचे एक विलोभनीय उदाहरण म्हणजे डॉ. हेडगेवार यांनी सुरू केलेला ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.’ त्यांचे एक वाक्य असे आहे की, “अखिल हिंदू समाजाची सुसंघटना करून, तो एवढा शक्तीसंपन्न करावा की, जगातील कोणतीही शक्ती त्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही.“ या वाक्यातील आशय प्रत्यक्षात उतरावा, यासाठी मागील पाच पिढ्यांत लक्षावधी हिंदूंनी आपले जीवन मातृभूमीच्या चरणी समर्पित केले. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे श्रीगुरुजी तथा माधव सदाशिव गोळवलकर.
समर्पित जीवन
श्री रामकृष्ण परमहंस यांचे अंतरंग शिष्य स्वामी अखंडानंद महाराज यांच्याकडून ज्यांना मंत्रदीक्षा प्राप्त झाली व त्यांच्याच संकेतानुसार ज्यांनी रामकृष्ण मठात कार्य न करता, आपले जीवन रा. स्व. संघासाठी समर्पित केले-ते श्रीगुरुजी. ज्या हेतूने संघ सुरू झाला, त्या मातृभूमीच्या यशस्वी मंदिराचे शिखर दूरवर दिसू लागले आहे, असे वाटण्याचा आजचा काळ आहे. तथापि, पुन्हा पतन होताच कामा नये, हा उद्देश ध्यानात आला की, आणखी दोन-तीन पिढ्या खूप नेटाने कार्य केलेच पाहिजे, अशा मनःस्थितीत सर्वसाधारण स्वयंसेवक आहेत, असे आढळेल.
नित्य प्रेरणा
आदर्श हिंदू व्यक्ती कोणत्या गुणांनी युक्त असावयास हवी, याचे ‘ज्ञान’ ज्यांच्या चरित्रातून होते व तसे स्वतःस घडविण्यासाठी जीवनभर पुरेल, अशी ‘प्रेरणा’ ज्यांच्या जीवनचरित्रातून प्राप्त होते, असे श्रीगुरुजींचे चरित्र. ज्यामुळे व्यक्तीचे पतन होते, अशा अभारतीय परंपरेच्या प्रभावातून मुक्त होऊन, काळाच्या ओघात जे विविध दोष आपल्या समाजातही (तथाकथित अस्पृश्यता इ.) आलेले दिसतात, त्यापासूनही मुक्त होऊन ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हे लक्ष साध्य करण्यासाठी, आपल्या परंपरेतूनच आपण प्रेरणा घेतली पाहिजे, अशी श्रीगुरुजींची नेहमी मांडणी असे.
विशुद्ध राष्ट्रीयता व संघटित समाज या संदर्भात त्यांच्या मार्गदर्शनातील काही मुद्देच येथे उदाहरणादाखल मांडत आहे.श्रीगुरुजींच्या बरोबर विचारविनिमय करण्यासाठी, नागपुरात दोन अमेरिकेतील सज्जन आले होते आणि श्रीगुरुजींचा मुसलमानांसंबंधी दृष्टिकोन त्यांना समजावून घ्यायचा होता. श्रीगुरुजी त्यांना म्हणाले की, ”आपण अमेरिकेचे नागरिक आहात, अमेरिकेत नागरिकांकडून सरकारची कोणती अपेक्षा असते? काही नागरिक जर जेफरसन , फ्रँकलीन, वॉशिंग्टन यांसारख्या श्रद्धेय महापुरुषांची निंदा करीत असतील, तर त्यांना आपण चांगले नागरिक म्हणाल का? आपली श्रद्धेय स्मारके नष्ट करणार्या नागरिकांबाबत आपला कोणता दृष्टिकोन राहील?” तेव्हा ते अमेरिकन म्हणाले की, ”निश्चितपणे सर्वांनी राष्ट्रजीवनाच्या मुख्य प्रवाहाशी अनुकूल व्यवहार करावयास हवा.” (They must merge with the main stream of National Life) त्यांना राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहाशी समरस व्हावे लागेल.” तेव्हा श्रीगुरुजी त्यांना म्हणाले की, “आम्ही भारतातही याच दृष्टिकोनातून विचार करतो.” (All must merge with the main stream of National Life)
१)केवळ श्रद्धेमुळे स्वतःमधील अवगुण क्रमशः कमी होत जातात. गिरीशचंद्र घोष बंगालमधील श्रेष्ठ नाटककार. त्यांची श्रीरामकृष्णांशी भेट, संवाद होत असे. गिरीशचंद्रांना दारूचे व्यसन होते. हे रामकृष्ण जाणत होते. एकदा रामकृष्ण त्यांना म्हणाले की, ”आईला (कालीमातेला) नैवेद्य दाखविल्याशिवाय, आपण तो घेणे योग्य नव्हे. दारू घेण्यापूर्वीही आईला नैवेद्य दाखवित जा.” गिरीशचंद्रही कालीमातेचे भक्त होते आणि रात्री ते दारू पिण्यापूर्वी कालीमातेला नैवेद्य दाखवू शकले नाहीत! त्यांचे व्यसन सुटले. हृदयात श्रद्धा असेल, तर लक्ष्यप्राप्तीत बाधा म्हणून जे अवगुण असतील, त्यापासून मुक्ती मिळू शकते. तेव्हा हिंदुराष्ट्राविषयी श्रद्धा उत्पन्न झाली, समाजपुरूष हाच माझा परमेश्वर आहे, अशी श्रद्धा स्थिर झाली की, देशभक्तीत अडथळा आणणारे, सर्व दुर्गुण निश्चित नष्ट होतील.
२)श्रीगुरुजी म्हणाले की, “आम्ही हिंदू समाज संघटित करतो. काही लोक म्हणतात की, हा संकुचित दृष्टिकोन आहे. पण, ज्यांनी विशाल उदार दृष्टिकोन स्वीकारला, त्यांच्यामुळेच आमच्या सहस्रावधी बांधवांचे धर्मांतर झाले. ‘ते लोक’ आज आपल्या राष्ट्राशी शत्रूता करीत आहेत. त्यांची संख्या या विशाल दृष्टिकोनामुळेच वाढली आणि आपली कमी होत गेली. हे आपल्याला तथाकथित नेत्यांनी स्वीकारलेल्या विशाल दृष्टिकोनामुळेच झाले. ‘विशाल’ दृष्टिकोनामुळे देश छोटा होत गेला. म्यानमार, लंका दूर झाले. विभाजनाच्यावेळी आपल्या नेत्यांच्या सहमतीनेच पूर्व व पश्चिमेस पाकिस्तान झाले. पुढेही देशाचे आणखी काही भाग तुटू, दुरावू शकतात (जानेवारी १९५४ कालिकत - पुढे अरुणाचलचा ९० चौरस किमी, सियाचीनचा ३८ चौरस किमी आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ हजार, १८० चौरस किमी प्रदेश चीनकडे गेला.) हे आपले हिंदूराष्ट्र आहे. तेव्हा हिंदू समाज संघटित, अनुशासित असेल, तर सर्व संकटे दूर होऊ शकतात. हिंदूंपुरताच विचार भलेही काही प्रमाणात संकुचित असला, तरी आपल्या भल्यासाठी, तो स्वीकारणे अपरिहार्य आहे.
३) एकदा एकाने मला विचारले, ”आपल्या मनात मुसलमानाबद्दल भीती असल्याने, तुम्ही हिंदू संघटन करता ना?” मी सांगितले की, ”भीती असती तर आम्ही हिंदू, हिंदूराष्ट्र म्हटले नसते. ’इंडिया’ व ‘इंडियन नेशन’ म्हणले असते. आपल्या देशाचे ‘इंडिया’ हे नाव इंग्रजांनी ठेवले. तेच नाव आधार मानून, स्वतःला ‘इंडियन’ म्हणणे, हा किती विपरित विचार आहे? भूमीवर राहणार्या लोकांना भूमीमुळे नाव मिळाले, ही धारणा चुकीची आहे. जो समाज विशिष्ट भूमीमध्ये आपला विकास करतो, ‘तो’ भूमीला नाव देतो. हे सत्य आम्ही निर्भयतेने सांगत असतो.”
४) मल्याळी भाषेतील एक प्रतिष्ठाप्राप्त लेखक पी. एम. मेनन (जे पुढील काळात त्रिपूर जिल्ह्याचे संघचालक झाले) यांनी गुरुजींना विचारले, ”आपण स्वयंसेवकांना उत्तम संस्कारांचे शिक्षण कशा प्रकारे देता?” गुरुजी म्हणाले की, ”शिक्षण देऊन संस्कार हृदयंगम केले जात नाहीत. आत्मीय सहवास आणि परस्पर विश्वासपूर्ण मित्रतेतून ते संक्रमित होतात.”
५) त्रावणकोर संस्थानात आलेप्पी ही जुनी नगरपालिका आहे. पण, तिथे स्वच्छ पाण्याची व्यवस्था नव्हती. अनेक प्रयत्न झाले. तेव्हा एका निरक्षर असलेल्या खेड्यातील माणसाने विशिष्ट ठिकाणी खोदा, पाणी लागेल, असे सांगितले. दगड लागला; पण पाणी लागले नाही. तो खेडूत म्हणाला की, “माझे ज्ञान मला येथे पाणी लागेल, असे सांगत आहे और खोदो. सुरुंग लावून दगड फोडा.” आणखी खोदावे की नाही, असा लोक विचार करीत होते. पण, त्याच्या आग्रहामुळे सुरुंग लावून फोडल्यावर, मोठा झरा लागला. मोठा जलाशय तयार झाला आणि समस्या नेहमीसाठी समाप्त झाली. त्रिवेंद्रमच्या बैठकीत एका कार्यकर्त्याने ”तीन शाखा व १०० स्वयंसेवक झाले, यापेक्षा कार्य वाढू शकत नाही,“ असे सांगितले. तेव्हा गुरुजींनी ही कथा सांगितली की, “अरे भाई खोदो और खोदो/शुद्ध जलका चिरंतर स्रोत अवश्य मिलेगा।” ही आलेप्पीची कथा मोटारीतून येतानाच, काही तासांपूर्वी गुरुजींना एकाने सांगितली होती.
संघकार्य
आपल्या देशाचा इतिहास पाहता, त्या-त्या वेळच्या समस्या त्या-त्या वेळच्या काही महापुरुषांच्यामुळे समाप्त झाल्या, असे आपणास आढळते. तथापि, रा. स्व. संघाचे कार्य कोणतीही एखादी समस्या दूर करावी यासाठी नाही. जनतेच्या, लोकांच्या अथवा काही स्वयंसेवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, संघाचे काम सुरू झालेले नाही. सर्व समस्यांचे मूळ, ‘विशुद्ध राष्ट्रीयतेचा बोध नसणे व असंघटित हिंदू समाज’ हे आहे. ती मूळ समस्या दूर करण्याचा प्रयत्न केवळ संघ करीत राहणार आहे. संस्कारित स्वयंसेवक अनेक समस्या सोडवतील. आज शतकपूर्ण होत आल्यावर, अनेकांना याची अनुभूती येऊ लागली आहे.श्रीगुरुजींचे समग्र साहित्य १२ खंडात उपलब्ध आहे. या लेखात ’स्मृती पारिजात’ या पुस्तकाच्या आधाराने काही मुद्दे येथे मांडले आहेत. व्यक्ती, समाज, राष्ट्र, मानवता यांच्या समोरील सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीगुरुजींच्या साहित्यात सापडतील. पण, संघशाखेच्या कार्यात सहभागी झाल्याशिवाय अनुभूती प्राप्त होणार नाही आणि अनुभूतीमध्ये प्रेरणा देण्याचे सामर्थ्य असते.माझ्या सद्भाग्याने श्रीगुरुजींशी परिचय संवाद पत्रव्यवहार व त्यांचे बौद्धिक वर्ग आणि बैठकीमध्ये अनेकदा सहभागी होता आले. त्यामुळे या विजया एकादशीच्या त्यांच्या जन्मदिनी त्यांच्यासंबंधी काव्यपंक्ती आहे की, ’दीपज्योतिने सूर्या ओवाळावे तेजाचे दर्शन शब्दे केवि घडावे?”
-जयंत रानडे