मुंबई : कोल्हापूरातून श्रीमंत शाहू महाराजांना लोकसभा निवडणूक उमेदवारीचे तिकीट देण्यासाठी मविआत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने शाहू महाराजांना राज्यसभा उमेदवारीबाबत विचारणा केली होती. त्यानंतर आता लोकसभेकरिता जिल्ह्यातून उमेदवारी देण्याची तयारी मविआ घटकपक्षांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नाना पटोले व संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस व शिवसेना(ठाकरे गट) यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या उमेदवारीबाबत आम्हाला शाहू महाराज यांच्या बरोबर चर्चा करून त्यांना विचाराव लागेल. विनंती करावी लागेल की, ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर निवडणूक लढण्यास तयार आहेत का?, संजय राऊत म्हणाले. त्यामुळे काँग्रेस व शिवसेना(ठाकरे गट) यांच्यात उमेदवारीबाबत चढाओढ सुरू आहे. मविआतील घटक पक्षांकडून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी मागील काही दिवसांपूर्वी शाहू महाराजांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, संजय राऊत यांनी माध्यमाशी संवाद साधताना म्हटले की, शाहू महाराजांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी. राऊतांच्या या विधानामुळे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून थेट उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, काँग्रेस पक्षाकडूनही शाहू महाराजांना उमेदवारीचे ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या उमेदवारीबाबत मोठे भाष्य केले आहे. पटोले म्हणाले, शाहू महाराजांनी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढायचं हे त्यांनी ठरवावं, असे वक्तव्य नाना पटोले म्हणाले आहेत.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जागा महाविकास आघाडीकडून कोण लढविणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकंदरीतच, कोल्हापूरात शाहू महाराज कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तूर्तास तरी काँग्रेससह शिवसेना (ठाकरे गट) या दोन मविआतील घटक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारीकरिता जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.