नवी दिल्ली(पार्थ कपोले) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिवार नसल्याची टीका करणाऱ्या लालूप्रसाद यादव यांना आता भाजपने ‘मोदी का परिवार’द्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ सालच्या ‘चौकीदार’ प्रकरणाची पुनरावृत्ती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (राजद) बिहारची राजधानी पटना येथे एका जाहिर सभेचे आयोजन केले होते. या सभेस राजदचे सर्वेसर्वै लालूप्रसाद यादव यांनी भाषण केले. भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्याच्या वादात लालूप्रसाद यादव यांची जीभ चांगलीच घसरली.
“नरेंद्र मोदींना स्वतःचे कुटुंब नसेल तर आम्ही काय करू. ते राम मंदिराबाबत फुशारकी मारतात, मात्र ते खरे हिंदू नव्हेतच. हिंदू परंपरेत मुलाने आपल्या आईवडिलांच्या निधनानंतर मुंडन करणे आणि दाढी काढणे आवश्यक असते. मात्र, आपल्या आईच्या निधनानंतर मोदींनी असे काहीही केले नाही”. लालूप्रसाद यादव यांच्या या वाक्याला सभेस उपस्थित राजद आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद तर दिला. मात्र, आता लालूंचे हेच वाक्य राजदसह इंडिया आघाडीस महागात पडणार असल्याचे दिसत आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या या टीकेस भाजपने अतिशय कल्पकतेने प्रत्युत्तर दिले आहे. प्रथम तेलंगणातील आदिलाबाद येथे जाहिर सभेस संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “माझ्या कुटुंबास लक्ष्य करून माझ्यावर आता टिका करण्यात येत आहे. मात्र, आता संपूर्ण देशच ‘मीच मोदींचा परिवार’ असल्याचे म्हणत आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले.
त्यानंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी, पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यासह पक्षाचे सर्व सरचिटणीस व पदाधिकारी, जवळपास सर्वच केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांनी आपल्या ‘एक्स’ प्रोफाईलमध्ये बदल करून आपल्या नावानंतर ‘मोदी का परिवार’ असा बदल केला आहे. परिणामी, भाजपच्या या प्रत्युत्तराचा धक्का विरोधी आघाडीस बसेल, असे स्पष्ट झाले आहे.
तेव्हा राहुल, आता लालू
राजकीय टिकेच्या फुलटॉसचे रुपांतर सिक्सरमध्ये कसे करायचे, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरेचदा दाखवून दिले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी २०१९ साली राफेल प्रकरणावर पंतप्रधान मोदींवर ‘चौकीदार चौर है’ अशी टिका केली होती. त्यानंतर भाजपने देशभरात चौकीदारांचे मेळावे घेतले होते आणि सर्वच केंद्रीय मंत्री व अन्य नेत्यांनी आपल्या प्रोफाईलपुढे ‘चौकीदार’ लावले होते. भाजपच्या या प्रत्युत्तरामुळे देशभरात ‘चौकीदार चौर है’ अशी आक्रमक मोहिम राबविण्याची तयारी केलेल्या काँग्रेसची संपूर्ण तयारी वाया गेली होती. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या मनातही काँग्रेसविषयी चीड निर्माण झाली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी तीच चूक केली असल्याचे दिसते.