"ठाकरेंची काय अवस्था झालीये? आधी केंद्रातले..."; शंभुराज देसाईंचा टोला
04-Mar-2024
Total Views |
मुंबई : लोकसभेच्या जागांची चर्चा करण्यासाठी नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. शिवसेना-भाजप युती असताना दिल्लीचे मोठे नेते चर्चा करायला येत होते आणि आता पटोले आणि आव्हाडांसारखे राज्यातले नेते जातात. यावरून ठाकरेंनी विचार करावा आपण कुठे आहोत? असा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, "भाजपमध्ये कुणी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्यात दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या पक्षात डोकावण्याची काय आवश्यकता आहे? उद्धव ठाकरे, तुमच्या पक्षात तुम्ही ४८ पैकी किती जागा लढवणार? हे आधी बघा."
"लोकसभेच्या जागांची चर्चा करण्यासाठी नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. यापुर्वी पक्षाचा केंद्रातील मोठा नेता मातोश्रीवर जागावाटपाची चर्चा करायला यायचे. आता कोण जातंय? म्हणजे, शिवसेना-भाजप युती असताना दिल्लीचे मोठे नेते चर्चा करायला येत होते आणि आता पटोले आणि आव्हाडांसारखे राज्यातले नेते जातात. त्यामुळे ठाकरेंनी स्वत:चा विचार करावा की, आपण कुठे आहोत? आपल्याशी चर्चा करायला कुणाला पाठवलं जातं? याबद्दल आधी विचार करा आणि नंतर मोठ्या पक्षांवर बोला," असे ते म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, "लवकरच महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल," असेही ते म्हणाले.