'राम मन्दिर का उपहार, फिर एक बार मोदी सरकार'

मान्यवरांच्या उपस्थितीत संत-महंतांचा निर्धार

    04-Mar-2024
Total Views |
अखिल भारतीय संत समिती राष्ट्रीय परिषदेच्या दोन दिवसीय झालेल्या बैठकीत देशभरातून आलेल्या संतांनी 'राम मन्दिर का उपहार, फिर एक बार मोदी सरकार' (Phir Ek Baar Modi Sarkar) चा जयघोष करत आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी विराजमान करणाचा निर्धार केला आहे.

Akhil Bharatiya Sant Samiti Baithak

मुंबई : 'अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारल्यामुळे संपूर्ण देशात अभूतपूर्व आनंदाचे वातावरण आहे. मंदिराच्या उभारणीचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. त्यामुळे रिटर्न गिफ्ट म्हणून हिंदू समाज नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्ती करेल.', असे म्हणत देशभरातून आलेल्या संतांनी 'राम मन्दिर का उपहार, फिर एक बार मोदी सरकार'चा जयजयकार करत पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनाच विराजमान करण्याचा निश्चय केल्याचे दिसत आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 'अखिल भारतीय संत समिती राष्ट्रीय परिषदेची' दोन दिवसीय बैठक (२-३ मार्च) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवसृष्टी, भाईंदर येथे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातून आलेल्या संतांनी हिंदू समाजाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.

सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे म्हणाले की, "२०२५ हे संघाचे शताब्दी वर्ष आहे. शताब्दी वर्षात संघ हिंदू समाजासमोर आग्रहाचे पाच मुद्दे मांडणार आहे. सामाजिक समरसता, जन्माधारित भेदभावमुक्त हिंदू समाज, पर्यावरण संरक्षण, कौटुंबिक प्रबोधन आणि स्वदेशी जीवनशैली. हिंदू समाज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेला असावा." या प्रश्नांवर भाष्य करत पुढे त्यांनी संत समाजाकडे मार्गदर्शन व नेतृत्व करण्याची विनंती केली.

आलोक कुमार आपल्या भाषणात म्हणाले, 'संविधानिक पद्धतीने आपल्याला श्रीकाशी ज्ञानवापी आणि श्रीकृष्ण जन्मभूमी मिळेल. श्रीकाशी ज्ञानवापीवरील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवालानेही हिंदू पक्षाची बाजू बळकट केली आहे. सर्व पुरावे हिंदूंच्या बाजूने आहेत.'

काशी, अयोध्या आणि जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचाही विकास केला जाईल, असे म्हणत संतांच्या विनंतीला मान देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी निर्णय घेतला. महाराष्ट्रातील मध्याह्न भोजनात फक्त शाकाहारी जेवण देण्याच्या पर्यायांवरही सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमधील घटनांबाबत संत समाजात तीव्र संताप असून हिंदू समाजाला आत्मविश्वास आणि बळ देण्यासाठी संतांचे शिष्टमंडळ संदेशखाली येथे जाणार असल्याचे संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अविचल देवाचार्य यांनी सांगितले.

पद्मश्री स्वामी ब्रह्मनदेशाचार्य म्हणाले की, "जगातील १०० हून अधिक देशांमध्ये हिंदू राहतात. जे आपापल्या देशांसाठी सकारात्मक सामाजिक आणि आर्थिक योगदान देतात. जागतिक हिंदू समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी, अखिल भारतीय संत समितीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करताना नोव्हेंबर २०२५ मध्ये वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे आयोजन केले जाईल."