‘माऊली’चा अनोखा साक्षात्कार!

    03-Mar-2024   
Total Views |
sangeet bibat aakhyan
 
महाराष्ट्र हे नानाविध लोककलांनी समुद्ध असे राज्य. इथे प्रत्येकाची नाळ लोककलेशी जोडली गेलेली असल्याने लोककला प्रकारातला नाट्यानुभव सर्वांना आवडतो. असाच बिबट या प्राण्याविषयी एक प्रबोधनपर नाट्यविष्कार दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या माध्यमातून रविवार, दि. 3 मार्च रोजी आयोजित करण्यात आला. खरतर लोककलेचा धागा पकडून हे ’संगीत बिबट आख्यान’ सादर झाले.

हे नाटक बिबटेवाडी नावाच्या एका खेडेगावात घडतं. जिथे बिबट्याची गावात प्रचंड दहशत असते. त्याचं दहशतीतून बिबट्या आणि माणसातील संघर्ष सुरू होतो. बिबट्या म्हटलं की, बिबट्याने माणसावर केलेले हल्ले प्रकर्षाने आठवतात. पण बिबट्याचे संवर्धन ही कशी काळजी आणि निसर्गचक्राची गरज आहे. हे या संगीत बिबट आख्यानातून स्पष्ट होते. मुळात हे नाटक बिबट्या या प्राण्याच्या अवतीभोवती फिरत त्यांची कथा आणि व्यथा मांडणारे आहे. नाटकाची सुरुवात जरी पारंपरिक नांदीने होतं असली, तरी नाटक पुढे आपल्याला लोककलेतील वेगवेगळ्या कलाप्रकरांची तोंडओळख करून देते.

ज्यात भारुड, कीर्तन, शाहिरी काव्य, लावणी,कव्वाली अशा कलाप्रकरांचा मिलाप आढळतो. ज्यामुळे नाटक प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेते, तर या बिबटेवाडी गावातील बिबट्यांची दहशत लक्षात घेऊन ग्रामसेवक आणि बुवा एका शिकार्‍याकडे गावाच्या सुरक्षासाठी मदत मागतात. त्यानंतर बिबट्याच्या तावडीतून गावाची मुक्तता करण्यासाठी बिबट्याची शिकार करावी, अशी योजना आखली जाते. ज्यामुळे गावचा ग्रामसेवक आणि शिकारी दोघेही बिबट्याच्या शोधात निघतात. त्यानंतर एका लावणीनृत्यांगणेचा रंगमंचावर प्रवेश होतो.
 
लावणीच्या गायनातून बिबट्याची दहशत आणि बिबट्या गावात नेमंका कुठे आहे? हे त्या दोघांनाही कळतं. पण ती मादी बिबट्या असल्याने नाटकाच्या कथेला वेगळे वळण प्राप्त होते. मग अशावेळी मादी बिबट्या आपल्या पिलांना वाचवण्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी कशा पद्धतीने माणसांवरती हल्ला करते. बिबट्याचे स्थलांतरण कसे होत असते? अशा असंख्य गोष्टींवरती नाटककार भाष्य करतात. पण यामध्ये भारुड करणार्‍या महाराजांची भूमिका ही तितकीच महत्त्वाची असते. मुळात भारुड हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम असल्याने नाट्यदिग्दर्शकाने भारुड हा लोककला प्रकार या नाटकाच्या अनुषंगाने वापरलेला आहे. मग भारुडाच्या माध्यमातून मादी बिबट्याला ’माऊली’ संबोधले जाते.

याच माऊलीच्या दर्शनासाठी तिचं रंग, रूप, स्वरूप जाणून घेण्यासाठी नाटक पुढे सरकत. याच शोधात बिबट्याची शिकार करायला निघालेले दोघेजण भारुड करणार्‍या महाराजांच्या उपदेशाने भारावून जातात. खरंतर भारुड करणारे महाराज बिबट्याच्या संवर्धनावर आणि निसर्गचक्रावर उत्तमरित्या भाष्य करतात. त्यात नाट्यकलावंतांचा रंगाविष्कार ही तितकाच बहरदार असतो. त्यांच्या सोबतीला असणारे वाद्यवृंददेखील तितक्याच उत्स्फूर्तपणे नाट्यसंगीतासह कलावंतांना विनोद निर्मितीसाठी साथ देतात. महाराष्ट्रातील किंबहुना देशातील बिबट या प्राण्याविषयी लोककलेच्या नानाविधी प्रकारातून प्रेक्षकांशी एकरूप होणारेहे एकमेव ’संगीत बिबट आख्यान’ असल्याचे जाणवत राहते.

मुळात गावोगावी अशा नाटकांचे प्रयोग होणे, त्यातून बिबट्या या प्राण्याविषयी लोकांचे असणारे गैरसमज दूर करणे काळाची गरज आहे. ज्या पद्धतीने माणूस अन्नाच्या शोधासाठी, कामासाठी स्थलांतर करतो. त्याच पद्धतीने बिबट्यादेखील अन्नाच्या शोधात शहरीभागात स्थलांतर करत असल्याची मांडणी नाटकातून होते. तरी या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग करून गावोगावी बिबट जनजागृतीची चळवळ आपण उभी करुया.


-सुप्रिम मस्कर 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुप्रिम मस्कर

इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.