कुतूहल जपणारा माणूस

    03-Mar-2024   
Total Views |
dr vijay sathe

जीवाश्मशास्त्रापासून संगीतापर्यंत सर्वच क्षेत्रांत विजय यांचे योगदान आहे. पं. जसराज यांचे शिष्य आणि पुरातत्त्वशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक अशी ओळख असणार्‍या, डॉ. विजय साठे यांच्या वेगळ्या वाटेच्या आयुष्याबाबत सांगणारा हा लेख...

त्याच्या घरात एक साप आला होता. आजूबाजूच्यांनी मिळून पकडला आणि पकडताना झटापटीत साप मरण पावला. आता त्याला अग्नी द्यायला हवी. विजयने त्या सापावर व्यवस्थित सुरळीतपणे अग्नी संस्कार व्हावेत, यासाठी प्रयत्न केले का? तर त्याला त्या सापाची हाडं हवी होती! साधारणपणे अशा सवयी असणार्‍या व्यक्तींची आपल्याला किळस येते; पण हाही एक अभ्यासाचा विषय आहे, हे तुम्हाला माहितीय का? आपण आपलं संपूर्ण आयुष्य जीवाश्मशास्त्राला वाहून घेणार असू, तर त्या विषयासंबंधी कुतूहल आपल्याला वाटायला हवं. विजयला ते नेहमी वाटत असे. त्याला प्राणी-पक्षांची हाडं जमवायला, ती हाताळायला आवडतं. त्याचं निरीक्षण सुरू असायचं.

विजय यांचा जन्म मूळचा मध्य प्रदेशातील. शिंदे संस्थानात त्यांचे दोन्ही आजोबा कार्यरत होते. एक आजोबा डॉक्टर तर दुसरे बांधकाम व्यावसायिक. ग्वाल्हेर येथे कार्यरत. वडिलांच्या कामाच्या निमित्ताने मध्य प्रदेशापासून उत्तर प्रदेश, राजस्थान असं बरंच पाहून झालं होतं. वडील पेशाने अभियंते. मध्य प्रदेशात राहत असल्याने, मातृभाषेच्या बाबतीत आग्रही. घरात आल्यानंतर मराठीच बोलले पाहिजे, हा हट्ट. त्यातून घरी संगीताचे सूर असत, साहित्यिकांची पुस्तकं असत. ज्ञानार्जनाचीही सवय असावी लागते, त्याशिवाय हा सरस्वतीचा ओघ आपल्यापाशी येत असेल, तरीही आपण त्यात न्हाऊ शकत नाही. विजय यांनी त्यांना यांच्या जीवनप्रवासात लाभलेल्या सर्व घटकांचे, संस्कृतीचे महत्त्व ओळखले आणि त्या जोरावर आपले आयुष्य घडवले. या काळात त्यांना अनेक गावं पाहायला मिळाली, लहान-लहान शहरं दिसली, शहरीकरणाची ओढ लागलेली गावं, आपल्यातलं गाव जीवंत ठेवलेली शहरं असं अनेक त्यांनी पाहिलं, त्यातून भारताची अनोखी रुपं त्यांच्यासमोर साकार होत होती.

वेगवेगळ्या पद्धतीचं स्थापत्य त्यांनी पाहिलं. दहावीनंतर वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि प्राणिशास्त्र असे विषय त्यांनी घेतले. (डायसेक्शन) विच्छेदन करायला जेव्हा बेडूक यायचा, त्यातले काही मरायचे. मग त्या मेलेल्या बेडकाला रसायनात वितळवून, त्याची हाडं जमवणं हा उद्योग! या अस्थीशास्त्रचं त्यांना केवढं कुतूहल. त्यातून त्यांची स्मरणशक्ती कसदार. सर्व सणावळी तोंडपाठ. कोणता राजा कोणत्या काळात, केव्हा सत्तेवर आला, केव्हा गेला हे सर्व त्यांना यंत्रवत लक्षात राहायचं. त्यातून त्यांना इतिहासाची आवड. ऐतिहासिक कादंबर्‍या वाचलेल्या. शिवाजी सावंत, रणजित देसाई यांच्यासोबत वडिलांच्या आग्रहाने सावरकर वाचून झालेलं. घरात संगीत ऐकल्याने श्रवणसंस्कार उत्तम झालेले. लोकसंगीत, लोकसंस्कृती जाणून घेत, त्यांना वैविध्यपूर्ण जगता आलं, ही त्यांच्या आयुष्याने त्यांना दिलेली उत्तम संधी.

एक दिवस मध्य प्रदेशात एका शिबिरासाठी पुरातत्त्वशास्त्रज्ञ विष्णू श्रीधर वाकणकर जात होते. मध्य प्रदेशातील तो रायसेन जिल्हा. भोपाळपासून सुमारे ४०-४५ किलोमीटर दूर. प्रवासात त्यांना काही जाणवलं. कोणत्या आदिम संस्कृतीने त्यांना साद घातली, कुणास ठाऊक! त्यांनी शिबिराला जाणे रद्द केले आणि ते त्या जंगल वाटांतून पुढे-पुढे जात राहिले एकटेच. तेव्हा तेथील गुहांतील साधूंनी त्यांना दगडावरच्या चित्रांबद्दल सांगितले. हे पुरातत्त्वशास्त्र जाणत असल्याने, अडचण काही ती आली नाही. असा भीमबेटकाचा शोध लागला. ते मध्य प्रदेशात आल्यानंतर, एक दिवस विजय यांच्या घरी आले होते. त्यावेळी विजय महाविद्यालयीन विद्यार्थी. पुढे काय शिकायचे, या विचारात होताच. वाकणकरांनी त्यांना पुरातत्त्वशास्त्राची ओळख करून दिली. वडिलांनीही सांगितले, या विषयात मार्गदर्शनासाठी गुरुजी आहेत, तेव्हा सरांच्या सांगण्यावरूनच विजय पुण्याच्या रस्त्याला लागले. पुण्यात आल्यावर डेक्कन महाविद्यालय म्हणजे त्यांचं दुसरं घरच. पण, त्याही आधी बरंच काही मध्य प्रदेशातच घडून गेलं होतं. सांगते.

घरात संगीत ऐकता-ऐकता कान तयार झाला होता. मध्य प्रदेशातल्या सर्व संगीताच्या सभांना ते हजेरी लावत. त्यांना पं. जसराज यांचे संगीत ऐकताना आवडायचे. भान हरपून गाणारा, तो गायक पहिला की, विजय यांना त्यांच्याकडे शिकावेसे वाटायचे. त्यांची नेहमीची अजीजी पाहून, एकदा मध्य प्रदेशातीलच कार्यक्रमाला त्यांना तंबोर्‍याच्या साथीला घेतले. कार्यक्रम झाला. मध्यरात्रीनंतर कार्यक्रमाच्या समाप्तीला पंडितजींनी विचारले, आता कसा जाशील? तेव्हा विजय यांच्याकडे एकमात्र मार्ग होता, तो बसस्थानकावर रात्र काढून, पहाटेच्या पहिल्या बसने घरी जाण्याचा. गुरुजींनी आग्रहाने त्यांना आपल्यासोबत आपल्या हॉटेलवर ठेवून घेतले. त्यावेळी मात्र पंडितजींनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. याचदरम्यान पुढच्या शिक्षणासाठी विजय पुण्याला गेले.


गंडाबंधनाचा कार्यक्रम झाला आणि शनिवार-रविवार विजय यांच्या पुणे-मुंबई-पुणे फेर्‍या सुरू झाल्या. १० ते १५ वर्षे त्यांचे शिक्षण अव्याहत सुरू होते. याशिवाय त्यांचा दुसरा गुरू म्हणजे डेक्कन विद्यापीठ. रात्रीअपरात्री, पहाटे कोणत्याही वेळी विजय यांनी या परिसराला संगीत ऐकवले आहे. कोणता पक्षी ओरडू लागला म्हणजे कोणती वेळ झाली, हे त्यांना अचूक कळू लागले. ’पीएचडी’साठी ते मांजर नदीच्या खोर्‍यातील प्रदेशात सर्वेक्षण करायचे, तेव्हाही एकटे असताना, त्यांची संगीत साधना अखंड सुरू असायची. स्वतःशी बोलावं, स्वतःचं काम करावं आणि छायाचित्रे घ्यावीत, असे दिवस होते.
 
आज ते निवृत्त प्राध्यापक आहेत. तसेच पाणघोडे आणि घोडे यांच्यावर अभ्यास करत आहेत. अश्मयुगीन हत्यारे आणि राखीगढीचे प्रकल्प असे काही ना काही त्यांचे काम सुरूच असते. निवृत्तीनंतरही समाधानासोबतच कुतूहलसुद्धा तेवढेच जागृत ठेवणारी, ही अतिविशेष ज्ञानशाखा आणि तिला सर्वार्थाने साथ देणारी त्यांची संगीतसाधना असा हा प्रवास आहे. अजूनही न संपलेला...
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.