सादगीपासून सादिकपर्यंत...

    03-Mar-2024   
Total Views |
Rishi Sunak Fundamentalism

कट्टरतावाद फक्त भारतातच नव्हे, तर जगभरासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात कट्टरपंथीयांचा योग्य तो इलाज उपलब्ध आहे. मात्र, अन्य देशांमध्ये आता कट्टरपंथीयांची पाळेमुळे रूजत आहे. त्यामुळे कट्टरतावादाच्या झळा आता त्यांनादेखील बसू लागल्या आहे. एके काळी असंख्य देशांवर सत्ता गाजवणार्‍या ब्रिटिशांनाही आता कट्टरपंथीयांनी आव्हान दिले आहे. त्यामुळेच आता ब्रिटन सरकार सावध झाले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आता आक्रमक भूमिका घेत, ब्रिटनमधील लोकशाही वाचवण्यासाठी कट्टरतावादाच्या विरोधात आवाज उठवला आहे. आज कट्टरतावादी शक्ती देश तोडण्यात आणि बहुधार्मिक अस्मिता कमकुवत करण्यात मग्न आहेत. मात्र, आता ब्रिटनने अशा शक्तींविरोधात लढण्याची गरज असल्याचे, ऋषी सुनक यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या रोडशॉल पोटनिवडणुकीच्या निकालानंतर १० डाऊनिंग स्ट्रीटच्या बाहेर बोलताना, सुनक यांनी कट्टरतावाद्यांविरोधात एक प्रकारे रणशिंगच फुंकले. कोणत्याही कट्टरपंथीयाने ब्रिटनमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा व्हिसा रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा सुनक यांनी दिला आहे.

मागील काही महिन्यांपासून ‘हमास’ आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये होत असलेल्या निदर्शनांवर सुनक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, ही निदर्शने धमक्या आणि हिंसाचाराच्या नियोजित कृत्यांमध्ये बदलत चालल्याचे सांगितले. ज्यू मुले शाळेचा गणवेश घालण्यास घाबरतात; कारण त्यांना आपली ओळख सार्वजनिक होण्याची भीती वाटू लागली आहे. या हल्ल्याशी काहीही संबंध नसतानाही, मुस्लीम महिलांना लक्ष्य केले जात आहेत. हा ब्रिटनमधील लोकशाहीला धोका आहे. इस्लामी कट्टरतावादी विष पसरवण्याचे काम करत असून, याला अटकाव घालणे गरजेचे असल्याचे मतही सुनक यांनी व्यक्त केले. सुनक आणि ब्रिटनचे गृहमंत्री जेम्स क्लेवरली यांनी नुकतीच देशातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कट्टरपंथीयांची निदर्शने, खासदारांना मिळणार्‍या धमक्या आणि पोलिसांसोबतचा संघर्ष या विषयांवर चर्चा झाली. यात कट्टरपंथीयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, ब्रिटनला आपल्या देशात अशी आक्रमक भूमिका घ्यावी लागतेय; कारण त्यांनी मानवतेच्या बुरख्याआड स्थलांतरितांना आसरा देण्याचा खटाटोप केला. मूळ ब्रिटनचे नागरिक सोडले तर स्थलांतरित आणि व्हिसावर असलेल्या काही लोकांनी ब्रिटनमध्ये द्वेष कसा वाढत राहील, ब्रिटन कसा अशांत राहील, यासाठी यथेच्छ प्रयत्न केले. सुनक हे ब्रिटनचे पहिलेच कृष्णवर्णीय पंतप्रधान असून, भारतीय वंशाचे आहे. असे असूनही त्यांनी ब्रिटनच्या विकासासाठी आणि स्थिरतेसाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली. मात्र, इस्रायल आणि ’हमास’ यांच्यामध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर ब्रिटनमध्ये अनेक शांतिदूत नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. आपली रोजीरोटी ब्रिटनमध्ये शेकायची आणि प्रेम मात्र ’हमास’च्या बाजूने व्यक्त करायचे, असा यांचा नेहमीचा फंडा. निदर्शने करताना अनेक लोकं तोंड झाकून निघतात. बुरखा घातलेला असल्याने, अशा लोकांना ओळखणेदेखील कठीण होऊन बसते. ब्रिटनसोबतच अनेक युरोपियन देशांमध्ये अशा प्रकारची ’हमास’च्या समर्थनार्थ मोर्चे, निदर्शने केली जात आहेत.
 
विशेष म्हणजे, सध्या लंडनचे महापौर सादिक खान आहेत. जे पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत. विशेष म्हणजे, ब्रिटनच्या राजधानीचा महापौर हा पाकिस्तानी मूळ असलेला आहे, यावरूनच ब्रिटन कोणत्या दिशेने चाललाय, याचा अंदाज येतो. लेबर पार्टीसहित कन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार ली एंडरसन यांनी सादिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सादिक हे कट्टरपंथीयांच्या इशार्‍यावर काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ब्रिटनचे माजी गृहमंत्री सुएला ब्रेवरमैन यांनीही सादिक महापौर असेपर्यंत कट्टरपंथीयांचे कोणीही काहीही बिघडवू शकत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे सुनक यांनी भले हिंसा करणार्‍या स्थलांतरित, व्हिसावर असणार्‍या कट्टरपंथीयांना इशारा दिला असला, तरीही थेट सत्तेत बसलेल्या नापाक लोकप्रतिनिधींचाही त्यांनी अभ्यास करून, त्यांना धडा शिकवावा. या हिंसाचारामागे सादगी आणि सादिक या शब्दांचाही धांडोळा घ्यायला हरकत नाही. अन्यथा, उद्या पाकिस्तानी मूळ असलेला पंतप्रधान सादगीवर ज्ञान देत बसला, तर आश्चर्य वाटणार नाही.

७०५८५८९७६७
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.