शिरीष कणेकर यांची लेखनाची एक आगळी शैली होती. त्यात खट्याळपणा होता; परखडपणा होता; इरसालपणा होता आणि तितकीच हृद्यता देखील होती. ‘साखरफुटाणे’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या या शैलीचे प्रत्यंतर देईल. या पुस्तकाला ’खेंगट’ असे नाव देण्याचा विचार होता; पण अनेकांना ते समजणार नाही.
‘खेंगट’ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मासे एकत्र करून, शिजवून केलेले कालवण असा कणेकर यांनी सुरुवातीलाच केलेला खुलासा त्यांच्या या शैलीचे उत्तम उदाहरण. अर्थात पुस्तकाचे नाव ‘साखरफुटाणे’ असे असले, तरी त्यात ‘खेंगट’ या प्रस्तावित नावाप्रमाणे कणेकर यांचे वेगवेगळ्या धाटणीचे लेख संकलित करण्यात आले आहेत. त्यांत शब्दचित्रे आहेत, काही साहित्य-संस्कृतीशी संबंधित लेख आहेत; तर काही मृत्यूलेखही आहेत.
‘बिझीबी’ उर्फ ‘बेहराम कॉन्ट्रॅक्टर’ यांच्यावरील लेख हृदय आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या वैशिष्ट्यांची नेमकी दखल घेणारा. ‘बिझीबी’ या नावाने लिहिल्या जाणार्या, गाजलेल्या स्तंभाचा हा धनी. पत्रकारिता करताना, दुसर्यांच्या टोप्या उडविताना आपली प्रसिद्धी मात्र होऊ नये म्हणून कटाक्ष असणारा हा स्तंभलेखक होता. त्यांच्यात असणारी काहीशी बेफिकिरी आणि स्पष्टवक्तेपणा यांची उदाहरणे कणेकर यांनी दिली आहेत. एका मोठ्या राजकीय पुढार्याच्या प्रेस कॉन्फरन्सला तो पत्रकार संघात माझ्या शेजारी बसला होता.
‘’हे बघा, तुम्ही मला नेहमी मिस कोट करता...”, तो पुढारी म्हणाला की, ‘’यापुढे टेपरेकॉर्डर बरोबर ठेवत जा.” ’‘यु आर नॉट दॅट इम्पॉरटंट,” बेहराम ताडकन म्हणाला आणि प्रतिक्रियेची वाट न बघता उठून बाहेर गेला, अशी आठवण कणेकरांनी सांगितली आहे. डॉ. जीवन मोहाडीकर यांच्यावरील मृत्युलेख उन्मुक्तपणे जीवन जगणार्या, मोहाडीकर यांचे व्यक्तिचित्र नेमक्या शब्दांत मांडणारा. ‘कामजीवन’ विषयावर वृत्तपत्रात सदर सुरू करण्यासाठी, मोहाडीकर यांनी खूप प्रयत्न केले; पण मराठमोळ्या सोवळ्या वाचकांना हा प्रकार झेपणार नाही, त्यांचा वृत्तपत्रांवर रोष ओढवेल, हे काही केल्या जीवनला पटत नसे, असे कणेकर यांनी लिहिले आहे. मोहाडीकर यांचा हेतू या विषयाचे अज्ञान दूर करणे हा होता; पण ते काळाच्या पुढचे बोलत होते, हे त्यांच्यावरील ’एक वादळ शमले’ या लेखातून जाणवते.
क्रिकेट हा कणेकर यांच्या जिव्हाळ्याचा विषय. क्रिकेटचा निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणजे डोनाल्ड ब्रॅडमन असे त्यांनी लिहिले आहे. त्याचे कारणही त्यांनी दिले आहे. ब्रॅडमनच्या आधी आणि नंतर असा एकही फलंदाज झाला नाही. ज्याला नमविण्यासाठी बॉडीलाईनसारसारखा अनैतिक, बेकायदेशीर मार्ग प्रतिपक्षाला अवलंबावा लागला. ‘महामानव’ हा लेख ब्रॅडमॅनच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकणारा. अरूण साधू यांचे ’सौम्य नंदादीप’ असे चपखल वर्णन करीत, त्यांच्या स्वभावाचे लोभस पैलू कणेकरांनी उलगडून दाखविले आहेत.
‘मुंबई दिनांक’, ‘सिंहासन’सारख्या अजोड कलाकृती निर्माण करणार्या लेखकाला एका मिणमिणत्या, उदासवाण्या संध्याकाळी मी मंत्रालयापाशी ८७ क्रमांकाच्या बस स्थानकावर तिष्ठत उभा राहिलेला पाहिला आणि मला वैराग्याचा झटका आला, असे त्यांनी गमतीने लिहिले असले, तरी साधूंच्या साधेपणा त्यांनी त्यातून अधोरेखित केला आहे. आपले काका रमेश यांच्यावरील लेख अंतरीच्या उमाळ्याने लिहिलेला. त्यांचे वर्णन कणेकरांनी ’कस्तुरीमृग’ असे केले आहे. हा लेख मुळातूनच वाचायला हवा असा. अनिल थत्ते, भक्ती बर्वे यांच्यावरील लेख वाचनीय.
‘नूतन वर्षाचे संकल्प’ लेखात वलयांकित व्यक्तीचे काल्पनिक संकल्प, ‘यशासारखं दुसरं काहीही नाही’ लेखात सुश्मिता सेनच्या चढत्या आलेखाबद्दल, ‘जा रे जा पावसा’ लेखात पावसाने आपले वैयक्तिक नुकसान कोणते केले, याचे नर्मविनोदी पद्धतीने वर्णन अशा लेखांनी पुस्तकाची खुमारी वाढली आहे. पुस्तकातील उल्लेखनीय लेख म्हणजे ‘मस्तवाल सुधीर गाडगीळ’ हा. सुधीर गाडगीळ यांची सूत्रसंचालक आणि मुलाखतकार म्हणून असणारी कारकिर्द सर्वश्रुत असली, तरी गाडगीळ यांच्या स्वभावातील आपुलकी, त्यांचा मनुष्यसंग्रह, मनुष्यस्वभावाचा त्यांचा असणारा दांडगा अभ्यास यावर लिहीत गाडगीळांच्या या अल्पपरिचित गुणवैशिष्ट्यांची ओळख कणेकरांनी करून दिली आहे.
पुस्तक पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह असल्याने, त्यातील काही संदर्भ बदलले असले, तरी आताही ते वाचताना त्यांतील खुमारी कमी होत नाही. पुंडलिक वझे यांनी तयार केलेले मुखपृष्ठ वेधक.