पंतप्रधान भूतान दौऱ्यावर, भारताने उभारलेल्या रुग्णालयाचे करणार उद्घाटन!
22-Mar-2024
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानला पोहोचताच त्यांचे 'रेड कार्पेट' स्वागत करण्यात आले. भूतानला पोहोचताच पंतप्रधान मोदींकरिता ४५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक रांगेत उभे होते. दरम्यान, या दौऱ्यात भारताने बांधलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दरम्यान, भूतान दौऱ्यात पंतप्रधान मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारतातील लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आणि निवडणूक रॅलींच्या व्यस्त वेळापत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानला पोहोचले आहेत.
भूतानची राजधानी थिंपू येथे पोहोचल्यावर मोदींचे 'गार्ड ऑफ ऑनर'ने स्वागत करण्यात आले. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना 'मोठा भाऊ' म्हटले. पंतप्रधान मोदींचा हा दौरा २ दिवसांचा असेल. 'शेजारी प्रथम' या धोरणाखाली भारत शेजारी देशांसोबतचे संबंध सुधारत आहे.
पारो विमानतळावर पंतप्रधान मोदींसाठी रेड कार्पेटही अंथरण्यात आले. पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ ते थिंपू या ४५ किलोमीटरच्या मार्गावर भूतानचे नागरिक पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमले होते. वाटेत भारत आणि भूतानचे राष्ट्रध्वज फडकत राहिले. ते भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठकीत उभय देशांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल.