‘पिरामल वैकुंठ’मधील ‘इस्कॉन’चेश्री श्री राधा गोविंददेव मंदिर

केवळ मंदिर नव्हे, अध्यात्मिक अनुभूतीचे समाजकेंद्र

    22-Mar-2024   
Total Views |
Piramal Vaikunth
 

‘पिरामल रिअल्टी’ व ‘इस्कॉन’ने ठाणे शहरात ‘पिरामल वैकुंठ’ येथे ‘श्री श्री राधा गोविंददेव मंदिर’ हे भव्य मंदिर उभारले आहे. दि. १७ मार्च रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ‘पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेड’चे अध्यक्ष अजय पिरामल यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आणि समाजाच्या हितासाठी ‘इस्कॉन’च्या साहाय्याने या मंदिराची स्थापना केली. हे मंदिर समाजकल्याणासाठी, समाजाच्या अध्यात्मिक वृद्धीसाठी कार्य करणारे एक अध्यात्मिक केंद्र असेल. नागर वास्तूशैलीतील हे मंदिर येत्या काळात ठाणे शहराचे वैभव ठरेल, यात कुठलीच शंका नाही. त्यानिमित्ताने ‘पिरामल समूहा’च्या या अनोख्या मंदिराचा, त्यामागच्या संकल्पनेचा आढावा घेणारा हा लेख...

आपल्या देशात सर्वसाधारणतः मंदिरांची संख्या पाहिली, तर २० लाखांहून अधिक मंदिरे भारतात आहेत. त्यात ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉनशिअसनेस’ अर्थात ‘इस्कॉन’ या धार्मिक संघटनेच्या मंदिरांचीही वेगळी छाप पाहायला मिळते. ‘इस्कॉन’ने आपल्या मंदिरांच्या माध्यमातून केवळ देशातच नव्हे, तर जगभरात आपली एक वेगळी अनोखी प्रस्थापित केली. ‘इस्कॉन’चे असेच एक मंदिर ठाणे शहरात नुकतेच उभे राहिले असून, फक्त ठाणेकरच नाही, तर आसपासच्या शहरातील भाविकांनीही या मंदिराला भेट दिली आहे. ठाणे रेल्वे स्थानकापासून ५.५ किमी अंतरावर असलेल्या बाळकुम पाडा येथे ’पिरामल रिअल्टी’ या रिअल इस्टेट कंपनीचा ’पिरामल वैकुंठ’ हा नवा प्रकल्प. या ३२ एकरवर पसललेल्या परिसरात ‘पिरामल रिअल्टी’ आणि ‘इस्कॉन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ’श्री श्री राधा गोविंददेव मंदिर’ हे भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे.

ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी १९६६ रोजी न्यूयॉर्कमध्ये ‘इस्कॉन’ची स्थापना केली. हिंदू धर्माचे महत्त्व आणि आध्यात्मिक जीवनातील आनंद समजावण्याचे कार्य ‘इस्कॉन’च्या माध्यमातून अविरतपणे सुरु आहे. जगभरात ९०० हून अधिक ‘इस्कॉन’ची मंदिरे आहेत. ‘पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेड’चे अध्यक्ष अजय पिरामल यांच्या मातोश्री ललिता पिरामल यांचे ‘इस्कॉन’सी ऋणानुबंध जुळले होते. ‘इस्कॉन’चे राधानाथ स्वामी हे त्यांना गुरुस्थानी होते. ललिता पिरामल यांची इच्छा होती की, आपण ‘इस्कॉन’साठी काहीतरी करावे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी मंदिर निर्माण करण्याची संकल्पना आखण्यात आली. त्याप्रमाणे अजय पिरामल यांचे सुपुत्र आनंद पिरामल त्यासंदर्भात ‘इस्कॉन’कडे प्रस्ताव घेऊन आले आणि ललिता पिरामल यांच्या स्मरणार्थ पिरामल कुटुंबाने आपल्या ’पिरामल वैकुंठ’ प्रोजेक्टमध्ये श्री श्री राधा गोविंददेव मंदिराची स्थापना केली. विशेष म्हणजे, ‘इस्कॉन’चे हे महाराष्ट्रातील असे पहिले मंदिर आहे, जे एखाद्या सोसायटीमध्ये उभारण्यात आले आहे.

बांधकाम व्यावसायिकांचा त्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पात आलिशान सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याकडे कल असतो. यामध्ये मग पॉश क्लब हाऊस, स्विमिंग पूल, थिएटर्स अशा सुविधांनाच प्राधान्य दिले जाते. पिरामल समूहानेही आपल्या प्रकल्पात या सुविधा ग्राहकांना दिल्या आहेतच. मात्र, सोसायटीमध्ये मंदिर स्वरुपात एखादे भव्य अध्यात्मिक केंद्र उभारणे हा पिरामल परिवाराचा संकल्प नक्कीच प्रेरणादायी म्हणावा लागेल. ‘पिरामल वैकुंठ’मध्ये एकूण पाच हजार फ्लॅट्स असून, दहा हजारांहून अधिक रहिवाशी याठिकाणी वास्तव्यास असणार आहेत.

मंदिर हे आजच्या काळात मनुष्याच्या मनासाठी एक उत्तम हॉस्पिटल आहे, असे म्हणतात. म्हणूनच मंदिराच्या माध्यमातून समाजातील अनेक परिवारांना एकमेकांशी जोडणे हा ‘इस्कॉन’चा मूळ उद्देश. मंदिराची संकल्पना पिरामल परिवाराची असून त्यासाठीचा संपूर्ण खर्च पिरामल परिवारानेच केला आहे. मंदिराच्या संचालनाची जबाबदारी ‘इस्कॉन’ने स्वीकारली आहे. असे हे ‘इस्कॉन’चे देखणे मंदिर ठाणे शहराचे आकर्षण ठरलेे आहे. कारण, गुजरात आणि राजस्थानच्या भव्य मंदिरांपासून प्रेरणा घेऊन हे मंदिर उभारण्यात आले. मंदिराचा ९० फूट उंच असलेला कळस ‘पिरामल वैकुंठ’ परिसरात पोहोचल्यावर आपल्याला प्रथमतः त्याचेच दर्शन होते.

या मंदिरात एकूण १८ खांब असून, सर्व खांबांवर कारागिरांनी अतिशय कोरीव आणि नक्षीदार काम केले आहे. मंदिराला प्रदक्षिणा मारल्यास रामायण तसेच कृष्णलीलेच्या कथा नक्षीकामातून भाविकांचे लक्ष वेधून घेतात. आपण आपल्या मुलांना घेऊन किमान एक तास जरी या मंदिराची परिक्रमा केली, तरी रामायण आणि कृष्णलीलेतील सर्व महत्त्वाच्या कथा मुलांना ज्ञात होतील.
 
मंदिराची निर्मिती ’शिल्पशास्त्र’ आणि ’वास्तुशास्त्र’ यांचा उत्तम नमुना ठरावी. राजस्थानच्या बंसी पहाड़पूर येथील गुलाबी वाळूच्या दगडापासून हे मंदिर साकारले आहे. त्यामुळे अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराची आठवण करून देणारे असे हे नागर वास्तूशैलीचे एक मूर्तिमंत स्वरूप असल्याचे स्पष्ट होते. या मंदिरात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच रेलचेल असल्याने, ‘पिरामल समूहा’ने खास ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सुविधाही केली आहे. मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ असून, याठिकाणी आपल्याला निरनिराळे देखावेही पाहायला मिळतात.

सुरक्षेच्या दृष्टिकोनाने याचेही उत्तम नियोजन याठिकाणी करण्यात आले आहे. कारण, मंदिरहे केवळ ‘पिरामल वैकुंठ’च्या रहिवाशांसाठी खुले केलेले नसून, अन्य भाविकांनाही येथे दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे रहिवाशांसाठी वेगळी रांग आणि रहिवाशांव्यतिरिक्त येणारे बाहेरील भाविक यांच्यासाठी वेगळी रांग तयार करण्यात आली आहे. ‘इस्कॉन’च्या ब्रह्मचार्‍यांच्या राहण्याची व्यवस्थासुद्धा याठिकाणी आहे. हे मंदिर केवळ सर्वसाधारण मंदिर नसून, समाजासाठी उभारलेले एक अध्ययन केंद्र आहे. लहान मुलांपासून सर्वांसाठी उत्तम शिकवणीची सुविधा येथे उपलब्ध आहे.

चिंतामुक्त जीवन कसे जगता येईल, याचे अध्यात्मिक धडे याठिकाणी सर्वांना मिळणार आहे. मंदिरात दिवसातून सहा आरत्या, आठ भोग, दरदिवशी भगवद्गीता पठणाचे लेक्चर्स असे ३६५ दिवस कार्य सुरू राहणार आहे. इतर बांधकाम व्यावसायिकही असा उपक्रम नक्कीच आपल्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये सुरु करू शकतील, असे मत ‘इस्कॉन’ने मंदिराच्या लोकार्पणानंतर व्यक्त केले. ‘पिरामल समूह’ व ‘इस्कॉन’ने मिळून समाजहितासाठी, समाजकल्याणासाठी त्यांच्या अध्यात्मिक अभ्यासाच्या वृद्धीसाठी उभारलेले हे मंदिर सर्वार्थाने ठाणे शहराचे वैभव ठरेल, यात कुठलीच शंका नाही!



ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक