जम्मू-काश्मीरची ‘शक्ती!’

    21-Mar-2024
Total Views |
Jammu and Kashmir politics

जम्मू-काश्मीरमध्ये यंदाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, निवडणुकीमध्ये कौटुंबिक पक्षांना त्यांचेच एकेकाळचे चेले आव्हान देणार आहेत. ‘पीडीपी’ची साथ सोडून ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ स्थापन करणारे सय्यद अल्ताफ बुखारी, काँग्रेसची साथ सोडून ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’ घेऊन पुढे आलेले गुलामनबी आझाद आणि अ‍ॅडव्होकेट अंकुर शर्मा यांचे ‘एकम् सनातन भारत दल’ या पक्षांची कामगिरी महत्त्वाची ठरू शकते.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारात आतापर्यंत तरी महिला अर्थात ‘शक्ती’ हा मुद्दा केंद्रस्थानी राहिल्याचे दिसते. अर्थात, हा मुद्दादेखील काँग्रेसनेच नकारात्मक पद्धतीने बाहेर काढला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा सकारात्मक लाभ घेण्यास सुरुवात केली. गेल्या आठवड्यात रविवारी मुंबईत काँग्रेसप्रणित ’इंडी’ आघाडीची सभा पार पडली. राहुल गांधी यांच्या ’भारत जोडो न्याय’ यात्रेचा समारोप म्हणूनही सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या सभेमध्ये राहुल गांधी यांना ‘इंडी’ आघाडीच नव्हे, तर देशातील विरोधी पक्षांचा प्रमुख नेता म्हणून पुन्हा एकदा लाँच करण्याचा काँग्रेसचा मनसुबा होता, त्यासाठी अनेक दिवसांपासून कामही सुरू होते. मात्र, राहुल गांधी यांच्या यात्रेचा दुसर्‍या टप्प्याने अखेरपर्यंत जोर पकडलाच नाही. अर्थात, जोर पकडावा असा प्रभाव यावेळी राहुल गांधी यांना पाडता आला नाही, हे काँग्रेसही नाकारणार नाही. याच सभेत राहुल गांधी यांनी आपला ‘लढा शक्तीसोबत आहे. शक्तीला नष्ट करूनच थांबणार,’ असे काहीसे विधान केले आणि राहुल गांधींची ही चूक भाजपने अचूक पकडली.

त्यानंतर तेलंगणमधील एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास शैलीत हिंदू संस्कृतीमध्ये शक्तीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. शक्ती म्हणजेच आमच्या माता-भगिनी आणि त्यांना संपविण्याची भाषा करणार्‍या राहुल गांधी आणि ’इंडी’ आघाडीचे आव्हान आपण स्वीकारत आहोत, अशी गर्जना केली. त्यानंतर आता प्रत्येक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अन्य नेते या मुद्द्यावर भर देत आहेत. भाजपने राहुल गांधींविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये तक्रारही दाखल केली आहे.काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पहिल्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये एका पाद्य्राची भेट घेतली होती. तो पाद्री राहुल गांधी यांना समजावून सांगत होता की, ”हिंदू धर्मातील शक्ती वगैरे असे काही नसून, जीजस हाच एकमेव गॉड आहे.“ राहुल गांधीदेखील मोठ्या विश्वासाने पाद्य्रास ऐकून घेत होते. त्यामुळे आता समाजमाध्यमांमध्ये भाजप समर्थकांकडून हा मुद्दादेखील ऐरणीवर आणला गेला. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारात आतापर्यंत तरी भाजपने आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी अशाच प्रकारे सेल्फगोल केले, तर भाजपला निवडणूक सोपीच राहणार आहे.

‘शक्ती’ अर्थात महिलांचा भाजपला पाठिंबा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगतात. देशात 2014 सालापासून झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये महिला मतदारांची पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वास असलेली पसंती दिसून आली आहेच. त्यामुळे यंदा जम्मू-काश्मीरमध्येही महिला मतदारांच्या विश्वासावर भाजपचा विश्वास आहे. ’कलम 370’ संपुष्टात आणल्यानंतर यंदाची पहिलीच लोकसभा निवडणूक आहे, त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे.जम्मू-काश्मीरमधील लोकसभेच्या पाच जागांवर महिलांचे मताधिक्य सुमारे 49 टक्के. याचाच अर्थ सर्व पाच जागांवर महिला निर्णायक भूमिका बजावू शकतात. राज्यातील विविध विधानसभा, लोकसभा, पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांचा सहभाग जोरदार राहिला आहे. जम्मू-काश्मीरमधील एकूण 86.93 लाख मतदारांपैकी 42.58 लाख महिलांचा सहभाग आहे. अनंतनागमध्ये पाच लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक 9.02 लाख महिला आहेत. याशिवाय जम्मूमध्ये 8.52 लाख, उधमपूरमध्ये 8.44 लाख, श्रीनगरमध्ये 8.70 लाख आणि बारामुल्लामध्ये 8.56 लाख महिला मतदार. प्रदेशात 1999 सालापासून लोकसभा निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी सातत्याने वाढत आहे. 1999 मधील 28.55 टक्क्यांवरून 2014 मध्ये 48.32 टक्क्यांपर्यंत वाढली होती. त्याचवेळी 2019 मध्ये त्यात अल्प म्हणजे 4.65 टक्क्यांची घटही झाली होती. मात्र, तरीदेखील हा टक्का जम्मू-काश्मीरमध्ये निर्णायक ठरतोच.

आता ’नारी शक्ती वंदन कायदा’ आणि विधानसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षणामुळे महिलांना राजकारणात भरपूर संधी उपलब्ध होणार आहे. अशा परिस्थितीत महिलांचा राजकारणातील सहभाग आणखी वाढावा, यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जम्मू-काश्मीरमध्येही महिला नेत्यांमध्ये उत्साह आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून त्यांचा किती सहभाग असेल, हे सर्व पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतरच कळेल. भाजप, काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, अपना पक्ष आदी राजकीय पक्षांनी त्यांच्या महिला आघाड्यांना कार्यान्वित केले आहे.‘कलम 370’ हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये 2020 साली जिल्हा विकास पंचायतीच्या निवडणुका झाल्या होता. या निवडणुकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, अनेक दशकांनंतर प्रथमच या निवडणुका झाल्या आणि यामध्ये प्रदेशातील प्रस्थापित अशा अब्दुल्ला-मुफ्ती कुटुंबांना सर्वसामान्य जनतेने थेट आव्हान दिले होते. या निवडणुकीमध्ये 98 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. यातही महिला मतदारांची संख्या अधिक होती. त्यानंतर विशेष म्हणजे, पाच अधिक जिल्हा पंचायती महिलांच्या ताब्यात असून, अनेक सीमावर्ती गावांमध्ये सरपंचही महिलाच आहेत. त्यामुळे महिलाशक्ती जम्मू-काश्मीरमध्ये निर्णायक ठरणार आहे.

गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरच्या नकाशासह राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर, जम्मू-काश्मीरमधील संसदीय मतदारसंघांच्या सीमाच नव्हे, तर सीमांकनामुळे समीकरणेही बदलली आहेत. काश्मीर आणि जम्मूमधील शक्ती संतुलित करण्यासाठी, दोन्ही विभागांचे क्षेत्र एकत्र करून नवीन संसदीय मतदारसंघ, राजौरी-अनंतनाग तयार करण्यात आला. यापूर्वी अनंतनाग मतदारसंघावर काश्मिरींचे वर्चस्व होते. आता राजोरी-पुंछच्या सात विधानसभा मतदारसंघातील सुमारे 7.5 लाख मतदारांचा राजोरी-अनंतनाग लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे. हिंदूंशिवाय पहाडी आणि गुजर-बकरवाल मतदारांची संख्या या भागात मोठी आहे. खोर्‍यात ‘कमळ’ फुलवण्याच्या भाजपच्या दाव्यात अनंतनाग-राजोरी या नव्या जागेवर राजकीय कसोटी लागणार आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वी पहाडी, गुज्जर-बकरवाल आणि ओबीसींना आरक्षणाची भेट दिल्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणही बदलले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये यंदाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, निवडणुकीमध्ये कौटुंबिक पक्षांना त्यांचेच एके काळचे चेले आव्हान देणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन नोंदणीकृत पक्ष उदयास आले आहेत. जे त्यांच्या मूळ पक्षांना आव्हान देण्यासाठी तयार आहेत. अनेक नेते, माजी मंत्री, माजी आमदार स्वतंत्रपणे राजकारण करताना दिसणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन डझनहून अधिक नेते, माजी मंत्री आणि आमदारांनी आपापली राजकीय भूमिका बदलली आहे. ‘पीडीपी’ची साथ सोडून ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ स्थापन करणारे सय्यद अल्ताफ बुखारी, काँग्रेसची साथ सोडून ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’ घेऊन पुढे आलेले गुलामनबी आझाद आणि अ‍ॅडव्होकेट अंकुर शर्मा यांचे ‘एकम् सनातन भारत दल’ हे पक्ष नेमके कोणास आव्हान देतात, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दि. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचारही आता जोरदार सुरू झाला आहे. दक्षिणेतील तामिळनाडूमध्ये सर्वच्या सर्व जागांवर पहिल्याच टप्प्यात मतदान होणार असल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या तामिळनाडूकडे विशेष लक्ष दिले आहे. तामिळनाडूसाठी भाजपच्या उमेदवारांवर गुरुवारी झालेल्या दिल्लीत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले असून, लवकरच त्याची घोषणाही होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भाजपच्या उर्वरित जागा आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांच्यातील जागावाटपही शनिवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील जागावाटप जाहीर झाल्यानंतरच महाराष्ट्रात प्रचाराला धार चढणार आहे.