‘नवरा माझा नवसाचा’ मधून प्रशांत दामले झाले होते कट!, जयवंत वाडकरांनी सांगितला किस्सा

    20-Mar-2024
Total Views |
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असून अभिनेते जयवंत वाडकर यांनी या चित्रपटातील काही भन्नाट किस्से सांगितले.
 
 
navra maja navsacha
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha) हा चित्रपट २००४ रोजी प्रदर्शित झाला होता. आजही २० वर्षांनी तो चित्रपट प्रेक्षकांना पाहताना आनंद होतो. आता ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट भेटीला येणार असून आता नवस फेडायला वक्रतुंड अर्थात वॅकी आणि भक्ती कुठे जाणार आणि यावेळी सहप्रवाशांसोबत काय धमाल मस्ती होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना ‘महाएमटीबी’च्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha) आणि प्रशांत दामले यांच्याबदद्ल एक महत्वपर्ण माहिती सांगितली.
 
जयवंत वाडकर म्हणाले की, “ ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या कथा वाचनासाठी आम्ही सगले कलाकार एकत्रित बसलो होतो. मला सवय आहे नाटक, चित्रपट कोणत्याही कलाकृतीच्या रिडींगला बसल्यावर मी वेळ लावतो. तशीच या रिडींगसाठी देखील लावली. काही वेळानंतर सचिन पिळगांवकर यांनी मला विचारलं किती वेळ झाला, मी म्हणालो सव्वा तीन तास झाले. हे ऐकून पिळगांवकर म्हणाले बराच वेळ गेला आणि त्यामुळे प्रशांत दामले देखील ‘नवरा माझा नवसाचा’ भाग १ मध्ये सहभागी होणार होते ते वगळण्यात आले. जसं रिमा लागू, सोनु निगम बसमध्ये प्रवास करताना चढतात आणि धमाल करुन उतरतात, तसाच भाग प्रशांत दामलेंसोबत शुट केला जाणार होता. पण वेळेच्या निर्बंधामुळे प्रशांत दामलेंची एन्ट्री वगळावी लागली,” असा भन्नाट किस्सा वाडकर यांनी सांगितला.
 
दरम्यान, ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाचे शुटींग पुर्ण होत आले असून काही सीनच्या शुटींगसाठी दिग्दर्शिक सचिन पिळगांवकर आणि अभिनेता स्वप्नील जोशी कोकणात गेले आहेत. याबदद्लची पोस्ट सोशल मिडियावर स्वप्नीलने पोस्ट केली होती. तर ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, जयवंत वाडकर, सिद्धार्थ जाधव, निवेदिता सराफ असे अनेक भन्नाट कलाकार दिसणार आहेत.